'पाठीमागून वार करणारी लोकं' म्हणत 'जय भीम'च्या लेखकाने परत केलं मानधन | Jai Bhim | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jai Bhim Film

'पाठीमागून वार करणारी लोकं' म्हणत 'जय भीम'च्या लेखकाने परत केलं मानधन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

सूर्याची Suriya मुख्य भूमिका असलेला 'जय भीम' Jai Bhim हा चित्रपट प्रदर्शनापासून अनेक वादांत अडकला. आता या चित्रपटातील एका दृश्यावरून आणखी एक वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाचे संवादलेखक कन्मणी गुणशेखरन Kanmani Gunasekaran यांनी दिग्दर्शकांना मानधन परत केल्याची माहिती समोर येत आहे. कन्मणी यांनी फेसबुक पेजवर भलीमोठी पोस्ट लिहित त्यांची नाराजी व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वी दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल यांनी कन्मणी यांना संवादलेखनासाठी विचारलं होतं. चित्रपटातील संवादात बरीच ग्रामीण भाषा असल्याने, कन्मणी यांना संवाद लेखन करण्यासाठी ऑफर दिली होती. कन्मणी यांनी दिग्दर्शकांच्या म्हणण्याप्रमाणे संवादलेखन केलं, मात्र त्यांना चित्रपटातील वादग्रस्त कॅलेंडर दृश्याची तेव्हा कल्पना नव्हती.

'जय भीम'मधील काही दृश्यांमुळे आपल्या समुदायाची प्रतिमा कशा पद्धतीने मलिन झाली, याबद्दल वन्नियार समुदायाने अभिनेता सूर्याला कायदेशीर नोटीस बजावली. लेखक कन्मणी हेसुद्धा त्याच समुदायाचे असल्याने त्यांनीसुद्धा यावर नाराजी व्यक्त केली. वादानंतर चित्रपटातील कॅलेंडरचं दृश्य वगळण्यात आलं होतं. मात्र तरीसुद्धा समुदायाच्या भावना दुखावल्याचं त्यांनी म्हटलं.

हेही वाचा: निकला घटस्फोट देणार? प्रियांकाने दिलं उत्तर

ओटीटी रिलीजमुळे दिग्दर्शकांनी वादग्रस्त दृश्ये तशीच ठेवली आणि त्यामुळे दोन समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण झाला, असाही दावा कन्मणी यांनी केला. आता त्यांच्याच लोकांकडून त्यांची खिल्ली उडवली जात असल्याने दिग्दर्शकांनी ते दृश्य काढून टाकण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी पुढे लिहिलं.

कन्मणी यांनी त्यांना मानधन म्हणून मिळालेला ५० हजार रुपयांचा धनादेश निर्मात्यांना परत केला आहे. त्यासोबतच पत्र पाठवत त्यातून नाराजी व्यक्त केली. पाठीमागून वार करणारी अशी लोकं भविष्यात कधीच भेटू नये, अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला आहे.

loading image
go to top