नातं जपणं ही आपली परंपरा... 

तेजल गावडे 
सोमवार, 19 जून 2017

भारतीय', "गुरुपौर्णिमा' या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे गिरीश मोहिते यांचा "कंडिशन्स अप्लाय-अटी लागू' हा चित्रपट 7 जुलैला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने केलेली बातचीत... 

भारतीय', "गुरुपौर्णिमा' या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे गिरीश मोहिते यांचा "कंडिशन्स अप्लाय-अटी लागू' हा चित्रपट 7 जुलैला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने केलेली बातचीत... 

काय आहे "कंडिशन्स अप्लाय-अटी लागू...' 
"कंडिशन्स अप्लाय-अटी लागू' हा चित्रपट "लिव्ह इन रिलेशनशीप'वर भाष्य करणारा आहे. लिव्ह इन रिलेशनशीप की लग्न याबद्दलचं डिबेट या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. यात सुबोध भावे, दीप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, अतिशा नाईक, मिलिंद फाटक, डॉ. उत्कर्षा नाईक अशी सगळी कलाकार मंडळी आहेत. 

लिव्ह इन रिलेशनशीपवरील चित्रपटांचा ट्रेंड... 
माझ्या मते, लिव्ह इन रिलेशनशीपवर आतापर्यंत चित्रपट आलेले नाहीत आणि या विषयावर चित्रपट आले असले तरी त्यात लिव्ह इन रिलेशनशीपचा थोडाफार उल्लेख असेल. त्याच्यावर पूर्णपणे भाष्य करणारा "कंडिशन्स अप्लाय' हा पहिलाच चित्रपट आहे असं मी म्हणेन. लिव्ह इन रिलेशनशीप ही संकल्पना पाश्‍चात्य संस्कृतीमुळे आपल्याकडे आली आहे. लोकांना बंधनात न राहता नातेसंबंध सांभाळायचेत. बंधनात राहायचं की नाही राहायचं? हा मुद्दा विस्तृतपणे इतर कोणत्या चित्रपटात दाखवलेला नाही. 

लिव्ह इन रिलेशनशीपबद्दलचं मत... 
हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. प्रत्येक जण आजूबाजूच्या परिस्थितीनुसार ठरवित असतो की कसं जगावं? नातं कसं सांभाळावं आणि ते टिकवून ठेवावं. आताच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात माणूस एकटा पडत चाललाय. त्यामुळेच आपलं मित्रमंडळी आणि कुटुंबाशी संभाषण कमी झालेलं आहे. कदाचित एकटेपणा आल्यामुळे लोक असा निर्णय घेत असतील. या बदललेल्या संस्कृतीचा आपल्यावर किती आणि कसा परिणाम होऊ द्यायचा, हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. नातेसंबंध टिकवणं ही आपली परंपरा आहे. नातेवाइकांमध्ये रमणं आणि एकलकोंडेपणा बाजूला सारून माणसांमध्ये वावरणं या गोष्टी केल्यामुळे जगण्याची एक दिशा मिळते. बहुतेकांना कमिंटमेंटमध्ये जगायचं नसतं; पण खरंतर कमिंटमेंटमुळेच जगण्याचा हेतू कळतो. 

सिनेमाविषयीचा अनुभव... 
"कंडिशन्स अप्लाय' सिनेमाचा खूप छान अनुभव होता. यातील कलाकारांपासून ते युनिटमधील छोट्या वर्करपर्यंत संपूर्ण टीम चांगली होती. या चांगल्या टीममुळेच चित्रपटही उत्तम बनला आहे. उत्तम संगीत, उत्तम लेखक, कलाकार आणि कॅमेरामन अशी मंडळी साथीला असतील तर नक्कीच तो प्रवास सुखाचा आणि चांगला अनुभव देणारा ठरतो. 

सुबोध भावे आणि दीप्ती देवीबद्दल... 
अभिनेता सुबोध भावे आणि माझी 2003 सालापासूनची मैत्री आहे. "गोजिरवाण्या घरात' या मालिकेत मी आणि सुबोध आम्ही एकत्र काम केलं आहे. तेव्हापासून आमचं छान ट्युनिंग जमलं आहे. त्यानंतर आम्ही एकत्र बरीच कामं केली आहेत. "अग्निशिखा' मालिका आणि "भारतीय' चित्रपटासाठी एकत्र काम केलं. आता "कंडिशन्स अप्लाय' या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आलो आहोत. त्याच्यासोबत काम करणं म्हणजे एक कम्फर्ट झोन असतो. तो खूपच गुणी कलाकार आहे. प्रोजेक्‍टबद्दल त्याच्यासोबत फार चर्चा करावी लागत नाही. मला काय हवंय आणि त्याला काय हवंय हे आम्हा दोघांनाही लगेच कळतं. त्यामुळे काम करायला मजाही येते आणि चांगल्याप्रकारे कामही होते. तसचं चार-पाच वर्षांपूर्वी मी आणि अभिनेत्री दीप्ती देवीने "डोन्टवरी चाचू' नामक हिंदी मालिकेत काम केलं होतं. तेव्हापासून मी दीप्तीचं काम पाहतो आहे. त्यानंतर आम्हाला पुन्हा एकत्र काम करण्यासाठी पाच वर्षं लागली. "कंडिशन्स अप्लाय'च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र सिनेमा केला. 

आगामी... 
"लालबत्ती' या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. हा पोलिसांवर आधारित चित्रपट आहे. 

 

Web Title: girish mohite interview