
Giraki Movie PIFF 2023 : निसर्गाला 'गिरकी' पसंत नाही ती फक्त 'मानवी' व्यवहारातच!
Giarki Movie PIFF 2023 : थोरोला सगळं काही थोतांड वाटलं आणि तो जंगलाच्या कुशीत जाऊन विसावला. आपलं घर आपणच बांधलं, जेवण स्वतःच बनवायचा. शेवटी काय तर त्याला असा समाज नको होता, जो कायम तुम्हाला वेगवेगळया पातळ्यांवर जोखत राहील. त्यामुळे जग काय म्हणेल याचा जास्त विचार न करता तो त्याला वाटेल तेच करत राहिला. त्यातून त्याला जे स्फुरलं, उमगलं ते आजही सर्वात जास्त समजावून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
अचानक थोरोचा संदर्भ द्यावासा वाटला त्याचं कारण पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आलेल्या गिरकी चित्रपटानं साऱ्या प्रेक्षकांचे, अभ्यासकांचे आणि चित्रपटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठी कॉम्पिटिशन मध्ये ज्या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होती त्या गिरकीमधून निसर्गाचा व्यवहार आणि मानवी व्यवहार यांच्यातील फरक मार्मिकपणे समजावून सांगण्यात आला आहे. आपल्याला आपण जोपर्यंत काय आहोत हे माहिती नसतं तोपर्यंत आपलं जग किती छान, वेगळं असू शकत हे सूत्र निसर्गाच्या साह्याने दिग्दर्शक कविता दातीर, अमित सोनवणे यांनी दाखवून दिले आहे.
Also Read - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम
भलेही गिरकीचा वेग थोडासा मंदावलेला वाटेल पण त्यालाही दिग्दर्शकाने निसर्गाला कोणतीही घाई पसंत नाही तेव्हा त्याच्या वाटेनं जेव्हा आपण जातो तेव्हा सारं कसं नितळ आणि पारदर्शी वाटायला लागतं हे आशयपूर्ण प्रतिमांचा, चिन्हांचा खुबीनं वापर करत दाखवून दिले आहे. गिरकी हा तुम्हाला सुरुवातीपासून वेगळ्याच विचारविश्वात नेतो. जिथे मुळात आपण निसर्गात असल्यानंतर कोण असतो, आणि जेव्हा बाह्य परिवेशाच्या प्रभावानं आपल्यात काय बदल होतो याचं रुपांतरण गिरकीमध्ये सुंदररित्या करण्यात आले आहे.

Giraki Movie PIFF 2023
गिरकी मध्ये घनदाट जंगल आहे, किर्र रात्र आहे, चित्रविचित्र आवाज करणारी श्वापदं आहेत. उगवतीचा आणि मावळतीचा सूर्य आहे. त्या घनदाट जंगलात असलेल्या एका जुन्या वाड्यातील अक्राळ विक्राळ पसरलेली मुळंही आहेत...ती मूळ तुमच्या आमच्यात वर्षानुर्षा असलेल्या मळकट विचारांचे प्रतीक आहे. आपण अजूनही त्याच दलदलीत किती खोलवर रुतून बसलो आहोत हे तर त्यातून दिग्दर्शकाला सुचवायचे नसेल ना असा प्रश्न तुमच्या आमच्या मनात घर करु लागतो. जंगलातील त्या दोन पायवटाही तुम्हाला खूप काही सांगून जातात. आयुष्यभर आपल्यासमोर दोन पर्याय असतात...आपण कोणता निवडतो, तो का, त्यामागील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय संदर्भ आपल्या लक्षात येत नाहीत की आपण त्यांना सोयीस्करपणे विसरतो असा प्रश्न दिग्दर्शक आपल्यापुढे उभा करतो.

Giraki Movie PIFF 2023
चाकोरी मोडून काही वेगळी मांडणी करून वास्तव परिस्थिती मांडण्याचा दिग्दर्शक दातीर आणि सोनवणे यांचा प्रयत्न कौतकास्पद म्हणावा लागेल. कथानक दमदार आहे त्याला ज्या कौशल्यानं सिनेमॅटोग्राफर रोहन मरोडकर यांनी पडद्यावर आणले आहे त्याबद्दल त्यांचे कौतूक. गिरकी ज्या कलाकारांच्या अभिनयानं आपल्या मनात घर करतो, वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतो त्या अभिनेता सुयश झुंझूरके आणि प्रमिती यांचेही कौतूक करावे लागेल. त्यांनी आपल्या भूमिकांना न्याय देत निसर्ग आणि व्यवहारी जग यांच्यातील द्वंद अभिनयानं प्रेक्षकांपर्यत पोहचवले आहे.
पॅराग्लायडिंग करणारी ती जेव्हा अपघातानं एका जंगलात सापडते तेव्हा तिला घरी जाण्यासाठी काही वाट सापडत नाही. ती घाबरुन जाते. त्या घनदाट जंगलामध्ये मोठ्यानं मदतीसाठी साद घालते. त्या सादेला प्रतिसाद काही केल्या मिळत नाही. थकल्या, घाबरल्या मनानं त्या जुन्या वाड्यात येवून पोहचते. तोच तो वाडा ज्याच्या भिंतीमध्ये झाडांच्या मुळ्या खोलवर शिरल्या आहेत. आजुबाजुला सगळं निबिड अरण्य आहे. जागोजागी तुटलेल्या भिंती आहेत. त्यात एका भिंतीच्या आडोशाला तिला तो दिसतो.
भिंतीच्या आड बसलेला तो भेदरलेल्या अवस्थेत बसला आहे. दोघांनाही आता त्या जंगलातून बाहेर पडायचे आहे. पण मार्ग सापडत नाही. दरम्यान निसर्गाच्या सानिध्यात त्या दोन जीवांचा प्रवास सुरु होतो. अखंड संवाद सुरुच राहतो. दरम्यान निसर्ग आणि प्रत्यक्ष व्यवहारवादातील गोष्टींवर होणारी त्यांची चर्चा, त्याचे वेगवेगळे संदर्भ ऐकत आपण एका निर्णायक वळणावर येऊन ठेपतो. त्यानंतर जे घडतं हे गिरकी घेतल्याशिवाय कळणार नाही.

Giraki Movie PIFF 2023
दिग्दर्शकाने काही मुलभूत प्रश्न गिरकीच्या निमित्तानं आपल्या समोर उभे केले आहेत. जे आजही तितकेच महत्वाचे आहे. सोयीनुसार वाट निवडायची की, काही ठोस भूमिका घेऊन वेगळ्या वाटेनं जायचं या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी गिरकी आपल्याला मदत करतो. असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पिफमध्ये प्रेक्षकांचे, चित्रपट अभ्यासकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या गिरकीनं अनेकांना कोड्यात टाकले आहे एवढं मात्र नक्की.
-----------------------------------------------------------------------------------------------
चित्रपटाचे नाव - गिरकी
दिग्दर्शक - कविता दातीर, अमित सोनवणे
निर्माता - गणेश शिंदे, कविता दातीर
कलाकार - सुयश झुंजूरके, प्रमिती
छायांकन - रोशन मरोडकर
संकलन - अमित सोनावणे
संगीत - सारंग कुलकर्णी