Godavari: नद्याच नाही तर आपले विचार, संस्कृतीही दूषित झाली आहे.. देवेंद्र फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

godavari marathi movie trailer launched with deputy cm devendra fadnavis

Godavari: नद्याच नाही तर आपले विचार, संस्कृतीही दूषित झाली आहे.. देवेंद्र फडणवीस

godavari movie: राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपट आता आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. या दिमाखदार सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या ११ नोव्हेंबरला 'गोदावरी' हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

ट्रेलरमध्ये जितेंद्र जोशी म्हणजेच निशिकांतचे नाशिकमध्ये राहणारे कुटुंब दिसत आहे. या हसत्याखेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण दाखवण्यात आले आहे. 'गोदावरी' नदी ही या चित्रपटाची मुख्य दुवा आहे. गोदावरी नदी जिने सुख आणि दुःख दोन्ही अनुभवले आहे, तिचे आणि निशिकांतचे एक अनोखे नाते यात दिसतेय. नदीच तर आहे, असे मानणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे, हे कोडं चित्रपट पाहिल्यावरच उलगडेल. त्यामुळे आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे, ती ‘गोदावरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची.

या चित्रपटाविषयी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “मराठी चित्रपटांचा आशय आणि दर्जा हा नेहमीच जागतिक दर्जाचा राहिला आहे. आणि याच मांदियाळीतला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे., आपल्या सर्वांकरता ही निश्चितच अभिमानाची गोष्ट अशी आहे की प्रदर्शनापूर्वीच ‘गोदावरी’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून अनेक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत.'

पुढे ते म्हणाले, 'नदीशी आपलं नातं अत्यंत जुनं आहे. संस्कृती, परंपरा या सगळ्यांचा थेट संबंध नदीशी जोडलेला आहे. दुर्दैवानं मधल्या काळात आपण नदीचं महत्व विसरलो, त्यामुळे नद्याही प्रदूषित झाल्या आणि आपले विचार, संस्कारही प्रदूषित झालेत. ते बदलणं खूप गरजेचं आहे. गोदावरी’ नदीभोवती एका व्यक्तीची कहाणी गुंफून आणि त्यातून मोठा आशय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे हे काम केलं आहे, ते अतिशय सुंदर आहे. यानिमित्तानं नदीशी असलेलं आपलं नातं पुनर्जीवित करता येईल. हा असा विषय आहे ज्यात अंधश्रद्धा नसून केवळ श्रद्धा आहे. अशा प्रकारची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीपर्यंत पोहोचणं, हा मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो.' असे महत्वाचे प्रतिपादन त्यांनी केले.