kiccha sudeep: खिशात शेवटची नोट उरली होती, पण संघर्ष करून झाला साऊथचा सुपरस्टार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kiccha sudeep birthday : struggle, tollywood and  bollywood movies,

kiccha sudeep: खिशात शेवटची नोट उरली होती, पण संघर्ष करून झाला साऊथचा सुपरस्टार

Kiccha Sudeep Birthday : किच्चा सुदीप हे नाव आपल्याला काही नवीन नाही. त्याच्या अभिनयाने तर तो आपल्यापर्यंत पोहोचलाच. पण मध्यंतरी झालेल्या राष्ट्रभाषेवरील वादामुळे तो अधिकच चर्चेत आला. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही या त्याच्या एका विधानाने संपूर्ण बॉलीवुड आणि टॉलीवुड रिंगणात उतरले. शेवटी सुदीपनेच मनाचा मोठेपणा दाखवून या वादावर पाणी सोडले. अशा किच्चा सुदीपचा आज २ सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातला संघर्ष आणि काही गमतीशीर गोष्टी..

किच्चा सुदीपचा जन्म 2 सप्टेंबर 1973 रोजी कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात झाला. किच्चा सुदीपने आपल्या दमदार अभिनयाने कन्नड मनोरंजन विश्व गाजवले आहे. केवळ साऊथच नव्हे, तर तो अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. केवळ अभिनेताच नाही तर मेहनतीच्या जोरावर सुदीप आज दिग्दर्शक आणि निर्माताही झाला आहे. एक वेळ आधी होती सुदीपकडे शेवटची नोट उरली होती पण हार न मानता त्याने काम सुरू ठेवले आणि आज तो साऊथचा सुपरस्टार झाला आहे.

सुदीपच्या आयुष्यात एकदा अशीही वेळ आली होती की त्याच्याकडे काम नव्हते, जवळ असलेले पैसेही संपत आले होते. एक दिवस असा आला की त्याच्याकडे शेवटचे ५०० रुपये उरले. पण अशा बिकट परिस्थितीतही रो खचला नाही. अत्यंत मेहनत करून त्याने कामं मिळवली आणि आज तो दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक महत्वाचं अभिनेता ठरला आहे.

सुदीपने वडिलांच्या हॉटेल व्यवसायात यावं अशी त्यांची इच्छा होती. पण सुदीप मात्र इंजिनियरिंगला गेला. पुढे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने थेट मुंबई गाठली. मुंबईत त्याने रोशन तनेजा अॅक्टिंग स्कूलमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याला अनेक अडचणी आल्या पण त्याने काम करणं थांबवलं नाही.

किच्चा सुदीपने सुरुवातीला छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्याने 'प्रेमदा कादंबरी' या टीव्ही सीरियलमध्ये काम केले. या मालिकेतील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर 1997मध्ये रिलीज झालेल्या 'थैवा' चित्रपटातून तो मुख्य अभिनेता म्हणून समोर आला. त्यानंतर 2001 मध्ये सुदीपने 'हुच्छा' या हिट चित्रपटात काम केले. सुदीपला 'हुच्छा', 'नंदी' आणि 'स्वाती मुथ्यम' या चित्रपटांसाठी सलग तीन वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.

2008मध्ये त्याने 'फुंक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘रण’, ‘फूंक 2’ आणि ‘रक्तचरित्र’ या चित्रपटांमध्येही त्याने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सुदीप 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचे कन्नड व्हर्जन होस्ट करतो. सलमान खानच्या ‘दबंग 3’ चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय त्याचा ‘मक्खी’ हा चित्रपटही खूप गाजला होता. आपल्या अभिनयावर असलेल्या विश्वासाने आणि मेहनतीने तो आज साऊथचा अभिनेता बनला आहे.

Web Title: Kiccha Sudeep Birthday Struggle Education Tollywood And Bollywood Movies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..