रिमझिम गिरे सावन

जी. बी. देशमुख
Sunday, 23 February 2020

भारतीय बैठकीत पुढ्यात मांडलेल्या पेटीवर लांबसडक बोटे फिरवीत, चेहऱ्यावर शालीनतेचा भाव राखीत अमिताभ ‘रिमझीम गीरे सावन’चे सूर आळवत असतो. भोवतीचे तरुण, सभ्य श्रोते संयम राखून दाद देत असतात.

सत्तरच्या दशकात महाविद्यालयीन तरुणांना पार्टी वगैरे करण्याचे धाडस होऊ लागले होते; पण मध्यमवर्गातील मुलांच्या पार्ट्या सोज्वळ आणि शालीन असायच्या. समोसा, सॉस, चहा असा मेनू. थोडं बजेट अधिक असेल तर शीतपेय. चेहऱ्यावर शालीनतेचा भाव घेऊन, अवघडलेपण सांभाळत मुश्‍किलीने चार-दोन मुली सामील व्हायच्या. मुला-मुलीत बोलणे मोजकेच. ज्यांच्या घरी पार्टी आहे तिथली आई बऱ्यापैकी गळा असलेल्या मुलीस गाणं म्हणायचा आग्रह करायची. मग ती मुलगी विनासंगीत-साथीचं सुमन कल्याणपूरचं एखादं भावगीत म्हणायची. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

१९७९ मध्ये प्रदर्शित ‘मंजील’ सिनेमाच्या सुरुवातीला एक घरगुती पार्टी चित्रित केली होती निर्देशक बासु चॅटर्जींनी. फरक इतकाच होता, की १९७९ मधे हिंदी सिनेमाचा अवकाश व्यापून ‘वन मॅन इंडस्ट्री’ झालेला, लार्जर दॅन लाईफ अशी छबीप्राप्त अमिताभ या साधारण बजेटच्या पार्टीत सामील होता. त्याच्या दहा वर्षांपूर्वी सुरुवातीच्या सात पडेल सिनेमांचा रतीब घालण्यात तो व्यस्त होता, तेव्हा अशा पार्टीत सामील होणं त्याला शोभलं असतं. १९७३ च्या ‘जंजीर’नंतर अमिताभ नावाचं हे तूफान मध्यमवर्गीय घरगुती पार्टीत पेटी वाजवायला बसवणं म्हणजे आयपीएलच्या दौऱ्यावर असलेल्या विराट कोहलीची राहण्याची व्यवस्था नगरपालिकेच्या शाळेत करण्यासारखं होतं.

पायजमा-शर्ट, नेहरू जॅकेट (तेव्हा जॅकेटचे नामांतरण झाले नव्हते) असा पेहराव, मित्राच्या घरात साधेपणाने सजवलेल्या भारतीय बैठकीत पुढ्यात मांडलेल्या पेटीवर लांबसडक बोटे फिरवीत, चेहऱ्यावर शालीनतेचा भाव राखीत अमिताभ ‘रिमझीम गीरे सावन’चे सूर आळवत असतो. भोवतीचे तरुण, सभ्य श्रोते संयम राखून दाद देत असतात. एका मित्राच्या लग्नानंतर नवदाम्पत्याच्या स्वागताची ती साधी बैठक असते. त्या श्रोत्यांमध्ये एक खास श्रोता असते तारुण्याने मुसमुसलेली मौसमी चॅटर्जी. पूर्ण गाण्यात तिने अमिताभवर अशी जादू केली होती, ती लाजवाबच. सुंदर, भोळा चेहरा आणि दिलखेचक देहबोली लाभलेल्या मौसमीने भुरळच घातली होती. सतरंजीवर बसलेले इतर श्रोतेसुद्धा अमिताभच्या गायकीचा आनंद घेत होते. मुद्राभिनय कशाशी खातात याचा जणू अमिताभने या गाण्यात वस्तुपाठ घालून दिला होता. किशोरकुमारच्या आवाजाची जादू, योगेशचे शब्द, आर. डी. बर्मनची कर्णमधुर चाल आणि अमिताभचा सहजसुंदर अभिनय. ही मिठास जिभेवरून कधी उतरूच नये.  

जब घुंगरूओसी बजती हो बुँदे
अरमाँ हमारे पलके न मुंदे 

एका साध्या नेपथ्यात चित्रीत झालेलं हे हळूवार, सुरेल गाणं अमिताभने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. पावसाळी वातावरणात हटकून गुणगुणावंसं वाटणाऱ्या या गाण्यात सर्द पावसाळी भाव शब्दा-शब्दातून व्यक्त झाले होते. 

हेच गाणं पुढे सिनेमात येतं ते लता मंगेशकरच्या धारदार आवाजात. त्या काळातील कमी गर्दीच्या मुंबईतील मरीन ड्राईव्हचा समुद्रकिनारा, फ्लोरा फाऊंटन, विक्‍टोरिया टर्मिनससारख्या पर्यटनस्थळावरून पायी पायी चिंब भिजत जाणाऱ्या अमिताभ-मौसमीचे दर्शन आपणास होते आणि पार्श्वभूमीला असतो लता मंगेशकरचा ‘रिमझीम गिरे सावन’चा दैवी स्वर. काही बोटावर मोजता येण्यासारखी गाणी आहेत, जी लता मंगेशकरने वेगळी गायली आणि पुरुष गायकांनी वेगळी गायली, तरी लतापेक्षा पुरुष गायकांनी गायलेला भाग अधिक लक्षात राहिला. ‘रिमझीम गिरे सावन’ हे गाणं त्या अपवादांपैकी एक. पारदर्शक साडीत चिंब ओली झालेल्या मौसमीपेक्षाही भिजलेल्या सुटाबुटातील अमिताभ लक्षात राहावा, हा करिश्‍मा त्याच्या स्टारडमचा. पावसाचं पाणी साचलेली डबकी तुडवत, मुसळधार पावसाची किंवा कपड्यांवर चिखल उडण्याची तमा न बाळगता, पावसात मनसोक्त उंडारणारे हे तरुण जोडपे प्रेक्षकांना जागीच चिंब भिजल्याचा फिल देऊन जाते. पावसात चिंब भिजावे असे प्रत्येकाच्याच मनात असते; पण दैनंदिन व्यवहारात अडकलेल्या सामान्य माणसांना ते शक्‍य होत नाही. अंगावरच्या कपड्यात पावसात भिजणे तर सहसा मनाविरुद्धच होत असते. सिनेमाची तिकिटं मिळाली नाहीत म्हणून पावसात भटकायला निघालेल्या या प्रेमी युगुलाची लाडीक भटकंती पाहून रोमॅंटिक  मुडमध्ये येणार नाही, तोच खरा अरसिक.  

बासू चॅटर्जींचा हा सिनेमा तसं पाहता फारच मिळमिळीत बनला होता. त्यातील सगळ्या गोष्टी तकलादू वाटल्या होत्या. बैठकीत ‘रिमझीम गिरे सावन’ ही कोमल रचना आळवणारा अमिताभ ते गाणं गातेवेळी एक प्रामाणिक व्यक्ती वाटला होता. प्रत्यक्षात मात्र तो मित्र, आई किंवा प्रेयसी अशा सगळ्यांना भूलथापा देऊन खोटं मोठेपण मिरवण्याचा नाद असलेला एक कच्च्या मनाचा तरुण असतो. एका सी.ए. मित्राचा फ्लॅट, कार इ. वस्तू आपल्या आहेत, असे सांगून प्रेयसीला इम्प्रेस करणारा हा कमजोर हिरो अमिताभने छानच रंगवला होता. जोडीला ए. के. हंगल, सत्येन कप्पू, डॉ. श्रीराम लागूंसारखे दिग्गज चरित्र कलाकारसुद्धा होते; पण मूळ कथा शेवटपर्यंत मनाची पकड घेऊ शकली नव्हती. रोमॅंटिसिझमचा कळस ठरलेले ‘रिमझीम गिरे सावन’ हे गीत मात्र बेचाळीस वर्षे प्रेमी जिवांवर गारूड करीत राहिले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: G B Deshmukh article amitabh bacchan