समृद्ध अनुभव माझं कोल्हापूर !

समृद्ध अनुभव माझं कोल्हापूर !

माझा आणि अभिनयाचा काडीचाही संबंध नव्हता. शिक्षण म्हणाल तर दहावीला चार वेळा बसून विषय सुटलेले. पुढं मुक्त विद्यापीठातून बारावी केली, इतकंच; पण, शारीरिक संपदा चांगली कमावलेली. त्यामुळं पैलवानाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली आणि तिथून मग नाटक, चित्रपट, मालिका असा प्रवास सुरू झाला. खरं तर अपघातानेच या क्षेत्रात आलो; पण आता हेच माझं करिअर बनलं आहे. मिळालेली प्रत्येक संधी आणि कलापुरातल्या प्रत्येकाकडून मिळालेल्या अनुभवातून समृद्ध होत गेलो... युवा अभिनेता जितेंद्र पोळ संवाद साधत असतो. तो राहायला कळंबा जेल परिसरात. अपघातानाचं त्याचं या क्षेत्रात येणं आणि यशस्वी होणं हा सारा प्रवास उलगडत गेला.  

‘वाडा’ नावाच्या नाटकात धिप्पाड शरीरयष्टी असणाऱ्या पैलवानाची भूमिका होती. त्यामुळं मैत्रिणीनं त्याला नाटकात काम करण्याची विनंती केली. तो नाटकाच्या सराव तालमीसाठी जावू लागला आणि नाटकातच रमला. सुरवातीला त्याला पैलवानाची भूमिका मिळाली नाही. पण, त्यानं बॅकस्टेजला काम केलं. चित्रपटात त्याचं येणंही असेच अपघाताने. मैत्रिणीबरोबरच तो शूटिंग बघायला गेला. तिथे ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी त्याला पाहिलं आणि ‘पीएसआय’ची भूमिका करण्याची संधी त्याला मिळाली. अभिनयाचा श्रीगणेशा असाच सुरू झाला आणि त्याचा हा प्रवास पुढे पुढे सरकत राहिला.

आजवर ‘हायकमांड’, ‘सत ना गत’, ‘बातमी’, ‘कोणी घर देता का घर’, ‘काव काव कावळे’, ‘घरवाले हुशार’, ‘प्रेम पाखरं’, ‘गावगाडा’, ‘आम्ही दोघी’, ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ आदी चित्रपटातून जितेंद्रनं भूमिका केल्या. ‘चार फुटीये छोकरे’ या हिंदी चित्रपटांसह ‘पंचनामा’, ‘शौर्य गाथा अभिमानाची’ या मालिकेत मिळालेल्या संधीचं सोनंही त्यानं केलं. ‘एकच प्याला’ या नाटकाचे बेचाळीस तासात सलग चौदा प्रयोग झाले. त्यात जितेंद्रची भूमिका होती. त्याशिवाय ‘सुवर्णपदक’, ‘किरवंत’, ‘गुड बाय डॉक्‍टर’, ‘स्वराज्यधर्म’ या नाटकातूनही त्यानं भूमिका केल्या. ‘चुकबळी’ एकांकिकेबरोबरच ‘इनकम्प्लीट’, ‘अतारा’, ‘उम्मीद’, ‘स्मशान’ या लघुपटातही त्यानं विविध भूमिका साकारल्या. सध्या सुरू असलेल्या ‘स्वराजरक्षक संभाजी’ आणि ‘जुळता जुळता जुळतयं की’ या मालिकेतूनही तो आता घराघरांत पोचला आहे. त्याचवेळी विविध जाहिरातीतूनही तो झळकतो आहे. 

संधी मिळते पण, मिळालेल्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. शिक्षण तर हवेच पण त्याहीपेक्षा आपला अनुभव आपल्याला अधिक समृद्ध करीत असतो. त्यातही कलापुरात मिळणारा अनुभव आणि प्रोत्साहन नक्कीच मोठं बळ देतं.
- जितेंद्र पोळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com