ऑस्करविजेत्या 'फॉरेस्ट गम्प' सिनेमाचे लेखक विन्स्टन ग्रूम यांचे निधन

टीम ई सकाळ
Friday, 18 September 2020

आजही जगातील बहुतांशी चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये 'फॉरेस्ट गम्प'चे धडे दिले जातात. आपल्या आगळ्या वेगळ्या लेखन शैलीने रसिकांना वेड लावणाऱ्या ग्रूम यांना 'फॉरेस्ट गम्प'च्या यशाने नवी ओळख दिली.

मुंबई : जाणकार, समीक्षक आणि चित्रपटप्रेमीनी 'फॉरेस्ट गम्प' पाहिला नाही असे होणार नाही. जगभरातील अनेक युवकांसाठी प्रेरणादायक चित्रपट म्हणून त्याची ओळख आहे. हा चित्रपट ज्या कादंबरीवर आधारित होता त्या कादंबरीचे लेखक विन्स्टन ग्रूम यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते ७७ वर्षाचे होते. आजही जगातील बहुतांशी चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये 'फॉरेस्ट गम्प'चे धडे दिले जातात. आपल्या आगळ्या वेगळ्या लेखन शैलीने रसिकांना वेड लावणाऱ्या ग्रूम यांना 'फॉरेस्ट गम्प'च्या यशाने नवी ओळख दिली.

हे ही वाचा:  करण जोहर, दीपिका, विकी कौशल आणि इतर सेलिब्रिटींविरोधात NCB करणार तपास, ड्रग पार्टीप्रकरणी सिरसा यांच्या तक्रारीनंतर मोठी कारवाई    

१९६५ मध्ये अल्बामा विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या ग्रूम यांनी एकूण १६ पुस्तकांचे लेखन केले. वाचकांना खिळवून ठेवणारी शैली, धक्कातंत्र, निसर्गाचा अविष्कार त्याच्या जोडीला विलोभनीय असा कल्पना विस्तार यामुळे ग्रूम यांचा वाचकवर्ग मोठा होता. विशेष म्हणजे त्यांच्या सर्वच कादंबऱ्यांना वाचकांकडून प्रेम मिळाले. मात्र या सगळ्यात 'फॉरेस्ट गम्प'ची गोष्ट वेगळी होती.

१९९४ साली 'फॉरेस्ट गम्प' या  कादंबरीवर आधारित त्याच नावाने चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद रसिकांकडून मिळाला. टॉम हँक्स याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्याने त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेचे सोने केले. या चित्रपटाला तब्बल सहा ऑस्कर मिळाले. आजही नैराश्याचे मळभ दाटून आल्यावर, मनात नकारात्मक विचारांनी घर केल्यावर कित्येकांना ग्रूम यांच्या 'फॉरेस्ट गम्प'ने मोठा मानसिक आधार दिला आहे. 

अल्बामाचे गव्हर्नर काय इवे यांनी ग्रूम यांच्या निधनाची बातमी सोशल माध्यमातून प्रसिद्ध केली. "अमेरिकन साहित्याच्या क्षेत्रातील एका प्रतिभावान साहित्यिकाचा अंत झाला आहे. ते एक महान साहित्यिक होते. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. दैवी देणगी लाभलेले ते उत्तम लेखक होते. एक लेखक व पत्रकार म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे.''

'फॉरेस्ट गम्प'च्या निमित्ताने जगभरातील चित्रपट रसिक, वाचक यांच्या ते सदैव लक्षात राहतील.  मूळ पिंड साहित्यकाचा असणाऱ्या ग्रूम यांनी १९६५ ते १९६९ या काळात सैन्यात भरती होऊन देशाची सेवा केली. आपल्या साहित्यिक कारकिर्दीत एकूण १६ पुस्तकांचे लेखन करणाऱ्या ग्रूम यांचे 'कॉन्वेर्सशन विथ द ऐनेमी' हे विशेष चर्चेतील  पुस्तक आहे.

संपादन- दिपाली राणे-म्हात्रे

forrest gump author winston groom dead at the age of 77  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forrest gump author winston groom dead at the age of 77