आयुष्याची किंमत ओळखा...

चिन्मयी खरे
गुरुवार, 28 जून 2018

प्रकृतिअस्वास्थ्यामुळे अभिनेत्री मनीषा कोईराला हिला करिअरमध्ये मोठा ब्रेक घ्यावा लागला; मात्र गेल्या वर्षी ‘डियर माया’ चित्रपटातून तिने पुनर्पदार्पण केले. आता ‘संजू’ या चित्रपटात मनीषा संजय दत्तची आई नर्गिस साकारतेय. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत...

प्रकृतिअस्वास्थ्यामुळे अभिनेत्री मनीषा कोईराला हिला करिअरमध्ये मोठा ब्रेक घ्यावा लागला; मात्र गेल्या वर्षी ‘डियर माया’ चित्रपटातून तिने पुनर्पदार्पण केले. आता ‘संजू’ या चित्रपटात मनीषा संजय दत्तची आई नर्गिस साकारतेय. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत...

आधीच्या काळात संजय दत्तसोबत काम केल्यानंतर भविष्यात त्याच्या आईची भूमिका करावी लागेल, याचा विचार तरी कधी मनात आला होता का?
- नाही खरं तर. मी रणबीरच्या आईच्या भूमिकेत आहे. असंच मला वाटलं. मी आई म्हणून शोभून दिसेन का? किंवा मी आईची भूमिका पेलवू शकेन का, हा विचार मनात आला. दुसरं म्हणजे नर्गिस दत्त यांना जो आजार झाला, तोच आजार मलाही झाला होता. त्यामुळे जे मी विसरण्याचा प्रयत्न करतेयं तेच मी पुन्हा जगू शकेन का, हाही विचार मनात आला.

या विचारांशी लढणं किती कठीण होतं?
- मला जेव्हा या चित्रपटाची ऑफर दिली गेली तेव्हा मी नेपाळमध्ये होते. तेव्हा मी हा चित्रपट करणार नाही, हेच मनात ठेवलं होतं. माझ्या मनात भीती होती की मी सगळं पुन्हा जगू शकेन का? मी एका आईची भूमिका करू शकेन का? मी राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटांची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे मी त्यांना भेटून नाही सांगायचं असं ठरवलं होतं. म्हणून मी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी मला सगळ्या गोष्टी बारकाईने सांगितल्या आणि ते मला म्हणाले की, मनीषा सगळी भीती दूर होईल आणि तेव्हा मला जाणवलं की मी फक्त एक आईची भूमिकाच नाही करत आहे, तर मी नर्गिस दत्त या लेजेंडरीची भूमिका साकारणार आहे. ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी संधी होती. त्यानंतर मी अखेरतः त्यांना हो सांगितले आणि तेव्हा माझ्या मनात कोणतीच भीती राहिली नव्हती.

 manisha koirala in nargis datta

नर्गिस दत्त यांच्या भूमिकेसाठी तू काय अभ्यास केलास?
- राजकुमार हिराणी यांच्याशी मी सतत बोलत होते. त्यानंतर त्यांनी मला नर्गिस दत्त यांच्यावरची डॉक्‍युमेंटरी दाखविली. प्रिया दत्तने मला त्यांच्याबद्दल असलेले पुस्तक वाचायला दिले. हे सगळं पाहिल्यावर, वाचल्यावर एका सुपरस्टार असलेल्या आईच्या काय भावना असतील, जिने एका मोठ्या अभिनेत्याबरोबर लग्न केले, जिचा मुलगाही याच क्षेत्रात यावा आणि त्याचे चांगले करिअर घडावे असे तिचे स्वप्न होते. संजय दत्त आईचा खूपच लाडका होता. या सगळ्या गोष्टी मला त्यातून जाणवल्या आणि समजल्या.

ऑन स्क्रीन-ऑफ स्क्रीन नर्गिस दत्त कशा वेगळ्या होत्या?
- हे कळणं माझ्यासाठी खूप अवघड नव्हतं. कारण मी एक स्वतः अभिनेत्री आहे. लोकांना मी पडद्यावर दिसते तशीच माहिती आहे; पण त्यापलीकडे माझ्या खासगी आयुष्यात मी एक साधारण स्त्रीच आहे. जी स्वयंपाक करते, घर स्वच्छ ठेवते, जे जे साधारण स्त्रिया करतात, ते ते मी सगळं करते. तसंच नर्गिस दत्त ऑन स्क्रीन जितक्‍या प्रभावी होत्या तशाच खासगी आयुष्यातही त्या एक प्रेमळ आई आणि पत्नी म्हणून प्रभावी होत्या. 

manisha koirala in nargis datta

नर्गिस दत्तच्या गेटअपमध्ये पाहिल्यानंतर संजय दत्तची तुझ्याबद्दल काय प्रतिक्रिया होती?
- त्याने तर माझे पोस्टरच पाहिले. तेव्हा त्याने माझे फोन करून कौतुक केले आणि खूपच साम्य दिसते आहे, अशी तारीफ केली; पण जेव्हा मी स्वतः संजू चित्रपट पूर्ण पाहिला तेव्हा खूप भरून आले. तुमच्या सहकलाकारावर असलेला चित्रपट ज्याच्याबरोबर तुम्ही इतके वर्ष काम केले आहे आणि लहानपणापासून ज्याच्या तुम्ही फॅन आहात त्याच्या आयुष्याची कथा पडद्यावर पाहताना खरंच खूप भरून येतं. 

संजय दत्तने तुला या भूमिकेसाठी काही मार्गदर्शन केले का?
- मी जाणूनबुजून त्याच्याकडून काही टीप्स घेतल्या नाहीत. कारण दिग्दर्शकाचे प्रत्येक भूमिकेसाठी एक व्हिजन असते. त्यामुळे हा माझा नियमच आहे की दिग्दर्शक सोडून मी माझ्या भूमिकेविषयी कोणाशीच सल्लामसलत करत नाही. दिग्दर्शक मला जे काही करायला सांगतो तेच मी फॉलो करते. केवळ त्याचाच मी अभ्यास करते. त्यानंतर दिग्दर्शकाशी मी याविषयी बातचीत करते. कारण दिग्दर्शक हा संपूर्ण चित्रपट व्हिज्युअलाईज करत असतो, तर एक अभिनेत्री म्हणून मी फक्त माझीच भूमिका व्हिज्युअलाईज करत असते. त्यामुळे माझा फंडा आहे की तुम्ही काहीही जरी वाचलं तर शेवटी दिग्दर्शकाचा निर्णय आणि त्याची
 व्हिजन महत्त्वाची.

तुझ्या सामाजिक कामाबद्दल काय सांगशील?
- एक जाणकार नागरिक आणि एक सेलिब्रिटी म्हणून आमचा प्रभाव सोसायटीवर जास्त पडतो. मी असं म्हणत नाही की प्रत्येक सेलिब्रिटीने सामाजिक काम केलेच पाहिजे; पण आपण एका समाजाचा भाग आहोत, आपण केलेल्या कामाचा लोकांवर प्रभाव पडत असेल तर मी चांगलं काम केलं तर त्याचा चांगलाच प्रभाव लोकांवर पडेल. सध्या सरकारने केलेल्या प्लास्टिकबंदीला माझा प्रचंड पाठिंबा आहे. हा एक खूपच चांगला आणि स्तुत्य निर्णय आहे. मी सध्या प्लास्टिकला रिप्लेस करतील, अशा गोष्टी जसं की कागदी स्ट्रॉ, पिशव्या किंवा इतर विघटनशील पदार्थ लोकांना कसे जास्तीत जास्त आणि कुठे मिळू शकतील याचा शोध घेतेय. नेपाळमध्ये आम्ही घराघरांत जाऊन जास्तीत जास्त ऑर्गनिक लाईफस्टाईल आत्मसात करा हा संदेश देतो. आपल्याला मिळालेल्या आयुष्यात आपल्याकडून चांगलं काम झालंच पाहिजे हे प्रत्येकानं ठरवायला हवं. कारण आयुष्यात मिळणाऱ्या वेळेचा त्यापेक्षा चांगला उपयोग असूच शकत नाही. मी कॅन्सरसारख्या आजाराचा सामना केलाय. त्यामुळे आयुष्याची किंमत काय असते हे मला चांगलंच माहीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know the value of your life sadi bu manisha koirala