अक्षय मुदवाडकर साकारणार ' स्वामी समर्थांची भूमिका'

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका सध्या सुरु आहे.

मुंबई - नवीन वर्षात प्रेक्षकांना विविध विषयांवरील मालिकांची पर्वणी मिळणार आहे. यात काही सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, राजकीय विषयांवरील मालिकांचा समावेश आहे. स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका सध्या सुरु आहे. तिला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली आहे.

या मालिकेतील प्रमुख भूमिका कोण साकारणार याविषयी उत्सुकता होती. आता ती प्रमुख भूमिका अक्षय मुदवाडकर हा अभिनेता साकारणार आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात ज्यांना वंदनीय, पूज्य मानलं जातं, त्या स्वामी समर्थांच्या मालिकेबद्दल अनेकांना कमालीची उत्सुकता होती. यामुळे  भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अक्षयनं ही व्यक्तिरेखा साकार केली आहे. अक्षय हा मुळचा नाशिकचा. लहानपणापासून त्यानं अभिनयाची आवड जोपासली आहे. त्यानं यापूर्वी अनेक हौशी, प्रायोगिक आणि व्यवसायिक नाटकांतून अभिनय केलेला आहे. यात गांधी हत्या आणि मी, द लास्ट व्हॉइसरॉय या नाटकांमध्ये भूमिका केली आहे.

यापूर्वी त्यानं ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत एक महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती.गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मराठी मनोरंजन क्षेत्रावर निराशेचे मळभ दाटले होते. ते आता काही अंशी कमी झाले आहे. मोठ्या प्रमाणावर मालिका आणि चित्रपट यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे. कित्येक मराठी निर्माते, दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या विषयांवर कलाकृती निर्मितीचा घाट घातला आहे. त्याविषयीची माहिती सोशल मीडियावर शेयर केली आहे. मराठी मनोरंजन वाहिन्यांवर सातत्याने नवनवीन मालिका आपल्या भेटीस येत असल्यानं प्रेक्षकांमध्येही आनंद व समाधानाची भावना आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jay jay swami samartha new Marathi serise actor akshay mudawadkar lead role