गौरी - गौतमच्या "मुंबई-पुणे-मुंबई'चा तिसरा टप्पा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई- पुणे- मुंबई' हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 7 डिसेंबर 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

पुणे : "मुंबई- पुणे- मुंबई' हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 7 डिसेंबर 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त चित्रपट कलाकारांनी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. या वेळी मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीने खूप गप्पा मारल्या, अनेक अनुभव सांगितले. स्वप्नील म्हणाला, "तिसरा भाग असणारा "मुंबई- पुणे- मुंबई' हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. हा एक मोठा प्रवास ठरणार आहे हे खरेतर आम्हालाही ठाऊक नव्हते. याचे सगळे श्रेय दिग्दर्शक, निर्मात्यांना आहे. नातेवाइकांची, मित्र मंडळींची जशी उत्सुकता असते पुढे काय? तशीच उत्सुकता प्रेक्षकांची या चित्रपटाविषयी आहे.

या जोडप्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यांचा संबंध बऱ्याच लोकांनी आपल्या आयुष्याशी जोडला आहे. या शूटिंगची गंमत सांगायची म्हणजे सारसबागेत या तिसऱ्या भागाचे शूटिंग करताना हजारोंनी लोक जमले होते. त्यांनी क्‍लिप्सही घेतल्या, पण सतीश राजवाडेंनी त्यांना विनंती केली सिनेमा रिलीज होईपर्यंत या क्‍लिप्स कुठे टाकू नका. आपल्या आवडत्या सिनेमासाठी लोकांनी ते ऐकले. असे लोकांचे या चित्रपटाविषयी प्रेम आहे.'' 

मुक्ता म्हणाली, ""करिअरला प्राधान्य देत संसाराचा गाडा सांभाळणाऱ्या गौरी, गौतमच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार म्हटल्यावर दोन्ही घरात काय काय घडते, हे या चित्रपटात आहे. त्यांना होणारे मूल आता पुणेकर असेल की मुंबईकर, असाही लोक विचार करत आहेत. मी पुणेकर आहे आणि यामध्ये पुणेकरांच्या अभिमानाचे असे ढोलवादन मी करणार आहे. यातील गाणीही प्रेक्षकांना ताल धरायला लावतील अशीच आहेत. "गं साजणी' हे "पिंजरा' चित्रपटातील गाजलेले गाणे नव्या रूपात प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. "आई तू, बाबा मी होणार गं' हे गाणेही तसेच सगळ्यांना ठेका धरायला लावणारे आहे. आम्हीदेखील गाणे मोठ्या पडद्यावर कसे दिसते, हे बघायला उत्सुक आहोत. यातील भूमिका करताना मला व्यक्तिशः स्वप्नीलने फार मदत केली कारण त्यातील अनुभवी तो आहे.'' 

"मुंबई- पुणे- मुंबई-3' मध्ये आणखीही दिग्गज कलाकार जोडले गेले आहेत. रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे असून, चित्रपटाचे निर्माते एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gauri Gautam s Mumbai Pune Mumbai 3