'2 वर्षापूर्वीच मी म्हटलं होतं..' अमृतसरमधील हल्ल्याप्रकरणी कंगनाचं मोठं विधान Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

Kangana Ranaut: '2 वर्षापूर्वीच मी म्हटलं होतं..' अमृतसरमधील हल्ल्याप्रकरणी कंगनाचं मोठं विधान

Kangana Ranaut: बॉलीवूड क्वीन कंगना रनौत नेहमीच गंभीर मुद्द्यांवर बोलते आणि आपली मतं मांडताना दिसते. आता पुन्हा एकदा कंगना रनौतनं पंजाबमध्ये घडलेल्या घटने संदर्भात फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून कंगनानं गैर खालिस्तानी शीख लोकांना एक मोठा सल्ला देखील दिला आहे.

पंजाबमध्ये परिस्थिती गंभीर होत चालल्याचं दिसत आहे. गुरुवारी पंजाबच्या अमृतसरमध्ये अजनाला पोलिस स्टेशनवर हल्ला झाला. त्यानंतर 'वारिस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगच्या समर्थकांकडून अजनाला पोलिस ठाण्यावर कब्जा करण्यात आला.

पंजाबमध्ये बिघडलेल्या परिस्थितीनं देशभरातील लोकांना मोठा धक्का पोहोचला आहे. कंगना रनौतनं देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे.

''माझ्यावर अनेक केस केल्या गेल्या होत्या. माझ्या विरोधात अटक वॉरंट देखील जारी केलं होतं. माझ्या कारवर पंजाबमध्ये हल्ला केला गेला होता,पण तेच झालं जे मी बोलले होते. आता वेळ आली आहे की गैर खालिस्तानी शीख लोकांनी आपलं अस्तित्व आणि त्यांचा हेतू स्पष्ट करावा''.

दोन वर्षापूर्वी किसान बिलचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कंगना रनौतनं आतंकवादी आणि खलिस्तानी म्हणून संबोधलं होतं. कंगनाच्या या पोस्टवरनं खूप वाद झाला होता. अनेक शहरांमध्ये तिच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली गेली होती. या पूर्ण वादा दरम्यान जेव्हा कंगना पंजाबमध्ये पोहोचली,तेव्हा शेतकऱ्यांनी तिच्या कारला घेरलं होतं.

घटने संदर्भात बोलताना कंगना रनौतनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती,ज्यात तिनं सांगितलं होतं की, पंजाबमध्ये एन्ट्री करताच तिच्या कारला घेरलं गेलं आणि तिच्यावर हल्ला देखील करण्याचा प्रयत्न झाला. तर आता अमृतसरमध्ये अजनाला पोलिस स्टेशनवर हल्ला केला गेला तेव्हा कंगनानं दोन वर्षापूर्वी झालेली ही गोष्ट बोलून दाखवली.

पंजाबच्या अजनाला मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पंजाब पोलिसांवर आता खालिस्तानी समर्थकांप्रती सक्ती न करता नरमाईनं वागल्याचा आरोप होत आहे. पण पंजाबच्या डीजीपीचं म्हणणं आहे की पोलिस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मग त्या आधारावर कारवाईला सुरूवात करेल. पंजाब पोलिस अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांना सोडणार नाही.कारवाई नक्कीच होणार..असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं.