
‘घुम्या’ लघुपटाचा देशविदेशांत सन्मान
- महिमा ठोंबरे
पुणे - पारंपारिक समाज व्यवस्थेत दुय्यम जातीचा म्हणून हिणवला गेलेला, मेलेले जनावर उचलण्याचे काम करणारा आणि त्यातच मानसिक आजाराने ग्रस्त असलेला छोट्याशा गावात राहणारा एक तरुण. या तरुणाला एक व्यक्ती प्रलोभने दाखवून त्याचा धर्म बदलण्याचा प्रयत्न करतो. पुढे नक्की काय होते? त्या तरुणाचे आयुष्य सुकर होते की त्याच्या अडचणी अजूनच वाढतात? अशा प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या आणि या कथेच्या अनुषंगाने समकालीन वास्तवावरही टोकदार भाष्य करणारा ‘घुम्या’ हा लघुपट पुणेकर तरुणांनी तयार केला आहे. या तरुणांच्या प्रयत्नांची दखल घेतली जात असून देशविदेशांतील प्रतिष्ठेच्या महोत्सवांमध्ये या लघुपटाला पुरस्कार मिळाले आहेत.
या लघुपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक राहुल लामखडे म्हणाले, ‘संतोष पद्माकर पवार यांच्या काही कवितांचे आम्ही सादरीकरण करत असू. त्यातील ‘बाळू पिराजी’ नावाची कविता मी सादर करायचो. सत्य घटनेवर आधारलेली ही कविता आहे. या कवितेवर काहीतरी करायला हवे, या विचारातून लघुपटाची संकल्पना सुचली आणि म्हणून त्याची निर्मिती झाली. ग्रामीण भागात जातीवरून भेदभाव करण्याचे वास्तव आजही कायम आहे. पोटापाण्याचे प्रश्न सुटलेले नसताना धर्म आणि जातीच्या जंजाळात आपण अडकलेले आहोत, हे यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लघुपटातील मध्यवर्ती भूमिका नक्की ‘घुम्या’ आहे की आपणही ‘घुम्या’ ठरत आहोत, असा प्रश्न लघुपट पाहिल्यावर नक्कीच पडतो.’
या लघुपटाची निर्मिती सुशील भोर यांनी केली असून लघुपटाची मूळ कथा संतोष पवार यांची आहे. पटकथा व दिग्दर्शन राहुल लामखडे यांचे आहे. ‘घुम्या’ची अर्थात ‘बाळू’ची मध्यवर्ती भूमिका किशोर वाघमारे या अभिनेत्याने साकारली आहे. त्यांच्यासह डॉ. संजय लकडे, निशा काथवटे, धनंजय सरदेशपांडे आदींनी विविध भूमिका साकारल्या आहेत. सिनेमॅटोग्राफी विवेक सुराडकर यांनी, एडिटिंग मदन काळे यांनी तर ध्वनीमुद्रण रेणुका जोशी यांनी केले आहे. तसेच, लघुपटात असेलेले अकमेव गाणे गायक अभिजीत कोसंबी यांनी स्वतः लिहिले असून त्यांनीच त्याला चाल लावून पार्श्वगायन केले आहे.
लघुपटाला मिळालेले पुरस्कार -
१) १२ वा गंगटोक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - विशेष उत्कृष्ट कामगिरी सन्मान, धर्मावर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपट
२) २७ वा टागोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - विशेष उत्कृष्ट कामगिरी सन्मान (लघुपट विभाग)
३) ५ वा कुकू आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट आभासी वास्तव पुरस्कार
४) भारतीय आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव - सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट
या प्रतिष्ठेच्या महोत्सवांमध्ये झाली निवड -
१) केरळ लघुपट महोत्सव, केरळ
२) पिनवूड स्टुडिओजचे फिल्ममेकर सेशन, इंग्लंड
३) बंधुप्रेम आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, कल्याण
४) नावाडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, बिहार
५) भारतीय आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, पश्चिम बंगाल
६) क्लॅपबोर्ड गोल्डन फेस्टिव्हल, ब्राझील
७) वन अर्थ अवॉर्ड्स, कर्नाटक
८) सन ऑफ द इस्ट अवॉर्ड्स, पश्चिम बंगाल
९) पुणे लघुपट महोत्सव, पुणे
Web Title: Ghumya Short Film Honored Abroad Entertainment Movie
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..