
मराठी टेलिव्हीजन क्षेत्रातील आघाडीचा नायक ओमप्रकाश शिंदेने या चित्रपटात ज्ञानेश्वर बोडकेंची भूमिका साकारली आहे.
मुंबई - मराठी चित्रपटांचा डंका सातासमुद्रापार गाजत असल्याचे दिसून आले. अनेक चित्रपटांनी गेल्य़ा वर्षी परदेशी चित्रपट महोत्सवांमध्ये कौतूकास्पद कामगिरी केली आहे. त्यात आता काळी माती या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. प्रसिध्द शेतकरी ज्ञानेश्वर बोडके याच्या जीवनावर आधारित चित्रपटानं एक दोन नव्हे तर तब्बल 52 पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.
पुण्याजवळ असणा-या मावळातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी आणि प्रेरणादायी व्याख्याते ज्ञानेश्वर बोडके यांची ओळख आहे. त्यांनी सेंद्रीय समुह शेतीच्या माध्यमातून केलेली वार्षिक साडेचारशे कोटी रुपयांची उलाढाल हा प्रेरणेचा आणि कौतुकाचा विषय आहे. त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची संघर्षगाथा ‘काळी माती’ तून मांडण्यात आली आहे. कोरोनामुळे चित्रपट क्षेत्राला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. त्याचा फटका अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांना बसला आहे. त्यात अनेक चित्रपट महोत्सव स्थगित झाल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी होती.
आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. काही ठिकाणी पूर्वी सारखे महोत्सव होत आहेत. एच.एम.जी एंटरटेनमेन्ट निर्मित हेमंतकुमार महाले दिग्दर्शित ‘काळी माती’ हा चित्रपट सर्वांच्या कुतूहलाचा विषय झाला आहे. 42 सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, 7 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, संगीत आणि छायांकनासाठी प्रत्येकी एक असे एकूण 52 पुरस्कार काळी माती या चित्रपटाला मिळाले आहेत.
नवरदेवासमोर नाचणारा मोर पाहिलात का?; व्हिडिओ झाला व्हायरल
मराठी टेलिव्हीजन क्षेत्रातील आघाडीचा नायक ओमप्रकाश शिंदेने या चित्रपटात ज्ञानेश्वर बोडकेंची भूमिका साकारली आहे. भगवान पाचोरे, पुनम पाटील, एतशा संझगिरी, दिक्षा भोर यांच्याही भूमिका चित्रपटात आहे. काळी मातीची पटकथा मयूर आडकर यांची असून संवाद अनिल राऊत यांचे तर सुरेश सुवर्णा आणि राजा फडतरे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार आणि बँकांच्या भूमिकेबद्दल चर्चा होते. या दोन महत्वाच्या मुद्द्यांना चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.