esakal | नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )
sakal

बोलून बातमी शोधा

hrudayantar movie review

नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आणि पहिलाच चित्रपट दिग्दर्शित केला तो मराठी भाषेत. मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या कलाकारांना घेऊन त्यांनी "हृदयांतर' हा चित्रपट बनविला. यंग बेरी एन्टरटेन्मेंट तसेच इम्तियाज खत्री व विक्रम फडणीस यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एका आधुनिक जोडप्याची भावनात्मक आणि मन हेलावून टाकणारी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

शेखर जोशी (सुबोध भावे) आणि समायरा जोशी (मुक्ता बर्वे) हे एक दाम्पत्य. अगदी सुखी आणि समाधानी असणाऱ्या या दाम्पत्याला दोन गोड मुली असतात. त्यातील एकीचं नाव नित्या (तृष्णिका शिंदे) आणि दुसऱ्या अर्थात धाकट्या मुलीचं नाव नायशा (निष्ठा वैद्य) असते. दोघीही शाळेत शिकत असतात. नित्या डान्समध्ये हुशार असते, तर नायशाला स्पोर्टस्‌ची प्रचंड आवड असते. शेखर आणि समायरा यांच्या लग्नाला बारा वर्षे झालेली असतात; परंतु या बारा वर्षांच्या कालावधीत शेखरचं आपल्या कुटुंबाकडे आणि कुटुंबाच्या इच्छा-आकांक्षा याकडे दुर्लक्ष झालेलं असतं. कारण तो पैसा आणि पैसा याच्याच मागे लागलेला असतो. साहजिकच त्याची पत्नी समायरा त्याच्यावर कमालीची नाराज असते. ती वारंवार त्याला काही गोष्टी सांगत असते किंवा सुचवत असते; परंतु आपल्या बिझनेसकडे त्याचं अधिक लक्ष असतं. एकाच घरात राहून दोन भिंती निर्माण झालेल्या असतात. दोघांतील दुरावा वाढत चाललेला असतो आणि मग प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. त्याच दरम्यान शेखर आणि समायरा यांच्या जीवनात अशी काही घटना घडते की ते दोघेही हादरून जातात. त्यांची मुलगी नित्या हिला ब्लड कॅन्सर असल्याचं निदान होतं आणि मग तिच्यावर उपचार करण्यासाठी शेखर आणि समायरा यांची धडपड सुरू होते. मग नित्या या आजारातून बरी होते का...शेखर आणि समायराचं नातं टिकून राहतं का... वगैरे वगैरे प्रश्‍नांची उत्तरं हळूहळू या चित्रपटात उलगडत जातात. दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी या चित्रपटाच्या कथेला ट्रीटमेंट देताना त्यातील कथेचा पोत कुठे हरवणार नाही, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. विक्रम फडणीस यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न चांगला आहे. शेखर आणि त्यांचीच फॅमिली फ्रेण्ड ऍश (सोनाली खरे) यांच्यातील संभाषणाचा एक सीन विक्रम फडणीस यांनी ज्या पद्धतीने घेतला आहे, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. करिअर आणि कौटुंबिक नातेसंबंध यांचा ताळमेळ साधला गेला पाहिजे. हा ताळमेळ योग्यरीत्या साधला गेला तर कौटुंबिक कलह निर्माण होणार नाहीत. त्यामुळे नातेसंबंध किती महत्त्वाचे आहेत हे चित्रपटात अधोरेखित करण्यात आलं आहे. कलाकारांच्या अभिनयाची तितकीच साथ या चित्रपटाला लाभलेली आहे. सुबोध काय किंवा मुक्ता काय...मराठी इंडस्ट्रीतील हे अनुभवी आणि कसलेले कलाकार. त्यांनी आपल्या भूमिकांमध्ये काहीच कमतरता राहणार नाही याची काळजी पुरेपूर घेतलीय.

विशेष कौतुक करावं लागेल ते दोन लहान मुलींचे. त्यांनी आपापल्या भूमिकांमध्ये दाखविलेली कमाल दखल घेण्याजोगी आणि वाखाणण्याजोगी आहे. त्यांचं चुणचुणीत बोलणं आणि अगदी सहजरीत्या वावरणं नक्कीच लाजबाब आहे. सोनाली खरेने या चित्रपटात विवाह समुपदेशकाची भूमिका साकारली आहे. तिची भूमिका लक्षात राहणारी अशीच आहे. अन्य कलाकारांनीही चोख कामगिरी बजावलेली आहे. बॉलीवूड अभिनेता हृतीक रोशन याची या चित्रपटातील उपस्थिती कथानकाला साजेशी अशीच आहे. 

या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर दिलशाद व्ही. ए. आहेत. त्यांनी आपल्या कॅमेऱ्याने जादू केलीय. या चित्रपटाचं संगीत कथानकाला पुढे नेणारं आहे. संगीतकार प्रफुल कारलेकर यांची कामगिरी उत्तम. मात्र काही त्रुटी नक्कीच जाणवतात. चित्रपटाचा पूर्वार्ध झपाझप जाणारा असला तरी उत्तरार्ध काहीसा ताणला गेलेला आहे. तरीही भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणारा आणि खिळवून ठेवणारा चित्रपट आहे. 

<

>

loading image
go to top