विधानसभेत जे घडलं ते खरं होतं, किस्सा 'थलाइवी' चा

Kangana Ranaut movie 'Thalaivi' Shows the Attack on Jayalalithaa In Tamil Nadu Assembly.jpg
Kangana Ranaut movie 'Thalaivi' Shows the Attack on Jayalalithaa In Tamil Nadu Assembly.jpg

मुंबई : नुकताच थलायइवी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटाचे कथानक तामिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

जयललिता यांच्या आयुष्यात किती संकटं आली आणि या संकटांना त्या कसं सामोरं गेल्या याची एक झलक ट्रेलरमध्ये दिसते. कला क्षेत्रातून त्यांनी राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सिन ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तो सिन म्हणजे जयललिता यांच्यावर विधानसभेत झालेला हल्ला. हा हल्ला खरंच जयललितांवर झाला होता का? की फक्त सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून हा सिन चित्रपटामध्ये घेण्यात आला आहे. त्यावेळी विधानसभेत नेमके काय झाले होते हे एका मुलाखतीत जयललिता यांनी सांगितले होतं.

संघर्षमय आयुष्य

जयललिता यांना अभिनेत्री किंवा राजकारणी व्हायचं नव्हतं. पण त्यांनी दोन्ही क्षेत्रात काम केलं आणि तिथं नावही कमावलं. एक आघाडीची अभिनेत्री आणि एका राज्याची मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली. जयललिता या अभिनेत्री होत्या म्हणून राजकारणात सहज प्रवेश किंवा त्यांना सहज सगळं मिळालं असं नाही. लहानपणापासून ते राजकारणात मुख्यमंत्रीपद इथंपर्यंत त्यांना संघर्ष करावा लागला. लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलं. त्यानंतर आईला घर सांभाळण्यासाठी चित्रपटांमध्ये काम करावं लागलं. यामुळे आई आणि मुलीच्या नात्यात दुरावा आला.

जयललिता या म्हैसूरला आजी आजोबांकडे राहायच्या. या वातावरणाचा त्यांच्या बालमनावर परिणाम झाला. सतत आईचा सहवास हवा असायचा पण भेट होणं कठीण होत गेलं. पुढे शिक्षणासाठी आईसोबत चेन्नईत यायची संधी मिळाली. तिथेही आईचं काम सुरूच असल्यानं जयललितांना सहवास दुर्मिळ होता. याकाळात एकट्या पडलेल्या जयललिता यांनी स्वत:ला अभ्यासात गुंतवून घेतलं. सतत पुस्तक वाचण्यात वेळ घालवणं पसतं करत असत. अभ्यासात हुशार असलेल्या जयललिता यांना खूप शिकायचं होतं, नोकरी करायची होती. पण नियतीलाच ते मान्य नसावं. 

चित्रपटात काम करणाऱ्या आईला नंतर वाढत्या वयामुळे काम मिळणं जवळपास बंद झालं होतं. त्यातच जयललिता यांचं शिक्षणही होतं. त्यावेळी जयललिता यांना चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर मिळाली. पण जयललिता यांनी काम करण्यास नकार दिला. आईला तसं स्पष्ट सांगितलं तरीही आईने त्यासाठी तगादा लावला. कुटुंब आणि भावंडांची जबाबदारी पेलवण्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे हे सांगून मुलीची समजूत काढली. शेवटी जयललिता तयार झाल्या आणि त्यांनी सिनेमात काम करणं सुरू केले.

जयललितांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्या एकट्या पडल्या. काही दिवसांनी जयललिता यांची भेट तत्कालीन प्रसिद्ध तमिळ अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांच्याशी झाली. जयललिता यांनी केलेल्या 125 पैकी तब्बल 40 पेक्षा जास्त सिनेमे एमजीआर यांच्यासोबत केले आहेत. सिनेमात काम करणं बंद केल्यानंतर खरंतर त्यांना आता एका हाऊसवाईफचं जीवन जगायचं होतं. पण, त्यांच्या वाट्याला ते आलंच नाही. एमजीआर यांनी त्यांना कधीच पत्नीचा दर्जा दिला नाही. तरीसुद्धा त्यांनी एमजीआर यांची पदोपदी साथ दिली.

राजकारणात प्रवेश

एमजीआर चित्रपट क्षेत्रातून राजकारणात आले आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. एमजीआर यांच्याबरोबर जयललिता यांचीसुद्धा राजकारणात एंट्री झाली. पण, त्यावेळीही त्यांना फार मानाचं स्थान नव्हतं. जयललिता यांचा संघर्ष सुरूच होता. अशात एमजीआर यांच्या मृत्यूनं त्यांना आणखी एक धक्का दिला. एमजीआर यांच्या पार्थिवाजवळ सुद्धा त्यांना बसू देण्यात आलं नाही. त्यांना तिथून अपमानित करून हाकलून देण्यात आलं. अधिकृत पत्नीचा दर्जा नाही, अधिकृत उत्तराधिकारी म्हणून निवड नाही आणि स्वतःचं असं कुणीच आधार देण्यासाठी जवळ नाही अशा स्थितीत सापडलेल्या जयललिता यांना स्वतःला टिकवण्यासाठी राजकारणात सक्रिय राहणं भाग होतं.

त्यांनी तेच केलं. अण्णा द्रमुक या त्यांच्या पक्षात त्यांनी स्वतःची जागा शोधण्याचा संघर्ष नव्यानं सुरू केला. अशातच एमजीआर यांच्या काही निष्ठावंतांनी जानकी रामचंद्रन (एमजीआर यांच्या पत्नी) यांना राजकारणात आणून जयललिता यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण, जयललिताच त्या! आतापर्यंतच्या संघर्षात तावूनसुलाखून निघालेल्या. त्यांनीही कंबर कसली आणि स्वतःला झोकून दिलं. मुळात गृहिणी असलेल्या आणि राजकारणाचा गंध नसलेल्या जानकी रामचंद्रन यांचा जयललिला यांच्यापुढे टिकाव लागणं शक्यच नव्हतं.

विधानसभेत झालेला हल्ला

32 वर्षांपूर्वी 25 मार्च 1989 ला तमिळनाडू विधानसभेत जयललितांवर हल्ला झाला होता. तेव्हा त्यांच्या साडीचा पदर ओढण्यात आला. हल्ल्यानंतर तमिळनाडूमधील राजकारण बदलले. या हल्ल्याचा बदला म्हणून जयललितांना मुख्यमंत्री करण्यात आले. थलाइवी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला हल्ला हा 32 वर्षापूर्वी जयललितांवर विधानसभेतमध्ये अर्थसंकल्प सादर करताना झाला होता. त्यावेळी डीएमकेचे प्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री करूणानिधी यांनी बजेटचे संदर्भात भाषण करण्यास सुरूवात केली तेव्हा कॉंग्रेसच्या आमदारांनी याला विरोध केला.

प्रसिद्ध मुलाखतकार सिम्मी गरेवाल यांच्या शोमध्ये जयललितांनी सांगितले होत की, 'करूणानिधी यांच्या पक्षाच्या आमदारांनी मला मारहाण केली. त्यांनी माझे केस ओढले, त्यांनी माझ्यावर चप्पल फेकल्या, मोठमोठी पुस्तके देखील फेकली. त्या दिवशी मी रडत असेंबलिच्या बाहेर पडले. माझ्या मनात खूप संताप निर्माण झाला. त्यानंतर मी शप्पथ घेतली की मी या असेंबलीत पाय ठेवेन तेव्हा मी मुख्यमंत्री असेन आणि ही शप्पथ मी पूर्ण करून दाखवली. 

चित्रपटात कंगना साकारणार जयललितांची भूमिका डायलॉगने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत कंगना दिसणार आहे. ट्रेलरमधील कंगनाच्या प्रत्येक डायलॉगला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. असेंब्लीमधील हल्ला झाल्यावर बाहेर पडतानाच्या सिनमध्ये कंगनाच्या डायलॉगने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या सिनमध्ये कंगना म्हणते, 'आज तुने जिस तरह भरी सभा में मेरा अपमान किया है, वैसाही चिर हरण कौरोवोने द्रौपदी का किया, वो सत्ता की लडाई भी वो जिती थी और ये सत्ता की लडाई भी मै जितूंगी क्यू की महाभारत का दुसरा नाम है जया!' या चित्रपटामध्ये जयललितांसोबत घडलेल्या प्रसंगाची तुलना द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगाशी केली आहे. द्रौपदीची तुलना जयललितां यांच्या सोबत केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com