चित्रपटासाठी ‘गोट्या’ही  खेळलो...

चिन्मयी खरे
सोमवार, 11 जून 2018

कलर्स मराठीवरील ‘मराठी बिग बॉस’ गाजवलेल्या राजेश शृंगारपुरेचा ‘गोट्या’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

कलर्स मराठीवरील ‘मराठी बिग बॉस’ गाजवलेल्या राजेश शृंगारपुरेचा ‘गोट्या’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली बातचीत-

‘गोट्या’ चित्रपटाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?
- या चित्रपटात गोट्या नावाचा मुलगा ज्या शाळेत जात असतो तेथेच मी शिक्षक म्हणून शिकवायला असतो. पी. टी. सर म्हणून मी काम करतोय. गोट्यांच्या खेळाबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेम आहे. ते इतकं उदंड आहे की तो ते कुठेतरी व्यक्त करतो आणि दाखवून देतो की मला गोट्या या खेळामध्ये स्वारस्य आहे. हा खेळ मला शाळेतही खेळायचा आहे. हे तो त्याच्या शिक्षकाला म्हणजेच मला सांगतो; पण असा खेळ आपण शाळेत खेळू शकत नाही, असे मी त्याला सांगतो. यासाठी तो त्याच्या मित्रांना घेऊन शाळेत बंड पुकारतो. त्याच्या या बंडाला नमून शाळेत हा खेळ रूजू केला जातो. यानंतर गोट्या या खेळाचा प्रशिक्षक म्हणून मला नेमलं जातं. मग त्या मुलांचा खेळ पाहताना मला त्याच्यामध्ये काही चांगले गुण दिसून येतात. म्हणून मग तो प्रशिक्षक त्याच्यातील हे गुण खुलविण्याचा आणि या हिऱ्याला पैलू पाडण्याचा विडा उचलतो. मग हा गोट्या आणि प्रशिक्षक गोट्यांचा खेळ कोणत्या लेव्हलला घेऊन जातात हे या चित्रपटात दाखविले आहे.

पहिल्यांदा गोट्या या खेळावर आधारित चित्रपटात काम करण्यासाठी विचारल्यावर तुम्हाला काय वाटलेलं?
- अर्थात, प्रत्येकाच्याच मनात येईल की गोट्यांच्या खेळावर कोण चित्रपट काढतं का? हा माणसाचा स्वभावच आहे. आमचे दिग्दर्शक भगवान पाचोरे यांनी मला या चित्रपटाची कथा ऐकवली. जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला ते आत्मसात झालं आणि वाटलं की हा विषय जरी साधा सोपा असला, तरी त्याची जी पेरणी आहे किंवा त्याला ज्या प्रकारची ट्रीटमेंट दिली गेली आहे, ती जो कोणी हा चित्रपट पाहिल, मग त्याने हा खेळ खेळलेला असो किंवा नसो त्या प्रत्येकाला वाटेल की अरे! हा खेळ आपल्या बालपणी का त्या दर्जाचा होऊ शकला नाही? 

लहान असताना गोट्यांचा खेळ खेळलाय का कधी? 
- हो माझ्याकडे अजूनही मी जिंकलेल्या गोट्यांचे डबे आहेत. जेव्हा हा चित्रपट माझ्याकडे आला तेव्हा मी आठवणींत रमलो आणि मी माझ्या जुन्या घरी जाऊन त्या गोट्या अजूनही आहेत की नाहीत ते चाचपडून आलो. मी पटकन या चित्रपटाशी रिलेट करू शकलो. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मला गोट्या खेळायला मिळाल्या. अनेकदा चित्रीकरणाआधी आणि नंतर आम्ही खेळायचो. एक प्रशिक्षक म्हणून माझाही नेम असणं गरजेचं होतं त्यामुळे मी ही प्रॅक्‍टिस करायचो आणि आजही कधी कधी चांगले नेम लागतात.

सगळ्या लहान मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
- याआधीही मी अनेक चित्रपट केले आहेत ज्यामध्ये मी लहान मुलांबरोबर काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी कसं मिळतं-जुळतं घ्यायचं ही कला मला अवगत आहे. त्यामुळे ते सोपं गेलं आणि जेव्हा तुम्ही अभिनय करता तेव्हा तुमच्याबरोबर कसलेला नट असो वा नवोदित असो, तुम्हाला कोणाबरोबरही मिळतं-जुळतं करून घ्यावं लागतंच. लहान मुलं काम करू शकतील की नाही ही शंका अनेकांच्या मनात येते; पण जर त्यांना योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांना त्यांच्या भूमिकेचं योग्य ज्ञान असेल. तर ती नक्कीच खूप सुंदर काम करू शकतात. 

तुमचे आगामी चित्रपट कोणते आहेत?
- या चित्रपटानंतर माझे दुसरे चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. ‘गडबड झाली’ नुकताच प्रदर्शित झाला. ‘यस आय कॅन’, ‘अंश’, ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मध्ये मी, सई ताम्हणकरबरोबर काम करतोय. हिंदीतील ‘सारथी’ चित्रपटही येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: interview of rajesh shrungarpure for marathi movie gotya