बेबी ओ बेबी... मुंबईत जस्टिन बीबर फिवर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

चाहत्यांच्या गर्दीचे तुफान
जगभरातील तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या अवघ्या 23 वर्षांच्या कॅनेडियन पॉपस्टार जस्टिन बीबरचा करिष्मा बुधवारी (ता. 10) नवी मुंबईतही दिसला. नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झालेल्या जस्टिनच्या भारतातील पहिल्याच कॉन्सर्टला त्याच्या फॅन्सनी तुफान गर्दी केली होती. रात्रीच्या कार्यक्रमासाठी सकाळी 11.30 पासूनच स्टेडियम परिसरात तरुण-तरुणी जमू लागल्या. पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केल्यामुळे अनेकांना एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागली. उन्हाचे चटके सहन करत विदेशी नागरिकही स्टेडियमकडे जात होते. गर्दी-गोंधळाने अनेकांची दमछाक झाली असली तरी नवी मुंबईत फिवर होता तो जस्टिनचाच...

नवी मुंबई : बेबी ओ बेबी..., लेट मी लव्ह यू, कोल्ड वॉटर, व्हॉट डू यू मीन अशी एकामागोमाग सादर झालेली हिट गाणी... सादरकर्ता साक्षात तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला पॉपस्टार जस्टिन बीबर... त्याचे सूर कानात साठवण्यासाठी सेलिब्रिटींपासून कॉलेज स्टुडंटस्‌नी केलेली गर्दी... स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक तास कराव्या लागलेल्या प्रतीक्षेमुळे आलेला थकवा विसरत त्याच्या गाण्यावर ताल धरत थिरकणारे रसिक... बुधवारी नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये हे चित्र होते. निमित्त होते जादुई आवाजाने जगाला वेड लावणाऱ्या जस्टिनच्या बीबरच्या लाईव्ह कॉन्सर्टचे!

लेट मी लव्ह यू... आय विल गिव्ह अप ना...ना.. हे लोकप्रिय गाणे गात जस्टिनने रंगमंचावर प्रवेश करताच स्टेडियममध्ये सुमारे 60 हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. काही क्षणांतच जस्टिनने रसिकांना आपल्या सूरांवर नाचायला लावले. त्याच्या तालावर डोलणाऱ्या रसिकांमध्ये सेलिब्रिटींपासून कॉलेज स्टुडंटस्‌चाही समावेश होता. त्याच्या प्रत्येक गाण्यावर तरुणाईची उत्स्फूर्त दाद मिळत होती. त्याला "याचि देही, याचि डोळा' पाहण्यासाठी स्टेडियममध्ये नवी मुंबई, मुंबई, पुणे, बंगलोर, चेन्नई ते दिल्लीपर्यंतही तरुणाई एकवटली होती. प्रत्येकाच्या हातात जस्टिनच्या गाण्याचे बोल व त्याला देण्यासाठी प्रेमाचा संदेश लिहिलेला होता. या कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या रोषणाईने अवघे स्टेडियम उजळून गेले होते.

दुपारपासूनच वाहनांच्या रांगा

जस्टिनचा शो पाहण्यासाठी हजारो पॉप संगीतशौकिनांचा ओघ स्टेडियमकडे सुरू झाल्यामुळे तिथे जाणारे रस्ते नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. नेरूळसह परिसरात वाहतुकीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाली. मॉडर्न वेशातील तरुण-तरुणाईचे घोळके स्टेडियमकडे जात होते. एल पी जंक्‍शनजवळ स्टेडियमकडे जाणारा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे कार्यक्रमाला आलेल्यांची अडचण झाली. उरण चौकापासून स्टेडियमकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर दुपारी 12 पासूनच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून एक किलोमीटरवर वाहनांना बंदी घालण्यात आल्याने भरउन्हातून पायी जाण्याशिवाय रसिकांना पर्याय नव्हता. ऑस्ट्रेलियातून आलेले सॅमी व सॅक हे जोडपे उरण फाट्याजवळच्या सर्व्हिस रोडवरच कार थांबवावी लागल्यामुळे एक किलोमीटर चालत आले. जस्टिनचा कार्यक्रम पाहण्यासाठी आम्ही खास आस्ट्रेलियाहून आलो. त्याला ऐकण्यासाठी थोडा त्रास झाला तरी हरकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली.

महामार्गावर वाहतूक कोंडी
डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम मुंबई-पुणे महामार्गाशेजारी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून आलेल्या रसिकांमुळे वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. महामार्गाच्या दुतर्फा वाहने उभी होती. सीवूडस्‌, नेरूळ, करावे, शिरवणे आदी आतील रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिरवणे गावाला तर वाहनांचा वेढा पडला होता. मैदानापासून लांब कार उभी करावी लागत होती. मुख्य रस्त्यावरील पार्किंगवरून पोलिस आणि वाहनचालक यांच्यात खटके उडत होते.

अग्निशमन दलाची गाडी पोचलीच नाही
जस्टिन बीबरच्या शोमुळे सायन-पनवेल मार्ग, उड्डाणपूल आणि पाम बीचवर वाहतूक कोंडी झाली होती. सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी सीबीडीतून स्टेडियमजवळील हेलिपॅडकडे जाणारी अग्निशमन दलाची गाडी 15 मिनिटे वाहतूक कोंडीत अडकली होती. जस्टिन बीबर हेलिकॉप्टरने स्टेडियममध्ये येणार होता. सुरक्षेचा एक भाग म्हणून अग्निशमन दलाची गाडी हेलिकॉप्टर उतरताना असणे गरजेचे होते. ती वेळेत पोचावी म्हणून तिचा सायरन अखंड सुरू होता. शेवटी पोलिसांनी वाहतूक थांबवून अग्निशमन दलाच्या गाडीला वाट मोकळी करून दिली; परंतु त्याआधीच जस्टिनचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले होते.

Web Title: justin bieber fever in mumbai