जिंदगी फिर भी यहां खूबसुरत...

अतुल क. तांदळीकर
Sunday, 7 June 2020

देवेंद्र खंडेलवाल,रविराज,विक्रम,रणजीत चौधरी,प्रीती गांगुली ही ती मंडळी. हे गाणं गाणारी या चित्रपटातील मंडळी.गाणं ऐकलं की, तुम्ही हेच म्हणाल छान जगूया, मस्त राहुया..येऊ द्यात किती वादळं येतात ती.. आणि म्हणूनच गुलजार सांगतात तेच खरं 

दिग्दर्शक बासु चटर्जी यांचे नुकतेच निधन झाले,त्यांच्या कल्पकतेतून भारतातल्या चित्रपटाद्वारे मध्यमवर्गीयास एक दिलासा,आधार,दगदगीच्या जीवनात चेहऱ्यावर एक भरभरून हास्य मिळत होतं.असं वजनदार सुख वाटत फिरणाऱ्या या दिग्दर्शकाला अनेक गुणी कलाकारांनी साथ दिली आणि हा आपला आनंद कायम टवटवीत ठेवला. 

कोरोना व्हायरसच्या काळात चित्रपट जगतातील अनेक दिग्गजांची एक्‍झिट झालेली आपण बघत आहोत.मनोरंजनातून प्रत्येकाचे जीवन समृध्द करणारी ही गुणी माणसं या काळात अशी पटापट निघून जात असल्याने मोठं अघटित घडतय ही जाणीव देखील प्रबळ होत चालली. 

बासु चटर्जी यांनी अगदी हलके पुलके चित्रपट बनविले. ही यादी छोटी असली तरी त्यांच्या त्यातील समृद्ध खजिन्याने ती मोठी आहे. मध्यमवर्गीय जीवन जगणाऱ्या कुटुंबियास त्यांचे चित्रपट नेहमीच भावले.यात आपलं सुख- दु:ख आहे असा विश्वास त्यांना वाटत असल्याने हे चित्रपट आजच्या भाषेत बॉक्‍स ऑफीसवर हिट- सुपरहिट वगैरे झाले नसतील पण लोकांच्या मनात कायम घर करीत राहिले,त्यातील जिव्हाळा,प्रेम आपुलकी,वेदनांशी प्रत्येकाचं नातं जुळलं. रजनीगंधाची विद्या सिन्हा म्हणूनच लक्षात राहते, चितचोरमधील अमोल पालेकर म्हणूनच आठवतो,खट्टा मीठा मधील अशोक कुमार,राजू श्रेष्ठा,पर्ल पदम्सी, म्हणूनच भावतात. अशा कितीतरी आठवणी सांगता येतील पण आपण त्यांच्या चित्रपटातील गाण्यावर येऊ.त्यांच्या चित्रपटातील कथानकांप्रमाणेच त्यांच्या चित्रपटातील गाणी ही देखील अप्रतिम व अविस्मरणीय अशीच आहेत.रजनीगंधा चितचोर ही त्यातील ठळक उदाहरणं. आपण मात्र त्यांच्या खट्टा मीठा चित्रपटातील मानवी आशा-आकांक्षांना प्रतिबिंबीत करणारया गाण्याबाबत बोलूया.अर्थात असं जीवनाचं सोपं पण महत्वाचं तत्वज्ञान काव्यातून मांडणयाची हुकुमत केवळ गुलजार यांची हे सांगणयाची गरज नाही. अतिशय अर्थपूर्ण या गाण्याचं चित्रीकरण बासुदांनी इतक्‍या खुबीने,कल्पकतेने केलय की ते गाणं पुर्ण बघणं हा एक अदभूत आनंदच असतो आणि तो आजच्या धकाधकीच्या जीवनात तर वेळ काढून घेतलाच पाहिजे कारण ही आपल्या वेदनांवरील अतिशय सुरेल फुंकर आहे हे मान्य केलंच पाहिजे. त्यासाठी बासुदा,गुलजार या गाण्यातील नव्हे तर त्या कुटुंबातील सर्व कलाकार संगीतकार रोशन सिनेमोटोग्राफर ए.के.बीर यांना हे श्रेय आधी देऊया. हा सुखद आनंद त्यांनी इतक्‍या खुबीने पेश केला की आजकाल नैराश्‍य आलं की लगेच टोकाच्या भूमिका घेणाऱ्याला तर ती जबर चपराकच मानली पाहिजे. आपल्यापुढील समस्या, संकटं, वादविवाद,मतभेद हे सभोवती असतांना त्यातही असं सुख शोधणं आणि हा निर्भेळ आशावाद प्रकट करणं यासाठी बासुदा माहिर होते. या गाण्यातून ही त्याच्या कल्पकतेची झलक दिसून येते. 

आजच्या दगदगीला उत्तर देणारं हे गाणं. 
हे गाणं सुंदर चित्रीत झालं त्यात नेत्रदीपक असं काहीच नाही. पण ज्या भावना आहेत त्या इतक्‍या प्रभावी आहेत की,आपल्या मनात रूजतात,मनावर राज्य करतात, मनाशी एकरूप होतात.समदु:खी कुटुंबांची ही कथा मस्तच सजली आणि हे गाणं देखील..एकदा बघाच.कळेल की, आपण आज दगदग करतो ती इतकी आततायीपणे करणं गरजेचं आहे का ? याचं उत्तर हे गाणं देतं,हे कथानक देतं हे कलाकार देतात. 
 

या चित्रपटात ओळखीचे कलाकार म्हणजे अशोक कुमार,राकेश रोशन ,देवेन वर्मा,प्रदीपकुमार,डेव्हिड आणि बिंदिया गोस्वामी. पण या गाण्यात यांच्याशिवाय ज्या कलाकारांनी आपली पेशकश सादर केली त्याला तोड नाही.हे कलाकार नेहमी पडद्यावर दिसणारे नसले तरी या गाण्यातील त्यांच्या अभिनयामुळे नेहमी लक्षात राहतात, आता तुम्ही गाण्यात काय अभिनय? असा सवाल कराल पण त्यांनी आपल्या सामान्यांच्या आशा आकांक्षेंचं जे सादरीकरण केलय ते अप्रतिम.देवेंद्र खंडेलवाल,रविराज,विक्रम,रणजीत चौधरी,प्रीती गांगुली ही ती मंडळी. हे गाणं गाणारी या चित्रपटातील मंडळी.गाणं ऐकलं की, तुम्ही हेच म्हणाल छान जगूया, मस्त राहुया..येऊ द्यात किती वादळं येतात ती.. आणि म्हणूनच गुलजार सांगतात तेच खरं 

थोड़ा है थोड़े की ज़रूरत है 
िंज़दगी फिर भी यहां ख़ूबसूरत है 

आहे ना बरोबर. 

जिस दिन पैसा होगा 
वो दिन कैसा होगा 
उस दिन पहिये घूमेंगे 
और क़िस्मत के लब चूमेंगे 
बोलो ऐसा होगा 

स्वप्न कशी बघावीत ? त्याचं समर्पक उत्तर देणारया या ओळी. 

मेलडी मेकर्स: 
- प्रेक्षकांच्या मनात अनोळखी कलाकारांचं कायमचं घर 
- गुलजार यांच्या शब्दांना नवख्याचा न्याय 
- बासुदांच्या कल्पकतेला राजेश रोशन यांची सुरेल साथ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: life is beautiful