esakal | 'माझ्यासाठी काम करू नये म्हणून आर्किटेक्टना महापालिकेकडून धमक्या'; कंगनाचा आरोप

बोलून बातमी शोधा

kangana ranaut}

'तुम्ही मला माझ्या घराचं बांधकाम करू दिलं नाहीत, तर मी तुम्हाला शांत झोपू देणार नाही',

'माझ्यासाठी काम करू नये म्हणून आर्किटेक्टना महापालिकेकडून धमक्या'; कंगनाचा आरोप
sakal_logo
By
स्वाती वेमूल

सप्टेंबर २०२० मध्ये अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतील ऑफिसवर मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. कंगनाने अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका मुंबई महानगरपालिकेने ठेवला होता. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. हा कायदेशीर वाद कंगनाने जिंकल्यानंतरही तिला आता बांधकामाशी संबंधित पुढील अडणींना सामोरं जावं लागतंय. पावसाळा सुरु होण्याआधी कंगनाला मुंबई महानगरपालिकेने केलेलं तोडकाम पुन्हा बांधायचं आहे, मात्र यासाठी कोणताच आर्किटेक्ट काम करायला पुढे येत नसल्याची तक्रार तिने केली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून संबंधित आर्किटेक्ट्सना धमक्या येत असल्याचा आरोपही तिने केलाय. कंगनाने ट्विटरवर याविषयीची माहिती दिली. 

'मुंबई महानगरपालिकेविरोधातील खटला मी जिंकला होता. आता मला एका आर्किटेक्टमार्फत नुकसान भरपाईसाठी फाईल सबमिट करायची आहे. पण कोणताही आर्किटेक्ट माझ्यासाठी काम करायला तयार नाही, कारण मुंबई महानगरपालिकेकडून त्यांना त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याच्या धमक्या मिळत आहेत. बांधकाम पाडून आता सहा महिने झाले आहेत. कोर्टाने महानगरपालिकेच्या मूल्यांकनकर्त्याला बांधकामाच्या ठिकाणी भेट देण्याचे आदेश दिले होते. मात्र तो आमचे फोनच उचलत नाही. सतत पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवड्यात त्याने भेट दिली, मात्र त्यानंतर पुन्हा त्याचा काहीच पत्ता नाही. मी माझ्या घराचं बांधकाम का करत नाही, असं अनेकजण विचारत आहेत. पावसाळा जवळ आला आहे आणि मलासुद्धा त्याचीच चिंता सतावतेय,' असं ट्विट कंगनाने केलं आहे. 

हेही वाचा : अनुराग, तापसीच्या घरी रात्रभर छापेमारी सुरू; आयकर विभागाकडून कसून चौकशी सुरू 

या ट्विटमध्ये कंगनाने मुंबई महानगरपालिकेवरही ताशेरे ओढले आहेत. 'मुंबई महानगरपालिकेला लाज वाटली पाहिजे. तुम्ही देशातील सर्वांत भ्रष्ट नागरी संस्था आहात. या लोकशाहीसाठी कलंक आहात. ज्यांनी बेकायदेशीर तोडकामात भाग घेतला, त्यांच्याविरोधात फौजदारी खटला करायचा माझा विचार आहे. तुम्ही मला माझ्या घराचं बांधकाम करू दिलं नाहीत, तर मी तुम्हाला शांत झोपू देणार नाही', असं ती पुढे म्हणाली.  

कंगनाविरोधात महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं होतं. यासोबतच कंगनाला पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली होती. महापालिकेकडून कंगनाच्या जुहू इथल्या कार्यालयातील बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटलं होतं. त्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता.