मुलापेक्षा सून ठरतेय वरचढ...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

‘कलर्स’ मराठी वाहिनीवरील ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत मात्र एक वेगळ्याच प्रकारचा सामाजिक संदेश देण्यात आलाय...

सध्या मालिकांमधून काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. कधी प्लास्टिक वापरू नका; तर कधी कचरा इतरत्र फेकू नका, असे काही ना काही संदेश देण्यात येतात. ‘कलर्स’ मराठी वाहिनीवरील ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत मात्र एक वेगळ्याच प्रकारचा सामाजिक संदेश देण्यात आलाय.

एरव्ही मुलाचं कितीही चुकू दे; सूनच कशी चुकीची हे वेळोवेळी तिला ऐकवले जाते. मुलगा असू दे किंवा मुलगी आपल्या पाल्याचे काहीही चुकले तरी त्याला पाठीशी घातले जाते आणि सुनेला हिणवले जाते. पण घाडगे अँड सून या मालिकेत मात्र आजेसासू म्हणजे माई आपल्या नातवाला म्हणजेच अक्षयला घराबाहेर काढून आपल्या नातसूनेची बाजू घेत तिच्या बाजूने खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. या मालिकेत सुरू असलेल्या ट्रॅकबद्दल बोलताना या मालिकेत अमृताची भूमिका करणारी भाग्यश्री लिमये म्हणाली, ‘मला असे वाटते की खरेच ही कल्पना खूप वेगळी आहे. कारण बऱ्याच वेळेला असे होते, की आपला मुलगा चुकलेला असला तरी मुलाला पाठिंबा दिला जातो आणि सुनेलाच दोष दिला जातो. पण आमच्या मालिकेत मुलगा चुकला तर त्याला शिक्षा करा, त्याला दोष द्या. सून ही तुमची जबाबदारी आहे. तिला दूर करू नका, असा  संदेश देण्यात आलाय.

अशा अनेक केसेस आपण पाहतो. लोकांना हे कळायला हवे, की ती मुलगी सगळे सोडून तुमच्या घरी आलेली असते. तिची ओळख बदलून ती तुमच्यात राहायला आलेली असते. त्यामुळे तिची जबाबदारी ही सासरच्यांची असते. ती तुमची मुलगी आहे असे समजून तिला वागवले पाहिजे. जसे आमच्या मालिकेत दाखवलेय तसे प्रत्येक घरात असायला हवे, असे मला वाटते. खरे स्त्री सबलीकरण म्हणजे हे आहे, असे मी म्हणेन.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ghadge and suun daily soap message

टॅग्स