esakal | कोल्हापूरचं थिएटर माझ्यासाठी ऑक्‍सिजन !
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरचं थिएटर माझ्यासाठी ऑक्‍सिजन !

साऱ्या झगमगत्या दुनियेतून वर्षा-दोन वर्षातून एकदा किमान दोन महिन्यांचा वेळ काढून कोल्हापुरातच ठिय्या मारतो आणि एखादे नाटक स्टेजवर सादर करूनच मुंबईला परत निघतो. कारण कोल्हापूरचं थिएटरच माझ्यासाठी खरा ऑक्‍सिजन आहे.

- सागर तळाशीकर

कोल्हापूरचं थिएटर माझ्यासाठी ऑक्‍सिजन !

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

पंचवीसेक वर्षे झाली कोल्हापुरातून मुंबईला येऊन. पण, आजही कोल्हापूर सोडताना पुढे पुढे ढकललेला एकेक दिवस आठवतो. मुंबईत आल्यानंतर काही काळ संघर्ष जरूर होता. मात्र, ती सुद्धा एक घडण्याची प्रक्रियाच होती. प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमी आणि सिनेमांतूनही आजवर भरपूर काही केले. पुढंही बरेच काही करायचे आहे. मात्र, या साऱ्या झगमगत्या दुनियेतून वर्षा-दोन वर्षातून एकदा किमान दोन महिन्यांचा वेळ काढून कोल्हापुरातच ठिय्या मारतो आणि एखादे नाटक स्टेजवर सादर करूनच मुंबईला परत निघतो. कारण कोल्हापूरचं थिएटरच माझ्यासाठी खरा ऑक्‍सिजन आहे...अभिनेते सागर तळाशीकर संवाद साधत असतात आणि त्यांच्या एकूणच प्रवासातील विविध पदर उलगडत जातात.

सागर तळाशीकर वांगी बोळातले. अर्थात सारं बालपण या परिसरातच गेलं. पुढं तळाशीकर कुटुंब प्रतिभानगरात स्थायिक झाले. दरम्यान, विद्यापीठ हायस्कूल, गोखले, कॉमर्स आणि नंतर शहाजी लॉ कॉलेजला शिक्षण पूर्ण केले. शहाजी लॉ कॉलेजला असतानाच ‘वेटिंग फॉर गो टू’ स्टेजवर आणलं आणि तिथूनच रंगदेवतेची सेवा सुरू झाली. पुढे प्रत्यय संस्थेच्या माध्यमातून अनेक नाटकं रंगमंचावर आली. अगदी ‘किंग लिअर’, ‘राशोमान’ पासून ते ‘कोपनहेगन’पर्यंत. व्यावसायिक रंगभूमीवर ‘डबल गेम’, ‘रंगनायक’ या नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

‘कृष्णप्रिया’ या हिंदी नाटकाचे आजही भारतभर प्रयोग होतात. साठहून अधिक कथ्थक कलाकारांसह हे नाटक रंगमंचावर सादर होतं. त्याचं दिग्दर्शनही सागर तळाशीकर यांनीच केले आहे. पस्तीसहून अधिक सिनेमे, ओमपुरी व श्रेयस तळपदेंसह ‘हॅंगमन’ हा इंग्लिश सिनेमा किंवा अगदी बॉलीवूडचेही पाच ते सहा सिनेमे केले. सध्या ‘पानिपत’चं शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात संजय दत्त, अर्जुन कपूर आदींच्या भूमिका आहेत. ‘व्यक्ती आणि वल्ली’ नुकताच प्रदर्शित झाला. ‘रमाई’ हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार असून, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका त्यांनी केली आहे. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘चार दिवस सासूचे’, ‘एक धागा सुखाचा’, ‘गुंतता हृदय हे’, ‘ललित २०५’ आदी त्यांच्या मालिकाही गाजल्या. ते सांगतात, ‘‘स्पष्ट आणि खोटेपणाला थारा न देणारा कोल्हापुरी संस्कार. हाच संस्कार आजवर जपला. मुंबईत स्थिरावलो असलो तरी तीन-चार महिन्यातून एकदा कोल्हापूरला येतोच येतो.’’

loading image