‘न्यूड’गंड!

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगच्या नग्न फोटोशूटमुळे देशात एक वादळ निर्माण झाल्याचे चित्र आहे.
Ranveer Singh
Ranveer SinghSakal
Updated on
Summary

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगच्या नग्न फोटोशूटमुळे देशात एक वादळ निर्माण झाल्याचे चित्र आहे.

- गिरीश वानखेडे girishwankhede101@gmail.com

छायाचित्रावर आक्षेप घेण्याची एक मोठी पंरपरा आहे. लॅक्मे फॅशन शोमध्ये अक्षय कुमारच्या जीन्स पँटची झीप त्याची बायको ट्विंकल खन्नाने काढली, त्यावर गुन्हा दाखल झाला. हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गियरने शिल्पा शेट्टीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, तो खटला शिल्पा शेट्टीवर अजूनही सुरूच आहे. ‘पी के’मध्ये आमीर खानच्या नग्न फोटोवर आक्षेप घेतले गेले होते. पोस्टरवर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला. मिलिंद सोमणने नग्न धावतानाचे फोटो काढले, त्याविरुद्धही पोलिस केस झाली आणि आता रणवीर सिंग...

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगच्या नग्न फोटोशूटमुळे देशात एक वादळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी रणवीर सिंगवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनेक जण, विशेषतः ट्रोलर्स रणवीर सिंगवर तुटून पडले आहेत. सौंदर्य म्हणजे केवळ स्त्री अशी पांरपरिक व्याख्या असणाऱ्या आपल्या देशात पुरुषांच्या सौंदर्याकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन कधी बदलणार आहे का, या चर्चेलाही तोंड फुटले आहे.

समाजात घडणाऱ्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो. त्यानुसार लोक आपल्या आपल्या पद्धतीने या घटनांकडे बघत असतात. दुसरं म्हणजे वयानुसार याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत असतो. असं म्हटतं जातं, की बुद्धिमान कल्पनावर चर्चा करतात, सरासरी बुद्धिमत्तेचे लोक घटनांवर; तर कमकुवत बुद्धिमत्ता असलेले केवळ लोकांवर चर्चा करतात. सध्या रणवीर सिंगच्या नग्न फोटो शूटच्या निमित्ताने सुरू झालेल्या चर्चेला असंच काही म्हणता येईल. खरं तर सामान्य माणसाचा आणि रणवीर सिंगच्या या फोटोशूटचा तसा काही संबंध नाही. मात्र तरीही त्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. आपल्या देशात हा एक मोठा विरोधाभास आहे की, एखाद्या पुरुष अभिनेत्याला नग्न फोटो काढायचे असले, तरी त्यावर अनेकांचा आक्षेप असतो. रणवीर सिंग एक यशस्वी अभिनेता असून, तो सध्या त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. आपल्या कसदार, वैविध्यपूर्ण अभिनयाने त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. रणवीरने शूट केलेले नग्न फोटो हे त्या अर्थाने टेस्टफूल आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने शूट केले आहे. ती असभ्यतेकडे झुकणारे किंवा पॉर्न निश्चितच नाहीत; तरीही त्यावर अनेकांचा आक्षेप आहे.

मुंबईत सामाजिक संस्था चालवणारे अखिलेश चौबे, वेदिका चौधरी यांनी अश्लीलत्ता पसरवणे, विनयभंग या आरोपाखाली विविध गुन्हे दाखल केले. खरं तर या छायाचित्रांचा आणि महिलांच्या विनयभंगाचा तसा काही संबंध नाही. बॉलीवूड असो की हॉलीवूड, एखादा अभिनेता जेव्हा नव्या भूमिकेत जातो, तेव्हा वेगळे फोटो शूट केले जातात. त्याप्रमाणे रणवीर सिंगने हे फोटो शूट केले आहेत. मात्र छायाचित्रे अश्लील नाहीत. त्याला आपण स्वीकारायला पाहिजे.

खरे तर अशा छायाचित्रावर आक्षेप घेण्याची एक मोठी पंरपरा आपल्याकडे आहे. लॅक्मे फॅशन शोमध्ये अक्षय कुमारच्या जीन्स पँटची झीप त्याची बायको ट्विंकल खन्नाने काढली, त्यावर गुन्हा दाखल झाला. हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गियरने शिल्पा शेट्टीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, तो खटला शिल्पा शेट्टीवर अजूनही सुरूच आहे. ‘पी के’मध्ये आमिर खानच्या नग्न फोटोवर आक्षेप घेतले गेले होते. पोस्टरवर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला. बिपाशा बासूच्या एका मॅगझीनमध्ये प्रकाशित झालेल्या छायाचित्रावर भोपाळमध्ये केस झाली. मिलिंद सोमणने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर नग्न धावतानाचे फोटो काढले, त्याविरुद्धही पोलिस केस झाली. पूनम पांडे, शर्लिन चोप्रा, मल्लिका शेरावतवर गुन्हे दाखल झाले. मात्र त्यांची छायाचित्रे, फोटो शूट अश्लीलतेकडे झुकणारे होते. हे कुणालाही समजेल, त्या फोटो शूटमागचा हेतूही कुणाच्याही लक्षात येईल. अश्लीलता आणि सभ्यतेमध्ये एक धुसर सीमारेषा आहे. पूनम पांडे, शर्लिन चोप्रा, मल्लिका शेरावत यांनी ही लक्ष्मणरेषा पार केली होती. मात्र रणवीर सिंग, अक्षय कुमार, बिपाशा बासू, मिलिंद सोमण हे एक जबाबदार अभिनेते होते. त्यांनी ही सीमारेषा कधीच पार केली नाही. एका प्रोजेक्टसाठी म्हणून हे फोटो शूट केले जातात. त्याला वेगळ्या दृष्टीने बघायला पाहिजे.

जस्टीन बिबर हा सुटीवर असताना त्याचे नग्न फोटो लिक झाले, ते एका मॅगझीनने छापले, त्यावर जस्टीन बिबरने आक्षेप घेतला होता. ते फोटो मॅनझीनने मागे घेतले. १९९५ मध्ये हॉलीवूडचे आघाडीचे अभिनेते ब्रॅड पीट, ग्यानेथ पाल्ट्रो हे एकमेकांना डेट करत असताना त्यांचे नग्न फोटो, ‘प्लेगर्ल’मध्ये प्रकाशित केले गेले. ब्रॅड पीटने संबंधित मॅगझीनला विनंती केली; मात्र या कारणावरून संबंधित अभिनेता, अभिनेत्रीवर काही गुन्हे दाखल केले नाहीत.

आपल्याकडे पुरुषामध्ये स्वत:च्या देहाकडे बघण्याचा एक न्यूनगंड आहे. किंबहुना आपल्याकडे सौंदर्य म्हणजे स्त्री अशीच व्याख्या आहे. स्वत:च्या शरीराकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन अत्यंत पुराणमतवादी आहे. पुरुष एकदा महिलेकडे बघेल; मात्र पुरुषांकडे बघणार नाही. रणवीर सिंगच्या नग्न छायाचित्रांवर महिलांपेक्षा जास्त आक्षेप पुरुषांनी घेतले. खरं तर रणवीर सिंगला बॉलीवूडमध्ये येऊन १५ वर्षे झाली. त्याला आता काही सिद्ध करायचे बाकी राहिले नाही. मात्र त्याला या वयात एक स्टेटमेंट द्यायचे आहे, ते म्हणजे स्वत:च्या शरीराबद्दल त्याला आत्मविश्वास आहे. मिलिंद सोमण जेव्हा ५० व्या वर्षात गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून नग्न धावतो तेव्हा तो आपल्या शरीराबद्दलचा आत्मविश्वास दाखवत असतो. दुसरं म्हणजे आपल्याकडे एका पुरुषाला दुसऱ्या पुरुषाच्या शरीराबद्दल कमालीची असुया असते. तो दुसऱ्या पुरुषाच्या शरीराचे कधीच कौतुक करत नाही. या न्यूनगंडाच्या भावनेतून रणवीर सिंग याच्या फोटोशूटवर हे वादळ उठले आहे. त्यात अश्लीलता असेल, तर खरंच गुन्हे दाखल करा, मात्र त्यात धर्म, संस्कृती कुठे आली? प्रगतिपथावर असलेल्या आपल्या देशात असा विचार चुकीचा आहे. शेवटी कला हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. त्याला सेन्सॉरशिप लावून, नैतिक पोलिसिंग करण्यात काही अर्थ नाही.

अमेरिका, युरोपमध्ये ‘एम्बर हर्ड’पासून ‘कॉलीन फॅरेल’ ते ‘किम कार्दिशीयन’पर्यंत अनेकांचे नग्न फोटो काढले. अनेकाचे फोटो लिकही झाले; मात्र तिकडे पुरुषांच्या शरीराचा आदर करून ते मान्य करतात. मात्र अजूनही आपण पांरपरिक पद्धतीने विचार करतो आणि त्याच पद्धतीने व्यक्त होतो. आपल्याकडे पहिल्या पिढीपासून पुरुष-सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित झालेला नाही. जस्टीन बिबर, ज्यूड लॉ, मिलिंद सोमण, अक्षय कुमार, रणवीर सिंग हे वेगळे अभिनेते आहेत. त्यांची वेगळी स्टाईल आहे. त्यांना वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायचे आहे. त्यांचा व्यक्त होण्याचा अधिकार मान्य करायला पाहिजे.

एखादा कलावंत चित्र रेखाटतो. काही जणांसाठी ते पेटिंग अश्लील असते, तर काही जणांसाठी सर्जनशीलता असते. आणि रणवीरचे शूट हे त्या मानाने खूप ग्रेसफूल आहे. जगाला वात्स्यायन देणारा देश आपला आहे. नव्या पिढीचे आयडॉल आता बदलले आहेत. नव्या पिढीला जुन्या मताच्या परिघात राहायचे नाही. वयाची चाळिशी पार झालेले, पोट वाढलेल्या लोकांना पुरुषांच्या नग्नतेवर आक्षेप आहेत. महत्त्वाचे म्हणजे रणवीर, बिपाशा, अक्षय कुमार यांचे चुकले असते, तर पहिले त्यांच्या घरच्यांनी त्यांना ती चूक सांगितली असती; मात्र त्यांच्या कुटुंबीयांना यात गैर वाटत नाही. आपण आता बदललं पाहिजे. शेवटी आजच्या पिढीचे आयडॉल बदलले आहेत.

(लेखक प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.