"मी तिच्याशी लग्न केलं असतं, पण.."; एक्स गर्लफ्रेंडविषयी वैभव तत्ववादी पहिल्यांदाच व्यक्त | Vaibhav Tatwawadi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaibhav Tatwawadi

"मी तिच्याशी लग्न केलं असतं, पण.."; एक्स गर्लफ्रेंडविषयी वैभव तत्ववादी पहिल्यांदाच व्यक्त

अभिनेता वैभव तत्ववादीने (Vaibhav Tatwawadi) अल्पावधीतच आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. वैभव हा मराठी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार तर आहेच, पण बॉलिवूडमध्येही तो ओळखीचा चेहरा आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते फार उत्सुक असतात. काही कलाकार त्यांच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणे व्यक्त होतात. तर काहींना त्याविषयी बोलायला फारसं आवडत नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वैभव याविषयी मनमोकळेपणे बोलला आहे.

"ज्या क्षेत्रात मी काम करतो, ते काम रिलेशनशिप्ससाठी एक प्रकारचं आव्हानच आहे. त्यामुळे तुम्हाला असा व्यक्ती हवा असतो, जो तुमच्या लाइफस्टाइलला समजू शकेल किंवा मग तुमचं रिलेशनशिप करिअरमध्ये अडथळा ठरतो. मी सध्या माझ्या करिअरच्या अशा टप्प्यावर उभा आहे, जिथे मला कोणतीच संधी चुकवायची नाही. मला अशा गोष्टींचा पश्चात्ताप करायचा नाहीये, की माझ्या रिलेशनशिपमुळे करिअरवर परिणाम होईल", असं वैभवने स्पष्ट केलं.

पुढील किमान पाच वर्षे तरी वैभवला कोणत्याच रिलेशनशिपमध्ये राहायचं नाहीये. याविषयी त्याने पुढे सांगितलं, "मी आता ३२ वर्षांचा आहे. त्यामुळे मी कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हतो असं नाही. त्यावेळी फक्त सोशल मीडिया तेवढा तगडा नव्हता (हसतो). मी शक्यतो इंडस्ट्रीबाहेरील मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. पाच वर्षांपूर्वी मी एका मुलीच्या प्रेमात होतो. पण आता मी सिंगल आहे."

हेही वाचा: 'शेवटच्या क्षणी मी बाबांना भेटूसुद्धा शकलो नाही'; विशालने व्यक्त केलं दु:ख

ते नातं लग्नात रुपांतरित झालं असतं अशी शक्यताही वैभवने यावेळी बोलून दाखवली. "त्यावेळी, मी कदाचित तिच्याशी लग्नसुद्धा केलं असतं. पण काही गोष्टी शक्य नाही झाल्या आणि तेव्हापासून मला योग्य व्यक्ती सापडलीच नाही", असं त्याने कबूल केलं. ब्रेकअपमुळे त्रास झाला असला तरी प्रेमावरून विश्वास उडाला नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. "आमच्यात कडवटपणा आला नाही. मी अजूनही तिच्या संपर्कात आहे आणि त्या मुलीचं लग्नसुद्धा झालं आहे. ती तिच्या वैवाहिक आयुष्यात खूश आहे. मी सुद्धा माझ्या आयुष्यात आनंदी आहे. इतक्या सहजतेने मी कसा मूव्ह ऑन होऊ शकलो, याचं माझं मलाच आश्चर्य वाटतं", असं तो म्हणाला.

सध्या तरी लग्नाचा कोणताच विचार नसल्याचं वैभवने या मुलाखतीत सांगितलं. "एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही पूर्णपणे खात्रीशीर असाल तरच लग्नाचा विचार करू शकता. माझ्या आईवडिलांचाही हाच विचार आहे. मी माझा वेळ घ्यावा आणि घाई करू नये, असंच त्यांनाही वाटतं. जर तुमचे पालक इतके समजूतदार असतील, तर मग कसला ताण आहे? माझ्या मित्रांनाही माझ्या आईवडिलांचा हेवा वाटतो", असं वैभवने सांगितलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment
loading image
go to top