KBC : एका प्रश्नामुळे अधुरे राहिले स्वप्न, नागपूरच्या विभोरसाठी ‘थोडी खुशी थोडा गम’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KBC

KBC : एका प्रश्नामुळे अधुरे राहिले स्वप्न, नागपूरच्या विभोरसाठी ‘थोडी खुशी थोडा गम’

नागपूर : नागपूरच्या १९ वर्षीय विभू खंडेलवालने तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ३ लाख २० हजार रुपये जिंकले. मात्र चुकीचे उत्तर दिल्याने ६ लाख ४० हजारांमधील अर्धी रक्कम गमवावी लागल्याने त्याला थोडे दुःखही झाले.

१२ ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या केबीसीच्या एपिसोडमध्ये सलग अकरा प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन विभूने ही रक्कम जिंकली. केबीसीमधील अविस्मरणीय अनुभव ‘सकाळ’शी शेअर करताना विभू म्हणाला, मी लहानपणापासूनच केबीसीचा फॅन आहे. २०११ मध्ये सुशीलकुमारने पाच कोटी रुपये जिंकल्याचे टीव्हीवर पाहिल्यानंतर मलाही या शोमध्ये भाग घेण्याची इच्छा होती. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी गतवर्षी प्रयत्नही केला. मात्र त्यात यश आले नाही. दुसऱ्याच प्रयत्नात ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’मध्ये अचूक व वेगवान उत्तरे देत ‘हॉट सीट’वर विराजमान झालो. साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर ‘हॉट सीट’वर बसण्याचा अनुभव मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. आयुष्यात पहिल्यांदाच एवढी रक्कम जिंकल्याचा मला मनापासून आनंद झाला.

विभू म्हणाला, खरं तर मी यापेक्षाही अधिक रक्कम जिंकू शकलो असतो. ६ लाख ४० हजार जिंकल्यानंतर १२ व्या प्रश्नाच्या वेळी माझ्याजवळ एक लाईफलाईन शिल्लक होती. मात्र मी त्याकडे दुर्लक्ष केले आणि घाईघाईने चुकीचे उत्तर दिले. त्यावेळी लाईफलाईन घेतली असती, तर कदाचित साडेबारा लाख जिंकू शकलो असतो. उल्लेखनीय म्हणजे, लाईफलाईन शिल्लक असल्याची बिग बी यांनीही आठवण करून दिली होती. अर्धी रक्कम गमावल्याने थोडी निराशा अवश्य झाली, पण ३ लाख २० हजार जिंकून घरी परतल्याचा आनंदही आहे. रामदेवबाबा कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये (द्वितीय वर्ष) इंजिनिअरिंग करीत असलेल्या विभूने जिंकलेली रक्कम स्वतःच्या शिक्षणावर खर्च करणार असल्याचे सांगितले. केबीसीमध्ये पैसे जिंकल्यापासून विभूला सारखे मित्रांचे फोन येत आहेत. अगदी सेलिब्रिटी झाल्याचा अनुभव सध्या तो घेत आहे.

कोरोनाच्या लाटेत वडिलांना गमावले

झिंगाबाई टाकळी येथे राहणाऱ्या विभूच्या वडिलांचे (सतीश) गतवर्षी मे महिन्यात कोरोनामुळे निधन झाले होते. वडिलांचे छत्र व कर्ता पुरुष गेल्याने खंडेलवाल कुटुंब आर्थिक संकटात सापडले. मात्र गृहिणी असलेल्या आईने (सुचेता) कुटुंबाची सर्व जबाबदारी आपल्या हाती घेत विभूचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या शिक्षणासाठी तिला नातेवाईकांकडून उधार पैसे घ्यावे लागले. आजीच्या पेंशनवर सध्या कसेबसे घर चालत असल्याचे विभूने सांगितले. मला जिंकताना पाहायला वडील जीवंत हवे होते, असे विभू यावेळी म्हणाला.