अभिनेत्री गिरीजा ओकचा 'क्वार्टर' लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षक जुन्या मालिका, चित्रपट तसेच वेबसीरिज पाहण्यात दंग आहेत. शिवाय उत्तमोत्तम लघुपटही प्रेक्षक पाहत आहेत. अशातच आणखी एक लघुपट युट्युबवर प्रदर्शित झाला आहे.

मुंबई- सध्या जमाना डिजिटलचा आहे. अधिकाधिक प्रेक्षकवर्ग वेबसीरिज पाहण्यातच आता दंग असतो. अगदी कमी कालावधीत उत्तम कंटेन्ट, फुल टू मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवायला मिळतं.  लघुपटाचे देखील अगदी तसेच आहे. लघुपटही अगदी कमी वेळात प्रेक्षकांना खूप काही सांगून जातात. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना अगदी साध्या-सोप्या भाषेत मांडण्याची ताकद लघुपटात असते. हे लघुपट मनोरंजन तर करतातच त्याचबरोबर काही तरी सामाजिक संदेशही देऊन जातात. थोड्याशा कालावधीत बरेच काही सांगून जातात हे लघुपट. त्यांच्या विषय आणि आशयामध्ये एवढी ताकद नक्कीच असते. सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षक जुन्या मालिका, चित्रपट तसेच वेबसीरिज पाहण्यात दंग आहेत. शिवाय उत्तमोत्तम लघुपटही प्रेक्षक पाहत आहेत. अशातच आणखी एक लघुपट युट्युबवर प्रदर्शित झाला आहे.

हे ही वाचा: प्रेक्षकांची नस ओळखलेली एकता कपूर लॉकडाऊनमध्येही स्वस्थ बसलेली नाही 

नवज्योत बांदिवडेकरने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. नवज्योतने याआधी बऱ्याच लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच बऱ्याच लघुपटांच्या तांत्रिक बाजूही त्याने सांभाळल्या आहेत. त्याने तयार केलेला 'क्वॉर्टर' या लघुपटाने बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारली आहे. या लघुपटाची कथा अश्विनी नावाच्या महिलेभोवती फिरणारी आहे. तिच्या जीवनात अनेक चढउतार आलेले असतात आणि त्या सगळ्या संकटांचा सामना करता करता ती व्यसनाच्या कधी अधीन होते हे तिचे तिलाच समजत नाही. त्यामुळे तिची मानसिक स्थिती बिघडते.

डाॅक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू होतात. त्यातच डाॅक्टर तिला व्यसनाधीन स्त्री म्हणून सर्टिफिकेट देतात. एके दिवशी दिवाळीच्या रात्री तिच्या घरात ती एकटी असताना नाट्यमय घडामोडींना सुरुवात होते आणि मग तिची मानसिक व भावनिक अवस्था काय होते? ती व्यसनातून मुक्त होते का? हे या लघुपटामध्ये दाखविण्यात आले आहे. 

अश्विनीची भूमिका मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले हिने साकारली आहे. तिच्या या भूमिकेला सुख आणि दुःखाच्या विविध छटा आहेत आणि गिरीजाने ही व्यक्तिरेखा उत्तमरीत्या वठविली आहे. भूमिकेतील बारकावे छान टिपण्यात ती यशस्वी झाली आहे. तिचा हा पहिलाच लघुपट आहे. नॅविअन्स स्टुडिओ प्रा. लि. या बॅनरअंतर्गत नम्रता बांदिवडेकर यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे.

नवज्योतने याआधीही बऱ्याच जाहिरातींसाठी काम केले आहे. तसेच गिरीजासारख्या सरस अभिनेत्रीला घेऊन हा लघुपट बनवण्यात आला आहे.  हा लघुपट म्हणजे गिरीजासाठी नवा अनुभव आहे. अनेक मानाचे पुरस्कार पटकावणारा हा लघुपट प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस पडतो हे पाहुयात...

 

girija oak godbole starrer short film quarter now released on youtube


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girija oak godbole starrer short film quarter now released on youtube