करण जोहर एनसीबीच्या टारगेटवर? क्षितीज प्रसादने कोर्टासमोर एनसीबीबाबत केला 'या' गोष्टींचा खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 28 September 2020

क्षितीज प्रसादने रिमांडसाठी सुनावणी दरम्यान एनसीबीवर आरोप केले आहेत की त्याच्यावर करण जोहरचं नाव घेण्यासाठी दबाव टाकला जातोय. थर्ड डिग्री आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न देखील केला गेला.

मुंबई-प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता करण जोहरवर आहे एनसीबीचा निशाणा? सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी क्षितीज प्रसादने कोर्टासमोर दिलेल्या जबाबातून हेच स्पष्ट होताना दिसतंय. क्षितीज प्रसादने रिमांडसाठी सुनावणी दरम्यान एनसीबीवर आरोप केले आहेत की त्याच्यावर करण जोहरचं नाव घेण्यासाठी दबाव टाकला जातोय. थर्ड डिग्री आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. क्षितीज प्रसाद करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शनची सिस्टर कंपनी धर्मेटिक एंटरटेन्मेंटचा एक्जिक्युटीव्ह प्रोड्युसर होता. 

हे ही वाचा: मनोज कुमार ते अजय देवगण, पडद्यावर 'या' अभिनेत्यांनी भगतसिंह यांची भूमिका पडद्यावर गाजवली  

बॉलीवूड ड्रग रॅकेट प्रकरणात अटकेत असलेला आरोपी क्षितीज प्रसादने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिमांडच्या सुनावणी दरम्यान एनसीबीवर आरोप केले की विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी इतर अधिका-यांच्या उपस्थितीत सांगितलं की तो धर्मा प्रोडक्शनशी संबधित असल्याने करण जोहर, सोमेल मिश्रा, राखी, अपूर्वा, नीरज किंवा राहीचं नाव घ्यावं की ते ड्रग्सचं सेवन करतात. क्षितीजच्या म्हणण्यानुसार जेव्हा त्याने खोटं बोलण्यास नकार दिला तेव्हा समीर वानखेडे यांनी त्याला धमकावलं की 'तु सहकार्य करत नाहीयेस तेव्हा आम्ही तुला धडा शिकवू.'

समीर वानखेडे यांनी असं म्हणत त्यांच्या खुर्चीच्या बाजुला जमीनीवर क्षितीजला बसवलं आणि त्यांचा बुट चेह-यासमोर आणत म्हणाले की 'ही तुझी लायकी आहे.' क्षितीजचे वकिल सतीश मानशिंदे यांनी जबाब सादर करत ही माहिती दिली आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार क्षितीज ड्रग्स घेत नाही मात्र त्याच्यावर थर्ड डिग्रीचा वापर करत त्याच्याकडून जबरदस्तीने जबाब लिहून घेतला गेला. याची तक्रार सुनावणी दरम्यान कोर्टात केली आहे. 

क्षितीजचे वकिल सतीश मानशिंदे सादर केलेल्या जबाबात म्हटलं की कोर्टाने दोन्ही पक्षांच्या बाजु ऐकल्यानंतर क्षितीजला एनसीबीच्या ताब्यात ३ ऑक्टोबर २०२० पर्यंत ठेवण्यात येईल. वकिलांनी असा देखील दावा केला आहे की रिमांड एप्लिकेशन आणि क्षितीज प्रसादच्या जबाबावरुन हे सहज कळू शकतं की एनसीबी धर्मा प्रोडक्शनच्या काही उच्च अधिका-यांना या प्रकरणात चूकीच्या पद्धतीने फसवण्याच्या प्रयत्नात आहे. या आरोपांवर एनसीबी कडून अजुनपर्यंत स्पष्टीकरण आलेलं नाही.   

karan johar and his team under radar kshitij prasad alleges agency of blackmailing  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karan johar and his team under radar kshitij prasad alleges agency of blackmailing