कंगना रनौत विरोधात बांद्रा कोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे दिले आदेश

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 17 October 2020

कंगनाच्या विरोधात मुंबईतील बांद्रा कोर्टाने एका प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बांद्रा कोर्टाने हे आदेश दोन व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकेवर दिले आहेत.

मुंबई- कंगना रनौत सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. सुशांत प्रकरणात सतत बॉलीवूडमधील घराणेशाही, फेवरेटिज्म आणि ड्रग्स प्रकरणावर तिने तिची केवळ प्रतिक्रियाच दिली नाही तर या प्रकरणांच्या बाबतीत अनेक खुलासे करत ही प्रकरणं लावून धरली. आता कंगनाच्या विरोधात मुंबईतील बांद्रा कोर्टाने एका प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बांद्रा कोर्टाने हे आदेश दोन व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकेवर दिले आहेत.

हे ही वाचा: कोरोनावर मात केल्यानंतर तमन्ना भाटियाचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल  

कंगनाविरोधात याचिका दाखल करणा-यांनी म्हटलंय की 'ती बॉलीवूडमध्ये हिंदू-मुस्लिम समुदायमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमापासून ते टीव्हीवर सगळीकडे बॉलीवूडच्या विरोधात बोलत आहे. ती सतत बॉलीवूड विरोधात विष ओकतेय.'

याच्या विरोधातंच दोन मुस्लिम व्यक्तींनी बांद्रा कोर्टात याचिका दाखल केली होती ज्यामध्ये म्हटलं होतं की 'कंगना रनौत तिच्या ट्विट्सच्या माध्यमातून दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्याला प्रोत्साहन देत आहे. यामुळे केवळ धार्मिक भावनांना ठेच पोहोचत नाहीये तर इंडस्ट्रीतील कित्येक लोक दुखावले गेले आहेत. त्यामुळे कंगनावर जातीयवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप लावला गेला होता. 

या प्रकरणी बांद्रा पोलिस स्टेशनने कंगनाच्या विरुद्ध हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांनी कोर्टात कंगनाचे ट्विट्स सादर केले.

सीआरपीसीच्या कलम १५६(३) नुसार कंगनाविरोधात एफआयआर दाखल होऊ शकते. एफआयआर दाखल झाल्यानंतर कंगनाची चौकशी होऊ शकते आणि जर तिच्या विरोधात ठोस पुरावे मिळाले तर तिला अटक देखील होऊ शकते.    

bandra court orders fir against kangana ranaut  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bandra court orders fir against kangana ranaut