कियारा अडवाणीचा इंदू की जवानी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 मे 2020

काही चित्रपट ज्यांचे चित्रीकरण लॉकडाउनपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. ते चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बऱ्याच चित्रपट निर्मात्यांनी आपला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. चित्रपटांचे चित्रीकरण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे आणि चित्रपटगृहेही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे चित्रपटांच्या चित्रीकरणापासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे.

काही चित्रपट ज्यांचे चित्रीकरण लॉकडाउनपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. ते चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बऱ्याच चित्रपट निर्मात्यांनी आपला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेत्री विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ आणि अभिनेते अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा 'गुलाबो सीताबो' हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता या यादीमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीचा 'इंदू की जवानी' चित्रपटाचा देखील समावेश झाला आहे. 'इंदू की जवानी' चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

एक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार कियाराचा चित्रपट 'इंदू की जवानी' पूर्णपणे तयार आहे. या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन्सचे काम देखील जवळजवळ पूर्ण झाले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे तसे होऊ शकले नाही. आता या चित्रपटाचे निर्माते निखिल अडवाणी आणि मोनिषा अडवाणी हा चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करण्याचा विचार करीत आहेत. सध्या त्यांचे तीन मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत बोलणं सुरू आहे.

हेही वाचा : अनिल कपूर यांचे स्वप्न या दिग्दर्शकामुळे पूर्ण झाले नाही.

जे कोणी त्यांना चांगली किंमत देईल त्या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल. 'इंदू की जवानी' हा चित्रपट एक कमी बजेटमध्ये बनवण्यात आला असून चित्रपटाचे कथानक उत्तम आहे. त्यामुळे हा चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित केल्याने निर्मात्यांना फायदाच होणार आहे. त्यामुळे निर्माते सध्या यावर विचार करत आहेत. 'इंदू की जवानी' चित्रपटासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि कियाराची मुख्य भूमिका असलेला 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलाची मुख्य भूमिका असलेला 'वर्जिन भानुप्रिया' हा चित्रपट देखील ऑनलाईन प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kiara Advani's 'Indu Ki Jawani' on OTT platform