'आज केबीसीचा शेवटचा एपिसोड; 20 वर्षे मनोरंजन करणारी मालिका'

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 22 January 2021

कौन बनेगा करोडपतीचा बारावा सीझन आता लवकरच समाप्त होणार आहे. त्याच्या शेवटच्या भागाचे टेलिकास्ट प्रेक्षकांना पाहता येणार असून त्यानिमित्तानं काही वेगळी स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मुंबई - एक दोन नव्हे तर तब्बल 20 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका म्हणून केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपतीचे नाव सर्वांच्या तोंडी आहे. नाविन्य, वेगळेपणा, झगमगाट, यासाठी केबीसीची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटली गेली आहे. त्या मालिकेच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतली आणि केबीसीनं वेगळी उंची गाठली. मात्र आता ही मालिका यापुढील काळात प्रेक्षकांना पाहता येणार नाही. आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

कौन बनेगा करोडपतीचा बारावा सीझन आता लवकरच समाप्त होणार आहे. त्याच्या शेवटच्या भागाचे टेलिकास्ट प्रेक्षकांना पाहता येणार असून त्यानिमित्तानं काही वेगळी स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 2000 साली केबीसीचा पहिला सीझन प्रसिध्द झाला होता. त्यानंतर या मालिकेने लोकप्रिय़तेचे नवे उच्चांक गाठले. केवळ भारतातच नव्हे तर जगातही हा कार्यक्रम पाहिला गेला. देशावर कोरोनाचे संकट आल्यानंतर त्यावेळी केबीसीचे टेलिकास्ट थांबले होते. तेव्हा प्रेक्षकांना रिपिट टेलिकास्ट पाहावे लागत होते. 28 सप्टेंबर 2020 मध्ये पुन्हा हा शो सुरु झाला. त्यानंतर तो पुढे चार महिने चालला. केबीसीच्या 12 व्या सीझनमध्ये अद्याप एकानंही 7 कोटीच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.

केबीसीचा शेवटचा भाग स्पेशल होणार असल्याचे सांगितले जात आहे. कारगील हिरोज असे त्या भागाचे नाव आहे. त्यात आपल्या जवानांची शौर्यगाथा उलडगून सांगण्यात येणार आहे. यावेळी परमवीर चक्र विजेता सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव, सुभेदार संजय सिंह सहभागी होणार आहेत. केबीसीचा हा भाग देशभक्ती आणि जोश अशा वातावरणानं भारलेला असणार आहे. यात शंका नाही. या स्पेशल भागाचा एपिसोडचा प्रोमो आर्मी डेच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. प्रोमो मध्ये सैनिक आपल्या गणवेशात स्टूडिओमध्ये परेड करताना दाखविण्यात आले आहेत. यंदाचा केबीसीचा संपूर्ण सीझन हा प्रेरणादायी कथांनी भरलेला होता. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

अजय देवगणची 'थँक गॉड' ची तयारी, मधुर, तुषार कपूरच्या चित्रपटांची घोषणा

यापुढे आपण केबीसीमध्ये सुत्रसंचालन करणार नाही असे खुद्द अमिताभ यांनी सांगितले. मी आता फार थकलो आहे. माझा हा माफीनामा चाहत्यांसाठी आहे. केबीसीचा फार मोठा प्रवास केला आहे. त्याच्या शेवटच्या दिवसाचे शुटिंग करताना फार भारावल्यासारखे झाले होते. मात्र एक लक्षात ठेवायला हवे ते म्हणजे काम हे काम असते. आणि ते पूर्ण ईमानदारीनं केले पाहिजे. आता आणखी पुढे जाण्याची वेळ आली आहे. आतापर्यत तुम्ही सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. असे अमिताभ यांनी सांगितले होते. 

 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kbc final episode telecasted Friday kargil heros in finale episode of kbc