
केवळ समंथा-नाग चैतन्यच नाही; नागार्जुन यांच्या कुटुंबातील घटस्फोटांचा इतिहास
चार वर्षांचा संसार आणि दहा वर्षांहून अधिकचं नातं मोडून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी समंथा रुथ प्रभू Samantha Ruth Prabhu आणि नाग चैतन्य Naga Chaitanya विभक्त झाली. या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. अक्किनेनी कुटुंबातील इतरही जोड्यांनी याआधी घटस्फोट घेतला आहे. नागार्जुनने प्रसिद्ध तेलुगू निर्माते डॉ. डी. रामनायडू यांची मुलगी लक्ष्मी डग्गुबतीशी लग्न केलं होतं. फेब्रुवारी १९८४ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. नाग चैतन्य हा लक्ष्मी आणि नागार्जुन यांचाच मुलगा आहे. लग्नाच्या सहा वर्षांतच नागार्जुनने घटस्फोट घेतला. १९९० साली लक्ष्मी आणि नागार्जुन विभक्त झाले.
घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर जून १९९२ मध्ये नागार्जुनने अभिनेत्री आमलाशी लग्न केलं. लग्नापूर्वी या दोघांनी काही हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. आमला आणि नागार्जुन यांना अखिल अक्किनेनी हा मुलगा आहे. अखिलसुद्धा तेलुगू चित्रपटसृष्टीत अभिनेता आहे.
नागार्जुन यांचा भाचा सुमंत यार्लागड्डाने अभिनेत्री किर्ती रेड्डीशी ऑगस्ट २००४ मध्ये लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर किर्तीने दुसरं लग्न केलं आणि अमेरिकेत राहायला गेली. सुमंतने दुसरं लग्न केलं नाही. सुमंतची बहीण सुप्रियाच्या खासगी आयुष्याविषयी फारशी माहिती नाही. मात्र तिनेसुद्धा पती चरण रेड्डीला घटस्फोट दिल्याचं म्हटलं जातं.
अखिल अक्किनेनीचं अद्याप लग्न झालं नाही. मात्र २०१६ मध्ये फॅशन डिझायनर श्रिया भूपाल रेड्डीशी त्याचा साखरपुडा झाला होता. प्रसिद्ध व्यावसायिक जीव्ही कृष्णा रेड्डी यांची ती नात आहे. मात्र वर्षभरानंतरच हा साखरपुडा मोडला. त्यानंतर श्रियाने रेसिंग चॅम्पियन अनिद्धित रेड्डीशी लग्न केलं. अखिल अजूनही अविवाहित आहे.
समंथा आणि नाग चैतन्यच्या घटस्फोटाने अनेकांना धक्का बसला आहे. २०१७ मध्ये समंथा आणि नाग चैतन्यने गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. या लग्नसोहळ्याची चर्चा सर्वत्र होती.