'लक्ष्मी बॉम्ब' अडचणीत, सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

laxmi bomb
laxmi bomb

मुंबई- अभिनेता अक्षय कुमार याचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा सिनेमा ९ नोव्हेंबर या दिवशी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलीज होणार आहे. या सिनेमाचं नाव हेतुपुर्वक 'लक्ष्मी बॉम्ब' असं ठेवलं आहे त्यामुळे आमचा पहिला आक्षेप या सिनेमाच्या नावाला असून यातून कोट्यवधी हिंदूंचे दैवत असलेल्या श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली असल्याचं हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं आहे.

एकीकडे हिंदु देवतेचा अपमान करणारे 'लक्ष्मी फटाके' बंद करण्यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे प्रबोधन करत असतांना, या सिनेमाच्या नावामुळे त्यांना पुन्हा प्रोत्साहनच मिळणार आहे. तसंच या सिनेमात नायकाचं नाव 'आसिफ', तर नायिकेचं नाव 'प्रिया यादव' असल्याचं कळतंय. अर्थात त्यातून मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांचे संबंध दाखवून हेतूतः 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहनच दिले आहे. त्यामुळे 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केलीये.

शिंदे पुढे म्हणाले की, 'एकीकडे ’मोहम्मद : दी मेसेंजर ऑफ गॉड' या सिनेमामुळे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात, म्हणून त्यावर स्वतः दखल घेऊन लगेच बंदीची शिफारस महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याच धर्तीवर हिंदूंच्या देवतांचा अवमान करणा-या 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमावरही सरकारने बंदीची शिफारस करावी अशी मागणीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीने केली आहे.'

या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एका भूताने पछाडलेल्याची भूमिका साकारतोय. त्याच्यातील भूत तृतीय पंथीय असल्याचं दिसतंय. तसंच मोठं लाल कुंकू, लाल साडी, केस मोकळे सोडणे, हातात त्रिशूळ घेऊन नाचणं हे जणू देवीचंच रुप आहे असं भासवण्याचा केलेला प्रयत्न हा निषेधार्ह आहे.

दिवाळीच्या निमित्ताने 'लक्ष्मी बॉम्ब' नावाने सिनेमे काढणारे कधी ईदच्या निमित्ताने 'आयेशा बॉम्ब', 'शबीना बॉम्ब', 'फातिमा बॉम्ब' नावाने सिनेमे काढण्याची हिंमत करतील का? मुसलमानांच्या धार्मिक भावनांचा विचार सिने निर्माते आणि शासनकर्ते करतात तसा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार का करत नाहीत? हिंदूंशी पक्षपाती वागणे, हीच सर्वधर्मसमभावाची व्याख्या आहे का? हिंदुविरोध हेच जणू सध्याचं सेक्युलरीझम झालं आहे, असंही शिंदे यांनी म्हटलंय. सिनेमाची निर्माती शबीना खान आणि लेखक फरहद सामजी असल्याने जाणून बुजुन ते हिंदुद्वेष पसरवत असल्याचं लक्षात येतंय, तरी या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाची चेतावनी शिंदे यांनी दिली आहे.  

hindu janajagruti samiti seeks ban on screening of film laxmi bomb  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com