
मंजूळ आवाजाने ‘आम्रपाली पगारे'हिने जिंकले महाराष्ट्राला!
येवला : संगीतकार अजय-अतुलच नव्हे तर गायक आनंद शिंदे, कलाकार अनुपम खेर, अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले अशी संगीत व गायन क्षेत्रातल्या नामवंत मंडळींनी चिमुकल्या आम्रपाली पगारेचे तोंड भरून कौतुक केले. कुठलेही शिक्षण नसताना तिने गायनाच्या क्षेत्रात उमटवलेला ठसा तिला भविष्यात नक्कीच प्ले बॅक सिंगर बनवेल असा कौतुकाचा वर्षाव तिच्यावर झाला. इंडियन आयडॉलच्या आठव्या फेरीत वोटींग कमी झाल्याने आम्रपाली बाहेर पडली पण अख्या महाराष्ट्राची मने मात्र ती जिंकून आली हे नक्की!
सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकणारी आम्रपाली नांदूर या छोट्याशा गावातील अतिशय गरीब कुटुंबातील गौतम पगारे यांची लेक. वडिलांचा बेन्जोचा व्यवसाय असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फक्त मोबाईलवरील संगीत व गाणे ऐकून गायन कलेला तिने बहर दिला. सोनी मराठीच्या इंडियन आयडल शोसाठी ऑनलाईन प्रवेश फेरीत तिने अंतिम १४ स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होते. अतिशय सुरेल आवाजात गाणाऱ्या आम्रपालीचे गाणे ऐकल्यावर पहिल्याच वेळी अजय-अतुलही अवाक झाले अन त्यांनी तिला उचलून घेतले. (Amrapali Pagare News)
ए मेरे वतन के लोगो...
एक झोका..या गाण्यापासून इंडियन आयडलमध्ये सुरू झालेला तिच्या प्रवासात पारवाळ घुमतय, एका तळ्यात होती बदके, सत्यम शिवम सुंदरा, तू जहां-जहां चलेगा, दिल हे की मानता नही अशा अनेक गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली. लतादीदींच्या अभिवादन कार्यक्रमात तिने गायलेले सुन्या सुन्या मैफलीत माझ्या या गाण्याने तर सर्वांनाच मोहिनी घातली. विशेष म्हणजे २६ जानेवारीच्या निमित्ताने तिने गायलेले ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गाणे परीक्षक अजय-अतुल यांना इतके भावले, की या तिच्या गाण्याची इतिहासात नोंद होईल असे उद्गार त्यांनी काढले होते.
मदतीचे अनेक हात पुढे
स्पर्धेत जाण्यासाठी आम्रपालीला मोठे आर्थिक पाठबळही मिळाले. पालकमंत्री छगन भुजबळ यांचे विशेष सहकार्य मिळाले. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रमोद पाटील, सहसचिव प्रवीण पाटील तसेच सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे प्राचार्य शरद ढोमसे, शिक्षक गजानन नागरे, नगरसूलचे शिक्षक मनोज ठोंबरे आदींनी तिला आर्थिक मदत मिळवून दिली. अनेकांचे या काळात सहकार्य मिळाल्याने हा प्रवास अधिक सोपा झाल्याचे तिचे वडील गौतम पगारे सांगतात.