
Ghar Banduk Biryani: परशा पुन्हा येतोय प्रेमाचं याड लावायला.. या हिरोईनसोबत करणार रोमान्स
Ghar Banduk Biryani: आशेच्या भांगेची नशा भारी अशी हटके टॅगलाईन असलेल्या घर, बंदूक, बिरयानी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर लाँच झालं. सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.
सिनेमात हिरोईन आहे की नाही असा प्रश्न सर्वांना पडलाय. पण सिनेमात हिरोईन आहे आणि आकाश तिच्यासोबत प्रेमाचं याड करताना दिसणार आहे.
(ghar banduk biryani movie new song)
व्हॅलेंटाईन डेच्या आधीच घर , बंदूक, बिरयानी सिनेमातलं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या गाण्याचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या गाण्यात आकाशची हिरोईन दिसतेय.
आकाश मित्रासोबत टेकडीवर चालत असतो आणि तो हातातलं फुल खाली फेकतो. ते फूल नदीतून वाहत वाहत हिरोईन जवळ येतं. हिरोईन ते फूल उचलते आणि स्मितहास्य करत आकाशकडे बघते.
यानिमित्ताने घर बंदूक बिरयानी सिनेमात अभिनेत्री सायली पाटील हिरोईन म्हणून दिसणार आहे. त्यामुळे आकाश आणि सायलीचा रोमान्स सिनेमात पाहायला मिळेल. सायलीने याआधी नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या हिंदी सिनेमात अभिनय केलाय.
उद्या व्हॅलेंटाईन डेच्या आधीच आकाश आणि सायलीचं गुनगून गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ए. व्ही. प्रफुलचंद्र यांनी या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी स्वीकारली आहे. आजवर मराठीत कधीही न ऐकलेलं संगीत घर बंदूक बिरयानी निमित्ताने प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.
दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ या सिनेमाचा भन्नाट टिझर काही महिन्यांपूर्वी रिलिज झाला होता. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक सिनेमात दिसत होती.
हा सिनेमा येत्या ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र आता या सिनेमाची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा सिनेमा ७ एप्रिल २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे