मनोरंजनाची श्रेयस वाटचाल 

तेजल गावडे  
सोमवार, 10 जुलै 2017

पहिला मराठी रॅपर आणि पुणेकर श्रेयस जाधवची "आम्ही पुणेरी', "वीर मराठे' ही रॅप गाणी चांगलीच गाजली. तसंच त्याने "ऑनलाईन बिनलाईन', "बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. आता त्याची निर्मिती असलेला मल्टीस्टारर "बसस्टॉप' हा सिनेमा 21 जुलैला प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने केलेली बातचीत... 

पहिला मराठी रॅपर आणि पुणेकर श्रेयस जाधवची "आम्ही पुणेरी', "वीर मराठे' ही रॅप गाणी चांगलीच गाजली. तसंच त्याने "ऑनलाईन बिनलाईन', "बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. आता त्याची निर्मिती असलेला मल्टीस्टारर "बसस्टॉप' हा सिनेमा 21 जुलैला प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने केलेली बातचीत... 

"बाबू बॅण्ड बाजा' या चित्रपटाला 2011 मध्ये चार राष्ट्रीय पुरस्कार व जगभरातील 35 इतर पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटाची निर्मिती माझ्या आईने (नीता जाधव) केली होती. या चित्रपटातून मी सहायक दिग्दर्शक म्हणून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं. या चित्रपटाचं काम सुरू केलं होतं, त्या वेळी आम्ही विचारदेखील केला नव्हता की, आम्ही आणखीन चित्रपटांची निर्मिती करू. छंद म्हणून माझे आई-बाबा चित्रपट निर्मितीकडे वळले. त्या वेळी "जय गजानन प्रॉडक्‍शन'च्या नावाने चित्रपटाची निर्मिती केली. काम करत करत अनुभव मिळाला आणि "बाबू बॅण्ड बाजा' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर व्यावसायिकरीत्या आम्ही या क्षेत्रात काम करायचं ठरवलं. मग आम्ही 2013 मध्ये गणराज प्रॉडक्‍शन स्थापन करून "ऑनलाईन बिनलाईन', "बघतोस काय मुजरा कर' आणि आता प्रदर्शित होणारा "बसस्टॉप' या सिनेमांची निर्मिती केली आणि भविष्यात बरेच चित्रपट पाहायला मिळतील. तसंच माझ्या गाण्यांचीही आम्हीच निर्मिती केलीय आणि एव्हरेस्ट कंपनीसोबत भागीदारी केलीय. 
मी कोणतंही संगीताचं प्रशिक्षण घेतलेलं नसताना रॅप सॉंगकडे वळलो. त्याचं झालं असं की, मी पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयातून ऍडव्हर्टायझिंगमध्ये एमबीए केलं. तिथे हॉस्टेलमध्ये मी राहत होतो. या महाविद्यालयात भारतातील विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. जास्त विद्यार्थी हे दिल्लीतील असतात. भलेही महाविद्यालय महाराष्ट्रात असलं तरी दिल्लीची संस्कृती जास्त पाहायला मिळते. त्यामुळे तिथे रात्रंदिवस रॅपर सिंगर हनी सिंगची गाणी ऐकायला मिळायची. तसंच लहानपणापासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील रॅपर सिंगर एमिनेमचा मी फॉलोवर होतो. त्यानंतर हनी सिंग आला. मग, त्याला ऐकत ऐकत माझ्या मनात विचार आला की जर सगळे इंग्रजी व हिंदीमध्ये रॅप करताहेत; तर मग कुणी मराठीत रॅप सॉंग का करत नाही? त्या वेळी मला वाटलं की आपण रॅप सॉंग लिहिण्याचा प्रयत्न करून बघूया. मग, "ऑनलाईन बिनलाईन' चित्रपटात "ओ हो काय झालं' हे रॅप गाणं सर्वात पहिल्यांदा केलं. त्यानंतर मग थोडा वेळ घेऊन काही गाणी केली. 
आगामी "बसस्टॉप'बद्दल सांगायचं तर चांगला मल्टीस्टारर चित्रपट बनवण्याचं ठरलं होतं. या चित्रपटासाठी मी समीर जोशी सरांना फेसबुकवर मॅसेज केला आणि आमचा एकमेकांशी संपर्क झाला. हल्लीचे पालक आणि तरुण पिढी यांच्यातील जुगलबंदी "बसस्टॉप' चित्रपटात पाहायला मिळेल. तसंच पालक आणि तरुणाईच्या समस्यांचं चित्रण यात करण्यात आलंय. यात सर्व उत्तम कलाकार आहेत. 
"बसस्टॉप' चित्रपटाची सुरुवात बसस्टॉपपासून होते आणि चित्रपट संपतो तोदेखील बसस्टॉपवर. त्यामुळे या सिनेमाचं नाव "बसस्टॉप' ठेवलं. जसं एखाद्या गोष्टीबद्दल पालक मुलांना बस... स्टॉप असं सांगतात तसंच मुलंही पालकांना बस... स्टॉप असं सांगतात. एक तर माय वे किंवा हाय वे अशा सर्व गोष्टींचा विचार करून "बसस्टॉप' हे चित्रपटाला शीर्षक योग्य वाटल्यामुळे ते ठेवण्यात आलं. 
"बसस्टॉप'मध्ये असलेले सर्व कलाकार माझे मित्रच आहेत. 
निर्मिती क्षेत्रात उतरून आता फक्त तीन वर्षं झालीत. "गणराज फिल्म्स प्रॉडक्‍शन'च्या माध्यमातून चांगल्या चित्रपटांची निर्मिती करत असल्याचा खूप अभिमान वाटतो. चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये जनजागृती होईल आणि प्रेक्षकांचेही पैसे वसूल होतील, हा गणराज प्रॉडक्‍शन्सचा उद्देश आहे. 
अलीकडेच मी एका चित्रपटाचं लेखन आणि त्यातील गाणीही केली आहेत. पुण्यातील "इंदिरा कॉलेज स्कूल ऑफ मास कम्युनिकेशन'मधून मास कम्युनिकेशन शिकत असताना लेखन, दिग्दर्शन आणि कॅमेरा यांचं प्रशिक्षण मिळालं. त्याचबरोबर मला चित्रपट निर्मिती करीत असताना प्रत्यक्ष अनुभवही मिळाला. त्यामुळे मी एक चांगला चित्रपट लिहू शकलो. संपूर्ण पटकथा लिहून झालेली आहे आणि त्याच्यावर काम सुरू आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचाही माझा विचार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला दिवाळीनंतर सुरुवात होईल. 
निर्माता, लेखक, सहायक दिग्दर्शक आणि पहिला मराठी रॅपर बनल्यानंतर पुढे अभिनय करायलाही आवडेल. पण अभिनय करणं कठीण आहे. 
"बसस्टॉप' चित्रपट 21 जुलैला प्रदर्शित झाल्यानंतर एक-दोन गाणी एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटसोबत करणार आहे. त्यातील "फकाट पार्टी' हे गाणं टॉप क्‍लास पद्धतीने रशियन डान्सर आणि फरारीचा समावेश करून चित्रीत झालेलं आहे. बसस्टॉप प्रदर्शित झाल्यानंतर ऑगस्टमध्ये ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
सध्या गाण्याचं प्रशिक्षण घेतोय. मला संगीतातील काहीही ज्ञान नसताना माझ्याकडून नैसर्गिकपणे जे येतं, ते मी शेअर करतो. "वीर मराठा' हे गाणं हाय पीचवर म्हणावं लागत होतं. त्या वेळी संगीतकार म्हणाले की, तू आता कोणत्याही प्रकारचं गाणं गाऊ शकतोस. त्यामुळे एक आत्मविश्‍वास निर्माण झाला की भविष्यात मला वेगवेगळ्या पद्धतीची गाणी करायला मिळतील. 

Web Title: first martahi rapper shreyas jadhav