
'अनन्या' साठी कायपण.. हृता दुर्गुळेने चालवत केलं प्रेक्षकांना आवाहन..
hruta durgule : सध्या अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या दोन चित्रपटांची भलतीच चर्चा आहे. 'टाइमपास 3' आणि 'अनन्या' हे तिचे दोन दमदार सिनेमे प्रदर्शनसाठी सज्ज झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये ती प्रमुख भूमिकेत आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती बऱ्याच ठिकाणी भेट देत आहे. नुकतीच ती कल्याणमध्ये गेली होती. यावेळी तिने सायकल चालवत आपला हटके अंदाज दाखवला.
(hruta durgule cycle ride promotion in kalyan for upcoming movie ananya)
प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'अनन्या'ची सकारात्मक कहाणी प्रत्येक कानाकोपऱ्या पोहोचावी, याकरता या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटात हृता दुर्गुळेच्या म्हणजेच 'अनन्या'च्या आयुष्यात सर्वात जवळची गोष्ट म्हणजे तिची जिवाभावाची सायकल. या दोघांचे एक अनोखे नाते आहे. खरंतर प्रत्येक सायकलस्वाराचे त्याच्या सायकलसोबत एक वेगळेच नाते असते. नुकतीच हृतानेही कल्याणमध्ये काही सायकलस्वारांसोबत सायकल चालवली.
या अनुभवाबद्दल हृता दुर्गुळे म्हणते," एका सायकलस्वराच्या आयुष्यात सायकलचे वेगळेच महत्व असते. 'अनन्या'च्या आयुष्यातही सायकलही तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीसारखी आहे. त्यामुळे मला सायकल चालवताना पुन्हा एकदा 'अनन्या' जगता आली. एक वेगळाच अनुभव आला. आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशी एक वस्तू असते जी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होते. 'अनन्या' आणि सायकलच असलेले नाते खूप वेगळे आहे. तुम्हाला 'अनन्या' पाहिल्यावर ते समजेलच. मुळात सायकलस्वार त्याचे ध्येय गाठण्यासाठी आपली संपूर्ण मेहनत पणाला लावतात. त्यांच्यात ध्येय साध्य करण्याची अफाट उर्जा असते. अशीच सकारात्मक उर्जा आपल्याला ‘अनन्या’मध्ये पाहायला मिळणार आहे."
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया या चित्रपटाचे निर्माता आहेत.
Web Title: Hruta Durgule Cycle Ride Promotion In Kalyan For Upcoming Movie Ananya
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..