esakal | थलायवी: संघर्षमय जीवनप्रवासाची उत्तम मांडणी
sakal

बोलून बातमी शोधा

Thalaivi

थलायवी: संघर्षमय जीवनप्रवासाची उत्तम मांडणी

sakal_logo
By
- संतोष भिंगार्डे

क्वीन, तनू वेडस् मनू, मणिकर्णिका, पंगा आदी काही चित्रपटांमधून अभिनेत्री कंगना राणावतने Kangana Ranaut आपलं अभिनयकौशल्य सिद्ध केलंय. कंगनाच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा वादविवाद होत असले, तरी एक अभिनेत्री म्हणून तिचं कौतुक करावंच लागेल. आतापर्यंत तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेवर तिने तितकीच मेहनत घेतलीय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘थलायवी’ Thalaivi चित्रपटात तिने तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता Jayalalithaa यांची व्यक्तिरेखा साकारलीय. त्यासाठी तिने घेतलेली मेहनत प्रकर्षाने जाणवते. जयललिता यांची भूमिका तिने समरसून साकारलीय. जयललिता यांची चित्रपट कारकीर्द आणि मुख्यमंत्रिपदापर्यंतचा त्यांचा एकूणच प्रवास चित्रपटात मांडण्यात आलाय.

चित्रपटाची सुरुवात होते ती जयललिता (कंगना राणावत) यांना विधानसभेत अपमानास्पद वागणूक दिली जाण्याच्या दृश्यापासून.

जयललिता विरोधी पक्षात असताना तत्कालीन सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला असतो. विधानसभेत त्यांना अपमानास्पद वागणूक दिलेली असते. ‘आता विधानसभेत तेव्हाच पाऊल टाकेन जेव्हा मी तमिळनाडूची मुख्यमंत्री होईन,’ असा ठाम निर्धार तेव्हा त्या जाहीर करतात. त्यानंतर तमिळनाडूचं राजकारण चांगलंच तापतं.

हेही वाचा: मुनमुनसोबत अफेअरच्या चर्चांवर राजचं सडेतोड उत्तर

अनेक वाद-प्रतिवाद आणि टीका-टिप्पणी सुरू होते. त्यानंतर चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो... जयललिता शाळा सोडल्यानंतर आपली आई संध्या (भाग्यश्री) सोबत चित्रपटांमध्ये नायिका बनण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन (अरविंद स्वामी) त्यांच्या आयुष्यात येतात. त्यानंतर ते काही चित्रपटांमध्ये एकत्र काम करतात. त्यांचे आणि एमजीआर यांच्यातील व्यावसायिक तसंच वैयक्तिक नातेसंबंध वाढत जातात. त्यानंतर त्यांचा राजकारणात प्रवेश, तेथे काही मंडळींशी त्यांना करावा लागणारा सामना, अशा सर्व अंगाने चित्रपट पुढे पुढे सरकतो. एमजीआर जयललिता यांना राजकारणात कशी साथ देतात, जयललिता यांचा आयुष्यातील संघर्ष, राजकारणात त्या आपला दबदबा कसा निर्माण करतात, अशा सगळ्या बाबी दिग्दर्शक विजय यांनी चित्रपटात मांडल्या आहेत. त्यांनी चित्रपटाची हाताळणी चांगली केलीय. कंगनाच्या बरोबरीने अभिनेता अरविंद स्वामी, राज अर्जुन, भाग्यश्री, एम. नास्सर, जिशू सेनगुप्ता, मधू आदी कलाकारांनी उत्तम भूमिका निभावल्यात. विशेष कौतुक करावं लागेल ते कंगनाचे. तिने आपल्या व्यक्तिरेखेतील विविध पैलू पडद्यावर झकास रेखाटले आहेत. अगदी पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत तिने आपल्या भूमिकेची पकड काही सोडलेली नाही. शिवाय धारदार संवादही तिच्या तोंडी आहेत. त्यातील काही संवाद लक्षात राहणारे आहेत. एमजीआर यांची भूमिका अरविंद स्वामी यानी उत्तम साकारली आहे. चित्रपटातील एक व्यक्तिरेखा अधिक लक्ष वेधून घेते आणि ती आहे राज अर्जुन यांची. त्यांनी एमजीआर यांच्या सेक्रेटरीची भूमिका साकारलीय. ते चित्रपटातील एक सरप्राईज पॅकेज आहे.

चित्रपटात काही बाबी निश्चितच खटकणाऱ्या आहेत; परंतु कंगनाच्या सकस आणि ठाशीव अभिनयामुळे त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरं. विशाल विठ्ठल याने चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम पद्धतीने केली आहे. मात्र विजेंद्र प्रसाद यांचे संगीत म्हणावे तसे जमलेले नाही. जयललिता जयरामन राजकारणातील मोठं प्रस्थ. त्यांची राजकीय कारकीर्द खूप मोठी. त्यांचा प्रेमळ आणि संघर्षमय असा प्रवास पाहण्यासारखाच आहे.

चित्रपटाला तीन स्टार

loading image
go to top