हॉलीवूडची सिनेपर्वणी 

Hollywood movie in 2017
Hollywood movie in 2017

सध्या "बाहुबली :द कन्क्‍लूजन' जगभरात बॉक्‍स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. बाकीचे सिनेमे त्यापुढे फिके पडत आहेत. तरीही इंग्रजी सिनेमांना त्यांचा वेगळा असा प्रेक्षक असतो. हॉलीवूडमध्ये बॉलीवूडचे सर्व सिनेमे पाहूनच भारतातील प्रदर्शनाच्या तारखा ठरवल्या जातात; तसेच वर्षाचे नियोजन केले जाते. अशाच काही नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या हॉलीवूड सिनेमांवर एक नजर... 

भारतात क्रिकेट आणि सिनेमा हे एखाद्या धर्मासमान आहेत. भारतीय जनतेवर क्रिकेट आणि सिनेमाचा खूप पगडा आहे. भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे, हे हॉलीवूडनेही चांगलंच ओळखलंय. 90 च्या दशकापासून हॉलीवूडपट भारतात प्रदर्शित होतात. पूर्वीच्या मानाने, सध्या प्रदर्शित होणाऱ्या हॉलीवूडपटांच्या संख्येत प्रचंड वाढ झालीय. पूर्वी प्रदर्शित होणारे चित्रपट बहुतकरून व्यावसायिक असत. आता मात्र निरनिराळ्या विषयांवरचे सिनेमे येऊ लागले आहेत. बरेचसे वर्ल्ड सिनेमादेखील प्रदर्शित होत आहेत. वर्ल्ड सिनेमाचे विषय, हाताळणी, सादरीकरण सगळ्याच बाबतीत नावीन्य असते. प्रेक्षकही काळानुसार प्रगल्भ होत आहे. 

भारतीय प्रेक्षकांची लोकसंख्या प्रचंड असल्याने प्रत्येक व्यक्तीची अभिरुचीदेखील तितकीच वेगळी आहे. यामुळे तऱ्हेतऱ्हेच्या विषयांवर आधारित चित्रपट भारतात प्रदर्शित होतायत. साधारणत: उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवाळीच्या सुमारास मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित होतात. 

मागील वर्षी (2016) डिस्नेच्या जंगल बुकने धमाल उडवून दिली होती. या चित्रपटाने फक्त भारतात तब्बल 185 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या वर्षी फास्ट ऍण्ड फ्यूरियस मालिकेतला आठवा भाग प्रदर्शित झाला. त्याने फक्त भारतामध्ये तब्बल 85 कोटी रुपये कमावले. त्याखालोखाल, या वर्षीचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट, "एक्‍स मेन' चित्रपट मालिकेतील दहावा भाग "लोगन' हा ठरला. या चित्रपटाने सुमारे पस्तीस कोटी रुपये कमावले. "रिटर्न ऑफ द झॅंडर केज' हा विन डीजेल अभिनित चित्रपट सुप्रसिद्ध ट्रिपल एक्‍स मालिकेतला तिसरा भाग आहे. भारतीय तारका दीपिका पदुकोण यामध्ये असल्याने, या चित्रपटाची भारतातही चर्चा होती. हा चित्रपटही यशस्वी ठरला. त्याने 31 कोटींची कमाई केली. या वर्षी आत्तापर्यंत मोजके अकरा-बारा हॉलीवूडपट भारतात प्रदर्शित झाले. पण नुकतेच प्रसिद्ध दिग्दर्शक रिडले स्कॉटचा "एलियन कोवेनंट', प्रसिद्ध दिग्दर्शक गाय रिचीचा "किंग आर्थर : लीजंड ऑफ द स्वोर्ड', "गार्डियन्स ऑफ द गॅलेक्‍सी- 2' हे तीन मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पैकी एलियन कोवेनंट हा एलियन मालिकेचा भाग आहे. दिग्दर्शक रिडली स्कॉटने 1879 मधे एलियन चित्रपट बनवून या साय फाय हॉरर चित्रपटमालिकेची सुरवात केली. आता तब्बल अडतीस वर्षांनी रिडली पुन्हा एलियन मालिकेकडे वळलाय. यादरम्यान एलियन मालिकेतले तब्बल पाच भाग येऊन गेले. 2012 मध्ये आलेल्या प्रोमेथिअसचा, एलियन कोवेनंट हा पुढचा भाग आहे. या चित्रपटाचे बजेट आहे साडेअकरा कोटी अमेरिकन डॉलर्स. साय फाय हॉरर प्रकार आवडणाऱ्यांना एलियन कोवेनंट आवडण्याची शक्‍यता आहे. एलियन मालिकेतले आधीचे चित्रपट बघितले असल्यास कोवेनंट अधिक आवडेल. त्यातले संदर्भ कळतील. एलियन कोवेनंट पाहण्याआधी 2012 चा प्रोमेथिअस पाहणे आवश्‍यक ठरते. 
"किंग आर्थर : लीजंड ऑफ द स्वोर्ड' हा प्रसिद्ध दिग्दर्शक गाय रिचीचा चित्रपट. या चित्रपटाचे बजेट आहे साडेसतरा कोटी अमेरिकन डॉलर्स. किंग आर्थर या परीकथेला, दिग्दर्शक गाय रिचीने त्याच्या खास शैलीत सादर केलंय. प्रचंड मोठ्या आकाराचे प्राणी, जादूने आग निर्माण करणे, मन:शक्तीचा वापर करून मोठ्या प्राण्यांना काबूत आणणे, वेगवान घटना, या सगळ्यातून एक अद्‌भुत असं जग उभं करण्यात आलंय. चित्रपटात मोठ्या प्रमाणावर साहसदृश्‍ये आहेत. आर्थर आणि वोर्टीजन यांच्यातला संघर्ष रंजक पद्धतीने दाखवण्यात आलाय. दिग्दर्शकाची खास शैली, त्याने उभं केलेलं जादूई विश्व, स्मरणात राहणारी पात्रे याकरता "किंग आर्थर : लीजंड ऑफ द स्वोर्ड' पाहायला हरकत नाही. 

या आठवड्यातला तिसरा चित्रपट "गार्डियन्स ऑफ द गॅलेक्‍सी 2' हा प्रसिद्ध अमेरिकन स्टुडियो मार्व्हलची निर्मिती आहे. हा चित्रपट मार्व्हलने निर्मिती केलेला पंधरावा चित्रपट आहे. 

2014 मध्ये आलेल्या "गार्डियन्स ऑफ द गॅलेक्‍सी' या सिनेमाचा हा सिक्वेल, म्हणजे पुढचा भाग आहे. याचे निर्मितीमूल्य आहे तब्बल वीस कोटी अमेरिकी डॉलर्स! "गार्डियन्स ऑफ द गॅलेक्‍सी 2' मध्ये गार्डियन्स आकाशगंगेमधे प्रवास करताना पाहायला मिळतील. पीटर क्विल या पात्राच्या खऱ्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न हे गार्डियन्स करतात. या सिनेमाने आत्ताच, निर्मितीखर्चाच्या तिपटीहून अधिक कमाई केलीय. ख्रिस पॅट, विन डीझेल, जो सलडाना, ब्रॅडली कूपर, सिल्वेस्टर स्टेलोन, कर्ट रसेल यांसारखे मोठमोठे अभिनेते "गार्डियन्स ऑफ द गॅलेक्‍सी 2'मध्ये आहेत. हा सिनेमा 2D बरोबरच, 3D आणि IMAX 3D या स्वरूपातही प्रदर्शित करण्यात आलाय. गार्डियन्स ऑफ द गॅलेक्‍सी मालिकेत यापुढेही अजून एक भाग बनण्याची शक्‍यता आहे. 

सध्या "बाहुबली : द कन्क्‍लूजन' देशभरात आणि जगभरात बॉक्‍स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. बाहुबलीचा तिसरा आठवडा सुरू आहे. सोळाव्या दिवसापर्यंत या सिनेमाने 1330 कोटी रुपये कमावले आहेत. बाकीचे सिनेमे त्यापुढे फिके पडत आहेत. तरीही इंग्रजी सिनेमांना त्यांचा वेगळा असा प्रेक्षक असतो. हे सर्व पाहूनच सिनेमे प्रदर्शनाच्या तारखा ठरवल्या जातात; तसेच वर्षाचे नियोजन केले जाते. 

आगामी हॉलीवूड सिनेमे
लवकरच प्रदर्शित होऊ घातलेल्या हॉलीवूडपटांवर नजर टाकूया. "पायरेट्‌स ऑफ द करीबियन' मालिकेतला "डेड मेन टेल नो टेल्स' हा चौथा भाग या महिनाअखेर प्रदर्शित होईल. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची भूमिका असणारा "बे वॉच' हा सिनेमा मे महिन्याअखेर येईल. "द ममी' मालिकेतला चौथा भाग याच नावाने जून महिन्यात प्रदर्शित होईल. यात हॉलीवूडचा मोठा स्टार टॉम क्रूझ आहे. "ट्रान्स्फॉर्मर्स' मालिकेतला "लास्ट नाईट' हा पाचवा भाग जूनमधेच येईल. जुलै महिन्यातही तीन मोठ्या सिनेमांची एकमेकात लढत होईल. स्पायडर मॅन मालिकेतला "होमकमिंग', प्लॅनेट ऑफ एप्स मालिकेतला "वॉर फॉर प्लॅनेट ऑफ एप्स' आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा बहुचर्चित "डंकर्क' हा युद्धपट हे तीन मोठे निर्मितीमूल्य असलेले सिनेमे जुलैमधे आपल्या भेटीला येतील. हे तीनही सिनेमे वेगवेगळ्या जातकुळीचे आहेत. हल्ली महानगरातून वाढलेल्या मल्टीप्लेक्‍स चित्रपटगृहांच्या संख्येमुळे आणि प्रेक्षकांच्या सततच्या बदलत्या अभिरुचीमुळे नवनवीन सिनेमे जास्त संख्येने प्रदर्शित होऊ लागले आहेत. विविध मल्टीप्लेक्‍स, मेगाप्लेक्‍स आणि चित्रपट महोत्सवांमुळे वर्ल्ड सिनेमाचंही दालन प्रेक्षकांना खुलं झालंय. इंटरनेटमुळे घरबसल्या आपल्याला अनेक उत्तमोत्तम सिनेमे, मालिका पाहायला मिळताहेत. या बदललेल्या परिस्थितीचा प्रेक्षकांना नक्कीच फायदा होतोय. 

लेखक : हर्षद सहस्रबुद्धे 
sahasrabudheharshad@gmail.com 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com