Lata Mangeshkar: दैवीस्वर निमाला - श्रीधर फडके

पडद्यावरची नायिका मीनाकुमारी असो, वहिदा रहमान असोत किंवा साधना लतादिदींचे गाणे त्यांचे होऊन समोर येई.
Lata Mangeshkar
Lata MangeshkarSakal

लता मंगेशकर विलक्षण प्रतिभावान कलाकार होत्या. कुठल्याही प्रसंगाला संगीताचे अधिष्ठान देवू शकणारा तो स्वर होताच दैवी. लौकिक अर्थाने त्या आज निवर्तल्या पण, स्वरांनी गुंफलेली दुनिया आपल्यासाठी मागे ठेवून. त्यांचे गाणे म्हणजे सर्वगुणांचा समुच्चय. स्वर कसा लावावा, उच्चार कसे असावेत, ज्या भाषेत गायचे त्या भाषेचा लहेजा कसा पकडावा, काव्यातले भाव स्वरातून कसे व्यक्त व्हावेत याचा आदर्श असायचे त्यांचे गायन. ते गाणे कुणावर चित्रित होणार याची त्या प्रथम चौकशी करत, गाण्याचा प्रसंग कोणता हे ही जाणून घेत. पडद्यावरची नायिका मीनाकुमारी असो, वहिदा रहमान असोत किंवा साधना लतादिदींचे गाणे त्यांचे होऊन समोर येई. प्रसंग जिवंत करत त्यांचे स्वर! (Lata Mangeshkar Memories)

महाराष्ट्रात गीतरामायणाची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती. पुणे आकाशवाणीत ध्वनिमुद्रण होई. पण दीदींच्या स्वरात एकही गाणे रेकॉर्ड होण्याचा योग येत नव्हता. बाबूजींना दीदींच्या आवाजात गाणं हवं होतंच. ‘सांग लक्ष्मणा जाऊ कुठे...’च्या निमित्ताने अखेर योग जुळून आला. दीदी पुण्यात पोहोचल्या. ग. दि. माडगूळकरांचे अप्रतिम शब्द तयार होतेच. आकाशवाणीच्या स्टुडिओतच तालमी झाल्या. दोन तालमीत दीदींचे गाणे पाठही झाले अन् लगेच रेकॉर्डही. बाबूजींना त्या फडकेसाहेब म्हणायच्या. मला बाबूजी म्हणायला नाही आवडत म्हणायच्या. शिवाजीपार्कच्या आमच्या घरी त्या तालमीला यायच्या. बाबूजींना सांगायच्या मी तुम्ही शिकवलेत तसेच गाईन पण माझ्या पद्धतीने. मग ते गाणे आणखीच सुंदर होई. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते ‘ज्योती कलश छलके’ हे माझे सर्वांत आवडते गाणे. ते बाबूजींचे अन् दीदींचेच. माझी आई ललिता फडकेही गायिका.

खूप वर्षांपूर्वी फिल्मीस्तान, बॉम्बे स्टुडिओच्या बाहेर लतादीदी विख्यात संगीतकार गुलाम हैदर यांना भेटायला आल्या होत्या. मावस बहिणी समवेत बाहेर बसल्या होत्या. त्यांचे ‘स्ट्रगल’चे दिवस होते ते. माझ्या आईचे आत रेकॉर्डिंग सुरु होते. आई म्हणाली मी ऐकून आहे तुमच्या गाण्याबद्दल. आत का नाही आलीस गं ! नात्यातली ही अनौपचारिकता वाढत गेली. आईला त्या ललीताई म्हणत. दोघी रेकॉर्डींगनंतर लोकलने प्रवास करीत परतत. माझ्या लग्नालाही त्या आल्या, दिवसभर थांबल्या. गुरुवारी त्या उपास करत, त्या दिवशी नेमका गुरुवार पण तो दुपारीच त्यांनी सोडला. दीदी त्या काळात स्वरसृष्टीवर अधिराज्य गाजवत होत्या. देशप्रेम, सावरकरभक्ती त्यांच्या ध्यासाचे विषय. दादरा-नगर-हवेलीच्या मुक्तीलढ्याप्रसंगी बाबूजींनी दीदींना विनंती केली निधिसंकलनासाठी कार्यक्रम करायची. ती त्यांनी तत्काळ मान्य केली. १९५४ चे ते वर्ष. दीदींनी कायम राष्ट्रभक्तीची बांधिलकी जपली.

दीदींचा प्रवास मोठा. गाणे जणू अथांग. त्या गाणे सादर कशा करायच्या, उभ्या कशा राहायच्या हे नव्या गायिकांनी शिकायला हवे. सरस्वतीच होत्या त्या. गेल्या काही वर्षांत आमच्या वारंवार गप्पा व्हायच्या. दीड दीड तास आमचे फोनवर बोलणे व्हायचे. जुन्या आठवणींचे पट उलगडत जायचे. दीदी व्हॉटसॲपवर मंगेशीचे, सरस्वतीचे फोटो पाठवायच्या. गेल्या दोन-तीन वर्षांत आम्ही बरेचदा भेटलो. पाच महिन्यांपूर्वी झाली ती आमची शेवटची भेट. खूप गप्पा झाल्या. बाबूजींच्या आठवणी तर निघाल्याच. शंकर-जयकिशनांची गाणी हाही आमच्या गप्पांचा विषय असे आजकाल. त्यांची बहुतांश गाणी दीदींनीच गायलेली. खूप मजा आली त्या दिवशी. या चार-पाच भेटीत एकच गोष्ट राहिली ती म्हणजे आमच्या दोघांचा एकत्र फोटो. एक फोटो आहे तसा आमचा एकत्र पण तो सार्वजनिक कार्यक्रमातला. नंतर मी फोन केला ‘एक राहिले’ असे म्हणताच त्या तत्काळ हसत म्हणाल्या ‘फोटो ना ! आता पुन्हा भेटू तेंव्हा नक्की काढू.’ तो फोटो आता कधीच टिपता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com