‘लग्न शांतूच्या मेहुणीचं’ अस्सल ग्रामीण बाजातील नाटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

'आमचा कलाविष्कार शहरातील रसिकांनाही अनुभवायला मिळावा, या उद्देशाने आम्ही स्पर्धेत सहभागी होऊ लागलो. यानिमित्ताने आम्हाला नाटकातील बदलते प्रवाहही अनुभवायला मिळू लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धेच्या निमित्ताने साऱ्या पंचक्रोशीतील नाटकावर प्रेम करणारी मंडळी एकवटते आणि आम्हाला पाठबळ देते. आता आमच्यातील काही कलाकारही विविध दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट आणि जाहिरातीतून झळकू लागले आहेत.'
- विजय साठे
 

कोल्हापूर : राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळावं, हा उद्देश. ग्रामीण भागातील काही संघ गेली काही वर्षे या स्पर्धेत सहभाग घेत आहेत. त्यातीलच एक भुयेवाडीचा संस्कार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, जय भवानी नाट्य मंडळाचा संघ. या संघाने यंदा दशरथ राणे लिखित बहारदार विनोदी ‘लग्न शांतूच्या मेहुणीचं’ या नाटकाचा प्रयोग सादर केला. या प्रयोगाच्या निमित्ताने त्यांच्या सादरीकरणातील सकारात्मक बदलही प्रकर्षाने जाणवले. 

खरं तर ही मंडळी गेली तीन-चार वर्षे राज्य नाट्यस्पर्धेत सहभागी होते. जे नाटक गावातील जत्रा आणि विविध उत्सवांच्या निमित्तानं लहानपणापासून पाहिलं, तेच त्यांच्यासाठी खरं नाटक. साहजिकच अस्सल ग्रामीण बाजातील नाटकं, हेच त्यांचे आकर्षण.

 ही स्पर्धा ठरली कार्यशाळा

पारंपरिक शेती आणि इतर व्यवसाय, नोकरी सांभाळून ही पिढीही नाटकात आलेली, मात्र ती जशी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होऊ लागली, तसे सादरीकरणातील बदलते प्रवाह ते समजून घेऊ लागले. ग्रामीण नाटकापलीकडेही नाटकाचा आशय, फॉर्म असा तौलनिक अभ्यास करू लागली. मुळात त्यासाठी स्पर्धेतील सर्व प्रयोग आवर्जून पाहू लागली. त्यांच्यासाठी आयुष्यातल्या नाटकासाठी म्हणून कुठली कार्यशाळा ठरली असेल ती ही स्पर्धाच. त्यांच्याच प्रेरणेतून आता परिसरातील इतर संघही स्पर्धेत उतरू लागले आहेत.

यंदा मात्र नाटकाला फाटा 

‘डोंगरचा राजा’, ‘हॅलो मी चेअरमन बोलतोय’ अशी नाटकं त्यांनी यापूर्वी स्पर्धेत आणली. यंदा मात्र त्याला फाटा देत ‘लग्न शांतूच्या मेहुणीचं’ हे नाटक या टीमनं स्पर्धेत सादर केले. बहारदार विनोदी असणारे हे नाटक तितकेच खुलवण्यात ही मंडळी यशस्वी झाली.

सरस नाट्याविष्कार घडणे अपेक्षित

मुळात रंगभूमी एक प्रयोगशाळा आहे आणि राज्य नाट्य स्पर्धा ही तर हौशी कलाकारांसाठी सशक्त व्यासपीठ आहे. अशा व्यासपीठावरून नवे कलाकार घडण्याची प्रक्रिया सुरू होत असते आणि पुढे त्यांच्याकडून एकाहून एक सरस नाट्याविष्कार घडणे अपेक्षित असते. भुयेवाडीच्या संघाची वाटचाल त्या दिशेने सुरू झाली आहे. शेवटी स्पर्धेचा उद्देश तर तोच आहे.    
 

पात्र परिचय :
 प्रसन्न इंगळे (चंदू) , विजय साठे (विवेक) ,सागर गराडे (नरेश) , वसंत शिंदे (राकेश) ,साक्षी शिंदे (हेमा) ,महादेव चौगले (शिरीष),संदीप लोहार (समीर) ,पांडुरंग पाटील (नाना)
 रोहित पाटील (शांतू)

 दिग्दर्शक : पांडुरंग पाटील
 निर्माता :  महादेव चौगले
 सूत्रधार : बी. जे. पाटील
 संगीत : आनंद ढेरे
 रंगभूषा : राजेंद्र शिंदे
 प्रकाश योजना : सरदार पाटील
 नेपथ्य :  रघुनाथ लोले

बदलते प्रवाहाचाही अनुभव

'आमचा कलाविष्कार शहरातील रसिकांनाही अनुभवायला मिळावा, या उद्देशाने आम्ही स्पर्धेत सहभागी होऊ लागलो. यानिमित्ताने आम्हाला नाटकातील बदलते प्रवाहही अनुभवायला मिळू लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धेच्या निमित्ताने साऱ्या पंचक्रोशीतील नाटकावर प्रेम करणारी मंडळी एकवटते आणि आम्हाला पाठबळ देते. आता आमच्यातील काही कलाकारही विविध दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट आणि जाहिरातीतून झळकू लागले आहेत.'
- विजय साठे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lagna Shantanuchya Mehuniche In State Drama Competition