'चौकटी'बाहेरचा सर्जनशील प्रयोग

श्रीराम ग. पचिंद्रे
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

अलीकडच्या काळात लघुपट निर्मितीचा वेग वाढलेला आहे. काही छोट्या अनुभवांचं संचित गोळा करून कमी वेळेत आणि कमी खर्चात जगण्यातल्या प्रश्‍नांवर काही भाष्य करता येते का, याचा प्रयत्न लघुपटांव्हारे केला जातो. पण लघुपटांना प्रेक्षक वर्ग चित्रपट महोत्सवातच मिळतो. असं असलं तरी लघुपट निर्मितीचे हे प्रयोग कौतुकास्पद असतात. कोल्हापूरच्या कलाकारांनी निर्मिलेला "चौकट' हा लघुपट 32 जागतिक चित्रपट महोत्सवात पोहोचलेला आहे. त्याला एकंदरीत 24 पुरस्कार मिळालेले आहेत.

अलीकडच्या काळात लघुपट निर्मितीचा वेग वाढलेला आहे. काही छोट्या अनुभवांचं संचित गोळा करून कमी वेळेत आणि कमी खर्चात जगण्यातल्या प्रश्‍नांवर काही भाष्य करता येते का, याचा प्रयत्न लघुपटांव्हारे केला जातो. पण लघुपटांना प्रेक्षक वर्ग चित्रपट महोत्सवातच मिळतो. असं असलं तरी लघुपट निर्मितीचे हे प्रयोग कौतुकास्पद असतात. कोल्हापूरच्या कलाकारांनी निर्मिलेला "चौकट' हा लघुपट 32 जागतिक चित्रपट महोत्सवात पोहोचलेला आहे. त्याला एकंदरीत 24 पुरस्कार मिळालेले आहेत.

प्रत्येक माणसाची एक चौकट असते. कधी कधी चौकटीतून चौकटीही निर्माण होतात. "चौकट' च्या निर्मितीमागील संकल्पना काहीशी अशीच आहे. माणूस दगडात देव पाहतो, पण माणसात माणूस पहात नाही, इथेच मानवी जीवनाची शोकांतिका सुरू होते. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय माणसानं घास घ्यायचा नाही, अशी आपल्याकडे पद्धत आहे. पण माणसाला भूक लागते; भुकेजल्या माणसाला अन्न मिळत नाही आणि देव कधी जेवत नाही तरी त्याला ताटभरून नैवेद्य मिळतो, ही विसंगती प्रतिकांमधून दाखवण्यात आलेली आहे. यात दोनच पात्रं आहेत. एक आहे भिकाऱ्यासारखा दिसणारा, पण भिकारी नसलेला असा वाटसरू आणि एक बाई, जी परंपरेशी बांधली गेलेली आहे. बारा मिनिटांचा हा लघुपट आहे. त्यात अगदी मोजके, फक्त सात ते आठ संवाद आहेत.

लघुपटात दोन प्रमुख चौकटी विचारात घेतलेल्या आहेतः एक- जाणीवेची चौकट. शरिराला काटा लागला तर जाणीव आणि दोन- मनाला काटा लागला तर नेणीव. उमेश बगाडे हे निर्माते, कथाकार आणि दिग्दर्शक आहेत. ते म्हणतात, ""चौकट परंपरेची असते आणि विचारांचीही. लघुपटातील प्रत्येक फ्रेम बोलते. देव नैवेद्य खात नाही, पण माणसाला भूक असते. ही प्रत्येक घरातली गोष्ट आहे. बारा मिनिटांच्या पटात 76 कट आहेत. माणसातील कॅरॅक्‍टर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. कमीत कमी संवाद, पण चेहऱ्यावरच्या भावातून सगळं व्यक्त करायचं असा प्रयत्न आम्ही केला. लिमिटेड पैशात बेस्ट द्यायचं होतं. पैसा कमी लागला, कारण पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या एकाही कलाकारानं एकही पैसा घेतला नाही. पण आम्ही निर्मिती प्रक्रियेतल्या प्रत्येकाचे श्रम इन्व्हेस्ट केले. श्रमदानातून ही निर्मिती झाली. साडेसहा हजारात लघुपट तयार झाला.''

वाटसरूची भूमिका करणारे विजय पोवार म्हणाले, ""कला क्रांती करत नाही, पण क्रांतीचं कारण होऊ शकते. हजारो लोक एकदम नाहीत बदलणार, पण एकेक माणूस करून सगळे लोक बदलतील. परिवर्तनवादी विचारातून ही कॅरॅक्‍टर करायला मी तयार झालो.''

विजय पोवार आणि कोमल आपके या दोन कलाकारांबरोबरच त्यातलं घर ही एक व्यक्तिरेखा आहे. त्या घराचं अंगण, चौकट हेही काम करतात. हे घरही दगडांची अडक असलेलं असं चौकटी- चौकटींनी बनलेलं घर आहे. त्यात भिंती, खिडक्‍या, फरशा अशा सर्व गोष्टी चौकटींची निर्मिती करणाऱ्याच आहेत, हे दाखवलेलं आहे. ह्यात कलाकारांना रंगभूषा नाही हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. असा हा चौकटीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारा सर्जनशील प्रयोग आहे.

Web Title: Innovative experiment