'सेव्हनटिनर्स': वर्ग-जात संघर्षाची 'अल्लड'बाजी : PIFF 2023 Movie Review | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seventeeners

'सेव्हनटिनर्स': वर्ग-जात संघर्षाची 'अल्लड'बाजी : PIFF 2023 Movie Review

वर्गीय-जातीय भेदभाव भारतीय समाजासाठी नवा नाही. आजही तो आपल्यामध्ये कुठल्याही क्षणी उफाळून येऊ शकतो. संविधानानं हा भेदभाव कायदेशीररित्या मिटवला असला तरी तो भारतीय मानसिकतेत अद्याप टिकून आहे, त्याची पाळमुळं घट्ट रोवली गेलीत. या विषयावरचं राजकारणंही आपल्यासाठी नवं नाही, अतिमहत्वाकांक्षी लोक याचा कसा वापर करु घेतील सांगता येत नाही. याच मानसिकतेतून तुमच्यामधीलं मेरिटचे निकष काय असावेत? यावरही अनेकदा वाद होतात, अशा अनेकविध गोष्टीवर भाष्य करणारा कन्नड सिनेमा ज्याचं नाव आहे, हडिनेलेंतू (Seventeeners) (सेव्हनटिनर्स).

२१वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सध्या पुण्यात सुरु आहे. यामध्ये 'हडिनेलेंतू' या सिनेमाचं स्क्रिनिंग झालंय. बुसान इंटरनॅशन फिल्म फेस्टिवल, केरळ इंटरनॅशन फिल्म फेस्टिवल तसेच इफ्फीचा प्रवास करत हा सिनेमा पिफमध्ये दाखल झाला आहे. १२३ मिनिटांचा हा सिनेमा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासात सिनेमाची कथा प्रसंगानुरुप वेगानं पुढे जात राहते. नीरज मॅथ्यूनं साकारलेला हरि आणि शर्लिन भोसले हीनं साकारलेली दीपा या दोन प्रमुख पात्रांसह सुरु झालेल्या या सिनेमात कथेनुसार दोघांचे कुटुंबीय, कॉलेजचे प्राचार्य-उपप्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पोलीस, वकील, न्यायाधीश आणि समाज अशी सर्व कॅऱेक्टर्स टप्प्याटप्प्यानं सामिल होत जातात.

सेव्हेनटिनिअर्स या इंग्रजी टायटलवरुन टीनएजर्सचा हा सिनेमा आहे हे ठळकपणे कळतं...आपल्याकडं जुन्यातली एक प्रसिद्ध लावणी आहे, 'सोळावं वरिस धोक्याचं', पण या सिनेमात सतरावं वर्ष धोक्याचंए कारण अल्पवयीन असणं अन् प्रौढ होणं यात केवळ एका वर्षाची सीमारेषा आहे. दिग्दर्शक पृथ्वी कोनानूर यांनी सहज घडणाऱ्या गोष्टी वाटतील अशा तरल पण समाज व्यवस्थेवर थेट भाष्य करणाऱ्या पद्धतीनं या सिनेमाचं दिग्दर्शन आणि पटकथालेखनं केलंय. सिनेमा कमर्शिअली हेतूनं बनवलेला नाही पण म्हणून तो तुम्हाला एन्टरटेन करत नाही असं नाही. त्यावर नागराज मंजुळे टाईप सिनेमाची छापही नाही.

सिनेमा नक्की काय सांगतो?

सेव्हेनटिनिअर्सच्या पहिल्याचं सीनमध्ये बारावीच्या वर्गात शिकणारे हरि आणि दीपा कॉलेजमध्ये एका वर्गात जातात तिथं कोणीही नसतं. दीपावर आपण प्रेम करतो हे सांगण्यासाठी तो 'आयलव्हयू' अक्षरांचं पेंडंट असलेली एक सोन्याची चैन तिला भेट देतो. या क्षणी त्यांच्यातील हार्मोन्सही जागृत होतात आणि या दोघांना मान्य असले तरी समाजाला अमान्य असलेली गोष्ट करुन बसतात. एक थ्रील म्हणून मोबाईलमध्ये याचं चित्रिकरणही करतात. सतत इंटरनेटवर काहीबाही क्लिप्स बघणाऱ्या मुलांसाठी ही बाब आता सहज झालीए. या घटनेनंतर ही क्लिप शेअर करण्याची घाईही तितकीच. त्यामुळंच हरि ही व्हिडिओ क्लिप जवळच्या मित्रांना दाखवतो, हे मित्र त्याला आपल्या वयाला शोभेल असेच सल्ले देतात. क्लीप इंटरनेटवर टाकल्यास फेमस व्हाल, इतकंच नाही तर बिगबॉसमध्येही जालं असं सांगितलं जातं. त्यानंतर ही क्लिप थेट पॉर्नोग्राफी साईटवर अपलोड होते अन्.....

कॉलेजच्या प्राचार्यांच्या कानावर या गोष्टी येतात. प्राचार्य हरि आणि दीपा या दोघांनाही आपल्या केबिनमध्ये बोलावतात. त्यानंतर सिनेमाच्या शेवटापर्यंत डॉमिनन्ट पदावर असलेल्या प्राचार्यांची ही केबिन सिनेमात वारंवार दिसत राहते. हरि आणि दीपाच्या पालकांना कॉलेजमध्ये बोलावलं जातं आणि सर्वकाही रितसर त्यांच्या कानावर जातं. त्यानंतर दोन्ही विद्यार्थ्यांना कॉलेजमधून निलंबित करण्याच्या हालचाली सुरु होतात. यावर एक कमिटी बसते अन् या दोघांबाबत निर्णय घेते. ही कथित कमिटी तीनवेळा आपला निर्णय बदलते. शेवटी दीपाला एकटीलाच निलंबीत करायचं ठरतं....

पण यामध्ये एक ट्विस्ट आहे. मोठा वर्ग आणि जात संघर्ष या निर्णयात पहायला मिळतो कारण मुलगा उच्चवर्णीय ब्राह्मण कुटुंबातला तर मुलगी दलित कुटुंबातली आहे. स्पोर्ट्स स्टॅटिस्टिक्समध्ये करिअर करण्यास इच्छुक असलेला हरि अभ्यासात हुशार त्यातल्या त्यात गणितात ९० टक्के मार्क घेणारा. पण त्याच्या तुलनेत दीपा जेमतेम ५० टक्के मिळणारी, कॉलेजमध्ये दोनदा भांडणामुळं चर्चेत आलेली पण व्हॉलिबॉलमधील अव्वल खेळाडू, राष्ट्रीय पातळीवर तिची निवड झालेली पुढे ती इंटरनॅशनलची तयारीही करत असते. हे सर्व दोघांना कॉलेजमध्ये राहुनचं करता येणार असतं. यामध्ये दोघांचं मेरिट वेगळं, ही बाब महत्वाची. निलंबनानंतर हरिपुढे इतर पर्याय असतात पण दीपासाठी सर्व दरवाजे बंद. वर्षानुवर्षे शिक्षणबंदी, मोकळढाकळं जगायला न मिळालेल्या विशिष्ठ जातीत जन्मलेल्या दीपाला मोठी भरारी घ्यायची असते, बिनधास्त रहायचं असतं, ते तिच्या देहबोलीतून ठळकपणे जाणवतं. तिचं केसांना कलर करणं, ओठांवर लिपस्टिक लावणं हे जणू आपल्या जीवनात रंग भरण्यासारखचं. पण बिकट परिस्थितीत रडू बाई न होता खमकेपणा दाखवणारी दीपा दिग्दर्शकानं विशिष्ट हेतूनचं मांडली असावी. एक मानवाधिकार कार्यकर्ती आणि दीपाची वकील म्हणून भूमिका साकारलेल्या भवानी प्रकाश या अभिनेत्रीचं पात्रही दमदार. व्यवस्थेला योग्य मार्गानं चालण्यास भाग पाडणारं तिचं पात्र बघुन तुम्हाला जयभीम सिनेमाची आठवण नक्कीच येईल.

असो सिनेमा फक्त इथेच थांबत नाही, आणखी तासभर आता वर्ग-जात संघर्ष, कॉलेजचं प्रतिष्ठेचं राजकारण, मुलगा-मुलगी या दोघांना भेदभावाची वागणूक, कायदा माहिती असणाऱ्यांचा डॉमिनन्स, उच्चवर्णीय उपप्राचार्य महिलेचा स्वार्थ, वैयक्तिक स्वातंत्र्यामुळं दीपामध्ये ठाम राहण्याचा आलेला बिनधास्तपणा सिनेमात पहायला मिळतो. यामध्ये "काहीही झालं तरी तो मुलगा आहे" हे महिला उपप्राचार्यांचं विधान असो वा "मला जर मुलगी होणार असेल तर ती नको" असं हतबलतेतून बोलणारी दीपाची सहा महिन्यांची प्रेग्नंट बहिण, ही विधानं समाजाला निर्वस्त्र करतात.

वयाच्या १७ आणि १८ व्या वर्षाच्या सीमारेषेवरला खरा संघर्ष, टीनएजर्समधील सध्याची बदलेली मानसिकता, वर्ग-जातीय संघर्ष टिकवून ठेवणारे शिकले-सवरलेले लोक. वयाच्या सतराव्या वर्षामुळं सुरु झालेली ही गोष्ट क्लायमॅक्सलाही याच आकड्यावर येऊन थांबते. या बाबी प्रत्यक्ष सिनेमात पाहणचं योग्य ठरेल, त्यासाठी यंदाच्या पिफमध्ये हडिनेलेंतू अर्थात सेव्हेनटिनर्स हा सिनेमा आजिबात चुकवू नका.

amit.ujagare@gmail.com

टॅग्स :Entertainmentmovie review