Johnny Lever : दर्जाशी तडजोड केल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टी मागे; जॉनी लिव्हर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Johnny Lever statement Hindi film industry lags behind due to compromise on quality

Johnny Lever : दर्जाशी तडजोड केल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टी मागे; जॉनी लिव्हर

पुणे : पूर्वी एकेका गाण्याच्या चित्रीकरणासाठी दहा दिवस घेतले जायचे, एका प्रसंगासाठी दिवसभर तालीम केली जात असे. आता मात्र कोणतीही चूक झाली तरी ‘जाऊ द्या ना, आपल्याला कुठे ऑस्करला चित्रपट पाठवायचा आहे’, असे सर्रास म्हटले जाते.

दर्जाशी तडजोड करण्याच्या या वृत्तीमुळेच हिंदी चित्रपटसृष्टी मागे पडत असून दाक्षिणात्य चित्रपट यशस्वी होत आहेत, असे परखड मत प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिव्हर यांनी मंगळवारी व्यक्त केले.

पुणे फिल्म फाऊंडेशन व राज्य सरकारतर्फे आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत (पिफ) ‘ह्युमर इन सिनेमा’ या विषयावर लिव्हर यांच्याशी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते उपस्थित होते.

लिव्हर म्हणाले, ‘‘कोरोना काळात लोकांचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ वाढला आहे. विनोदाची माध्यमे व त्याचे रुपही बदलले आहे. पूर्वीसारखे छोट्या-मोठ्या गोष्टी करून आज आपण लोकांना हसवू शकत नाही. हे ध्यानात घेऊन विनोदी लेखन करायला हवे. विनोदनिर्मिती करणे, हे सगळ्यात कठीण काम आहे.’’

आपल्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. ‘नक्कल करणे आणि एखादी व्यक्तिरेखा साकारणे, यात खूप फरक असतो. त्यामुळे नकलाकारांना चांगले अभिनेता होण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात, मलाही घ्यावे लागले. निरीक्षण करत मी शिकलो. एकेकाळी अनेक चित्रपटांत विना मानधनही काम केले. त्याचे जवळपास चार कोटी रुपये थकले असतील. पण याचा अर्थ ते काम कमअस्सल होते, असे नाही. तेथेही पूर्णक्षमतेने काम केले’, असे त्यांनी सांगितले.

‘आशय संपला की अश्लीलता येते’

‘‘प्रसंगाची गरज असताना पुरुष कलाकारांनी महिला व्यक्तिरेखा साकारल्यास ते शोभून दिसते. मात्र, गरज नसताना असा प्रयत्न केल्यास तो फसतो. आजकाल स्टँडअप कॉमेडी किंवा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांतील विनोदात शिवराळ भाषेचा वारंवार उपयोग केला जातो. कलाकाराकडील आशय संपल्यावर आणि कौशल्य संपल्यावर विनोदासाठी अशाप्रकारे अश्लीलतेचा वापर केला जातो,’’ असे प्रतिपादन जॉनी लिव्हर यांनी केले.