esakal | देशातील व्हॅक्सिनच्या किंमतीवर जावेद भाईंचा प्रश्न

बोलून बातमी शोधा

javed akhtar
देशातील व्हॅक्सिनच्या किंमतीवर जावेद भाईंचा प्रश्न
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - देशात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरत आहे. अशा वेळी सरकारने लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. केंद्र सरकारने 45 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लसीकरण मोफत करणार असल्याचे जाहीर केले आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लवकरच लस देण्यात येणार आहे.

लस उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या लसीची किंमत केंद्रासाठी वेगळी आणि राज्यासाठी वेगळी ठेवली आहे. लसींच्या या वेगवेगळ्या किंमतीसंबंधीत सरकारवर टिका करत प्रसिध्द लेखक जावेद अख्तर यांनी एक ट्विट केले आहे. जावेद अख्तर यांनी ट्विट करत लिहिले,‘देशात एक कायदा, एक भाषा, एक निवडणूक, एक विश्वास, एक मत असावे, असा उपदेश देणाऱ्या लोकांना लसीची किंमतही संपूर्ण देशासाठी एक असावी, असे अजिबात वाटत नाही. विचित्र गोष्ट आहे ना!’ लसींच्या वेगवेगळ्या किमतीवर केंद्र सरकारची भूमिका काय असा प्रश्न या ट्विटमधून जावद अख्तर यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.या ट्विटला अनेक नेटकऱ्यांनी पाठिंबा देत हे ट्विट रिट्विट केले आहे. या ट्विटला 13 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत तर 2 हजारांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हे रिट्विट केले आहे.

जावेद अख्तर ट्विटर वर त्यांची सरकारबद्दलची मते नेहमीच व्यक्त करत असतात. अनेक वेळा त्याच्या ट्विटला समर्थन मिळते तर काही वेळा त्यांना ट्रोल देखील केले जाते. देशातील लसी या वेगवेगळ्या किंमतीला मिळणार आहेत, यामागचे नेमके कारण काय आहे ते केंद्र सरकारने स्पष्ट करावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.