‘हाफ तिकीट’ चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार

संतोष भिंगार्डे
Thursday, 2 May 2019

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवला गेलेला, अनेक मानाचे पुरस्कार पटकावणारा आणि विशेष म्हणजे २०१७ मध्ये झालेल्या सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेला ‘हाफ तिकीट’ हा मराठी चित्रपट आता लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मुंबई - अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवला गेलेला, अनेक मानाचे पुरस्कार पटकावणारा आणि विशेष म्हणजे २०१७ मध्ये झालेल्या सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेला ‘हाफ तिकीट’ हा मराठी चित्रपट आता लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेथे प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. चित्रपट मराठीतच पाहता येणार असून, त्याला चिनी भाषेतील सब-टायटल्स दिली जाणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही गौरवाची बाब आहे.

दिग्दर्शक समित कक्कड आणि निर्माते नानूभाई जयसिंघानी यांनी हाफ तिकीट चित्रपट बनविला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेता तमीळ चित्रपट ‘काक्का मुताई’चा हा मराठी रिमेक आहे. दिग्दर्शक समित कक्कडने रिमेक करताना आपल्या मातीतील चित्रपट बनविला होता. 

सन २०१६ मध्ये तो प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभलाच. शिवाय, ३० हून अधिक चित्रपट महोत्सवांमध्ये त्याचा गौरव झाला. अनेक पुरस्कार या चित्रपटाने पटकाविले. दोन लहान मुलांच्या जिद्दीची, संघर्षाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली होती. शुभम मोरे आणि विनायक पोतदार या दोघांनी त्यात सहजसुंदर अभिनय केला होता. आता हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शनाचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत.

हाफ तिकीटच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला चीनसारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. खरे तर हिंदी चित्रपट चीनमध्ये घसघशीत कमाई करीत आहेत. आमीर खानचा ‘दंगल’, ‘पीके’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ हे चित्रपट चीनमध्ये चांगले चालले. आयुष्मान खुरानाचा ‘अंधाधून’ या चित्रपटाने चीनमध्ये ३०० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीला ही मोठी संधी आहे. ‘हाफ तिकीट’ चित्रपट अनेक महोत्सवात दाखविला गेला. तेथीलच एका चित्रपट महोत्सवात चीनमधील वितरकांनी हा चित्रपट पाहिला आणि ते चित्रपटाच्या प्रेमात पडले. 

लगेच त्यांनी चित्रपटाचे निर्माते नानूभाई यांच्याशी संपर्क साधला आणि तुमचा चित्रपट चीनमध्ये आम्ही प्रदर्शित करणार आहोत, असे सांगितले. आता सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि पुढील दोनेक महिन्यांत हा चित्रपट तेथे प्रदर्शित होईल. याबाबत निर्माते नानूभाई जयसिंघानी म्हणाले, की भारतातील केवळ सहाच चित्रपट दर वर्षी चीनमध्ये प्रदर्शित होत असतात. आता आमचा मराठी चित्रपट तेथे लागणार आहे. मराठी इंडस्ट्रीसाठी आम्ही नेहमीच काही तरी वेगळे देण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करीत असतो.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half Ticket Movie Release in China