esakal | साक्षात सरस्वतीकडून कौतूक,आयुष्य सार्थकी लागलं; अभिनेता सुबोध भावे गेला भारावून
sakal

बोलून बातमी शोधा

Lata Mangeshkar Praised Marathi Actor Subodh Bhave For Outstanding Performance In Balgandharv

 बालगंधर्व चित्रपट पाहताना मला बालगंधर्वांच्या जीवनातील काही गोष्टी ज्या मला माहित नव्हत्या, त्या मला चित्रपटाच्या माध्यमातून समजल्या. बालगंधर्व यांची भूमिका साकारणारे सुबोध भावे आणि त्यांच्यासाठी पार्श्वगायन करणारे आनंद भाटे आणि इतर सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करते. असे लता मंगेशकर म्हणाल्या. 

साक्षात सरस्वतीकडून कौतूक,आयुष्य सार्थकी लागलं; अभिनेता सुबोध भावे गेला भारावून

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - एखाद्या क्षेत्रातील प्रख्यात, मान्यवर अधिकारी व्यक्तींकडून शाबासकी, कौतूकाचे शब्द वाट्याला येणं यासाठी नशीबाची साथ लाभावी लागते. असा गौरव, सन्मान मिळावा म्हणून कित्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतात. असाच सन्मान, कौतूक मराठीतला आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याचे झाले आहे. तेही साक्षात गानसरस्वती, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून.  यासगळ्याचे निमित्त होते 'बालगंधर्व ' चित्रपट. यासंबंधी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.  या कौतूकामुळे सुबोध भारावून गेला आहे.

मराठी संगीत नाटक क्षेत्रातील मानाचे नाव म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व. त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात सुबोध भावे याने त्य़ांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट नुकताच भारतरत्न लता मंगेशकर यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी बालगंधर्व यांच्या समवेतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुबोधच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. लतादीदींनी ‘बालगंधर्व’ या चित्रपटाविषयी एक पोस्ट लिहिली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणतात, नमस्कार. बालगंधर्व हा मराठी चित्रपट जो मराठी संगीत नाटकातील खूप महान कलाकार आणि  प्रामाणिक व्यक्ती बालगंधर्वजी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. तो पाहिला. बालगंधर्व यांना मी दोन-तीन वेळा भेटले, ते खूप प्रेमाने मला भेटायचे, आशीर्वाद द्यायचे. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात मी त्यांना शिवाजी पार्क येथे आमंत्रित केलं होतं, तेव्हा तेथे येऊन त्यांनी दोन भजनंसुद्धा गायली. हा चित्रपट पाहताना मला हे सर्व आठवले. त्यांच्या जीवनातील काही गोष्टी ज्या मला माहित नव्हत्या, त्या मला चित्रपटाच्या माध्यमातून समजल्या. हा चित्रपट खूप चांगला आहे आणि बालगंधर्व यांची भूमिका साकारणारे सुबोध भावे आणि त्यांच्यासाठी पार्श्वगायन करणारे आनंद भाटे आणि इतर सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करते. त्याचसोबत एक फोटो ज्यामध्ये वसंत देसाई, मी, बालगंधर्वजी, बेगम अख्तरजी आणि मोगुबाई कुर्डीकरजी आहेत, तो इथे जोडत आहे. 

लतादीदींची ही पोस्ट शेअर करुन सुबोधने आनंद व्यक्त केला. ‘साक्षात सरस्वतीदेवीकडून कौतुक,अजून काय हवं? आयुष्य सार्थकी लागलं, लतादीदी तुम्हाला साष्टांग नमस्कार’, अशा शब्दांत त्याने त्यांचे आभार मानले आहे. आतापर्यत लोकमान्य-एक युगपुरुष, बालगंधर्व, कटय़ार काळजात घुसली आणि डॉ.काशिनाथ घाणेकर या चित्रपटांतील मुख्य व्यक्तिरेखा सुबोध भावे यांनी अभ्यासपूर्ण अभिनयाने अविस्मरणीय केल्या.