कोल्हापूरऽऽ, माझं कोल्हापूर..! : अभिमान, पेठेत जन्मल्याचा..!

संभाजी गंडमाळे
Friday, 29 March 2019

मंगळवार पेठेतला जन्म. साहजिकच पेठेतल्या वातावरणात लहानाचा मोठा झालो. संगीताचा विचार केला तर त्र्यंबोली यात्रेवेळी हमखास ऐकायला मिळणाऱ्या ‘पीऽऽऽ ढबाक’नं नेहमीच ताल धरायला लावला. एकीकडे अशा लोकसंगीताचा अनुभव मिळत होता आणि घरी वडील संगीतकार असल्यानं शास्त्रीय बेस पक्का होत होता. आजवर चाळीसहून अधिक चित्रपटांना, तीसहून अधिक दूरचित्रवाणी मालिकांना संगीत दिलं; पण कोल्हापूरच्या मातीतला ‘पीऽऽऽ ढबाक’चा तो ताल प्रत्येक टप्प्यावर इन्स्पिरेशन देणारा ठरला... प्रसिद्ध संगीतकार शशांक पोवार यांनी आपला प्रवास ‘माझं कोल्हापूर’च्या निमित्तानं उलगडला.  

शशांक यांना संगीतासाठी आजवर अनेक नामांकनं मिळाली. अनेक पारितोषिकेही मिळाली. मुंबईत ते स्थायिक झाले असले, तरी मात्र त्यांची कोल्हापूरशी असलेली नाळ कधीच तुटली नाही. 

ते सांगतात, ‘‘मिरजकर तिकटीला अख्खं बालपण सरलं. बालगोपाल तालमीत लहानपणी कुस्तीही खेळायचो. तांबड्या मातीत घाम निथळायचो. महापालिकेच्या शाळेत आणि नंतर नूतन मराठी विद्यालयात शिक्षण झालं. पुढं एस. एम. लोहिया, डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये महाविद्यालयीन आणि त्यानंतर शिवाजी विद्यापीठात ‘एमए’ पूर्ण केलं; मात्र, घरातच संगीताचा वारसा असल्यानं आपल्याला काय करायचं आहे, हे समजून चुकलं होतं. स्टुडिओत रेकॉर्डिंगची अनेक कामं असायची. पण, हातचे काही राखून न ठेवता समरसून काम करत राहण्याचा कोल्हापुरी संस्कार मात्र पहिल्यापासून जपला. ‘जीव पिसाटला’, ‘रामण्णा’, ‘देवीचा उदो उदो’, ‘सुंदरा’ अशी अनेक गीतं गाजली. याच गीतांवर आधारित एखादा व्हिडिओ व्हायरल होऊन स्वतःच्या मोबाईलवर येतो तेव्हाचा आनंद लाखमोलाचा असतो.’’

कोल्हापूरला कलेचा वारसा. प्रायोगिक, व्यावसायिक नाटकं, संगीत मैफली, विविध लोककला असे अनेक कलाप्रकार येथे अनुभवायला मिळतात. त्यातून आपल्या जाणिवा समृद्ध होत जातात. त्यामुळं या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी भविष्यातही असणार आहेत. मात्र, केवळ त्या त्या कलेत प्रवीण होताना आता बदलत्या काळानुसार टेक्‍निकली अपडेटही राहायला हवं, तरच भविष्यातील स्पर्धेत आपण टिकू शकणार असल्याचंही ते आवर्जून सांगतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur My Kolhapur special story Musician Shashank Powar