esakal | अनुराग, तापसीच्या घरी रात्रभर छापेमारी सुरू; आयकर विभागाकडून कसून चौकशी

बोलून बातमी शोधा

anurag taapsee}

गुरुवारी सकाळी पुन्हा या कारवाईला सुरुवात करण्यात आली.

manoranjan
अनुराग, तापसीच्या घरी रात्रभर छापेमारी सुरू; आयकर विभागाकडून कसून चौकशी
sakal_logo
By
स्वाती वेमूल

दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या घरावर बुधवारी आयकर विभागाने धाड टाकली. बुधवारी रात्रीपर्यंत आयकर विभागाकडून छापेमारी सुरु होती. गुरुवारी सकाळी पुन्हा या कारवाईला सुरुवात करण्यात आली. कर बुडवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरु असल्याचं कळतंय. मुंबईतसोबत पुणे आणि इतर २० जागांवर छापेमारीची कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत आहे.

"ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग हे सरकारविरोधी असणाऱ्या लोकांवर कारवाईसाठी वापरले जातात", असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला. तर अनुराग कश्यपने सुरु केलेल्या 'फँटम फिल्म्स' या निर्मिती संस्थेने कर बुडविल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा : कोरोना प्रतिबंधक लशीसाठी तीन तास उन्हात उभं राहावं लागलं; सतीश शाह यांनी सांगितला अनुभव 

काय आहे 'फँटम फिल्म्स'चा वाद?
२०११ मध्ये अनुराग कश्यप, निर्माते-दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने, निर्माता विकास बहल, निर्माते-वितरक मधू मंटेना यांनी 'फँटम फिल्म्स' नावाची कंपनी सुरु केली होती. या कंपनीने 'क्वीन', 'लुटेरा', 'एनएच १०', 'मसान', 'उडता पंजाब' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. मात्र २०१८ मध्ये ही कंपनी विसर्जित करण्यात आली. त्यानंतर अनुराग कश्यपने 'गुड-बॅड फिल्म्स' तर मोटवाने यांनी 'आंदोलन फिल्म्स' या नावाने स्वतंत्र कंपन्या सुरु केल्या. 'फँटम कंपनी'ने केलेल्या अंतर्गत आर्थिक व्यवहारांची तपासणी आयकर विभागाकडून होत आहे. त्याचप्रमाणे या छाप्यांमधून कर बुडवल्याच्या पुराव्यांची शोधाशोध करण्यात आली, अशीही माहिती समोर येत आहे. 

अनुराग आणि तापसीने २०१८ मध्ये 'मनमर्जिया' या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. सध्या ते 'दोबारा' या चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत.