अमिताभ आणि अभिषेक यांची प्रकृती स्थिर, त्या २६ जणांचेही आले रिपोर्ट

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
सोमवार, 13 जुलै 2020

बच्चन कुटुंबातील सदस्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आता त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचा-यांची टेस्ट देखील होणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यांच्या २६ कर्मचा-यांची टेस्ट करण्यात आली होती.

मुंबई- कोरोना व्हायरसचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. बॉलीवूडलाही एकापेक्षा एक धक्का बसत आहे. शनिवारी अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आणि बॉलीवूड हादरलं. त्यानंतर अमिताभ आणि अभिषेक दोघेही नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तर ऐश्वर्या आणि आराध्याला त्यांच्या जलसा बंगल्यामध्येच क्वारंटाईन केल्याचं कळतंय. जया सोडून बच्चन कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या कर्मचा-यांची टेस्ट देखील करण्यात आली होती.

हे ही वाचा: हेमा मालिनीने कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या चर्चांवर दिला पूर्णविराम, व्हिडिओमधून केला खुलासा

बच्चन कुटुंबातील सदस्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आता त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचा-यांची टेस्ट देखील होणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यांच्या २६ कर्मचा-यांची टेस्ट करण्यात आली होती. आता या सगळ्यांचे रिपोर्ट आले असून ते निगेटीव्ह असल्याची दिलासादायक माहिती समोर येतेय. तर दुसरीकडे अमिताभ आणि अभिषेक यांची प्रकृती देखील पहिल्यापेक्षा व्यवस्थित असल्याचं कळतंय. 

हॉस्पिटलच्या सुत्रांनुसार, अमिताभ आणि अभिषेक यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दोघेही वेळेवर जेवण घेत आहेत. तसंच औषधही वेळेवर घेत असून त्यांची प्रकृती उपचारांवर उत्तम प्रतिसाद देत आहे. यादरम्यान बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी बच्चन कुटुंबाच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील बच्चन कुटुंबियांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. लता यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी अमिताभ यांच्या ट्विटला रिप्लाय देत म्हटलं आहे, 'नमस्कार अमित जी, तुमच्यावर आणि अभिषेकवर दोघांवर ईश्वराची कृपा होईल आणि तुम्ही लवकरंच बरे होऊन घरी परत याल असा माझा विश्वास आहे.' तर राम गोपाल वर्मा यांनी देखील ट्विट करुन बिग बी नेहमीप्रमाणे यावरही मात करुन परततील असं म्हटलंय. 

अमिताभ यांच्यासोबत घरातील तीघेजण कोरोना पॉझिटीव्ह निघाल्यानंतर बीएमसीमे त्यांचे मुंबईतील चारही बंगले सॅनिटाईज करुन सील केले आहेत. अमिताभ यांच्या चारही बंगल्यांबाहेर नोटीस लावत कंटेन्मेंट झोन असं जाहीर केलं आहे. तसंच त्यांच्या संपूर्ण कर्मचा-यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.    

health update of amitabh bachchan and family under corona  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health update of amitabh bachchan and family under corona