गुडबाय (सखी गोखले)

सखी गोखले, अभिनेत्री
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

लंडनमध्ये राहताना भारताच्या आलेल्या आठवणी किती रम्य आहेत... याच आठवणी आपल्यासोबत शेअर करत आहे अभिनेत्री सखी गोखले...

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

लंडन कॉलिंग

एका संध्याकाळी, घरच्या हॉलमध्ये माझी आई, आजोबा आणि मी फोनवर नजर ठेवून बसलो होतो. आम्ही सह्याद्री स्कूल नावाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये ऍडमिशनची चौकशी केली होती. आईने शाळेचं वर्णन करताना डोंगर, खाली वाहणारी भीमा नदी, फुलं, पक्षी अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. मलाही खूप मोह झाला होता. मुंबईच्या शाळेतला अभ्यास, ते जाड दप्तर, ती ट्रॅफिकमध्ये अडकून राहणारी बस या सगळ्यांचाच मला भयंकर कंटाळा आला होता.

अनेकदा त्या युनिफॉर्मचा राग यायचा आणि अभ्यासातलं काही कळत नसल्यामुळे चिडचिड व्हायची. थोड्या वेळाने फोन वाजला. त्या वर्षी आम्हाला ऍडमिशन घ्यायला उशीर झाला होता. म्हणजे अजून एक वर्ष मुंबईच्या शाळेत दोन वेण्या घालून जावं लागणार, हा विचार करूनच मी ढसाढसा रडू लागले. पुढच्या वर्षासाठी नाव नोंदवलंय, असं म्हणून आईने माझी समजूत काढली. त्या एका वर्षात मी माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना माझ्या शाळेबद्दल सांगितलं, तेही डोळे विस्फारून ऐकायचे. आईपासून दूर कशी राहणार, असे प्रश्‍न विचारल्यावर, तिच्याच आकृतीची बाहुली बनवून मी सोबत नेणार, असं मी सांगून मोकळी व्हायची, त्यांचा विश्‍वास होता माझ्यावर.

एका वर्षाने मला मुलाखतीसाठी बोलावलं गेलं, आम्ही तिवाई हिल्सच्या डोंगरावर गाडी चढवितानाच माझं याचं शाळेत शिकायचं ठरलं होतं. आईने वर्णन केलं होतं त्यापेक्षा कैक पटीने सुंदर होती ही जागा. मी माझ्या लहानशा मेंदूत ती सगळी दृश्‍य पटापट साठवत चालली होती. थोड्या वेळाने मला असेंब्ली हॉलमध्ये बोलावलं गेलं. मोठ्ठा हॉल होता तो. एका बाजूने पाच पायऱ्या, दुसऱ्या टोकाला एक लाकडी दार. जमिनीवर बांबूच्या काड्यांनी बनवलेल्या सतरंज्या आणि चौदा खिडक्‍यांमधून येणारा लखलखीत उजेड. एका साध्या खादीच्या कुर्त्यातल्या बाई माझ्यासमोर येऊन बसल्या आणि प्रेमाने, हळुवारपणे मला माझं नाव, छंद आणि इतर प्रश्‍न विचारू लागल्या. मीही अगदी मैत्रिणीशी गप्पा माराव्यात अशी इकडे तिकडे बघत उत्तर दिली. नंतर कळलं त्या आमच्या मुख्याध्यापिका होत्या, माझा विश्‍वासच बसेना. त्यांना उभं राहून "गुड मॉर्निंग! म्हणायला हवं होतं का? थोड्यावेळाने आई आणि आजोबांची मुलाखत झाली. दोघेही म्हणे खूप रडले. त्या वयात का हे कळत नव्हतं; पण आईच्या डोळ्यात कधीही टचकन पाणी येतं म्हणून असावं अशी स्वतःची समजूत घालत मी त्या शाळेचं स्वप्नांमध्ये रंगले. काही दिवसांनी घरी पत्र आलं आणि मला ऍडमिशन मिळाल्याचं कळलं. खूप धिंगाणा घालत मी घरभर नाचले. आई आणि आजी शाळेत सोडायला आल्या. तेव्हा अख्ख्या प्रवासात अगदी मला शेवटची मिठी मारून बाय म्हणेपर्यंत आई रडत होती. मी आपली नवीन कपडे घालून, घट्ट वेणी बांधून, पडके दात दाखवत हसत निरोप घेत होते.

काही महिन्यांपूर्वी मी लंडनला रवाना होताना, आई मला विमानतळावर सोडायला आली, या वेळेसही रडली. मात्र या वेळी, मीही रडले. काळ वेगळा, वय वेगळं आणि प्रसंगही वेगळा तरी विमानतळाच्या दारात उभं राहून मागे वळून बघितल्यावर, सह्याद्रीच्या डोंगरावर आईच्या केशरी रंगाच्या ड्रेसमधील ती का दिसत होती? आणि अचानक त्या दिवशी ना कळलेल्या भावना सगळ्या जाणवू लागल्या. माझे पडके, वेडेवाकडे दात आता सरळ झालेत, केस छोटे आहेत आणि इस्त्री न केलेले कपडे घालून मी आईला बाय म्हणताना वाटलं काही क्षणांसाठी का होईना त्या सहावीतल्या सखीची समज परत यावी आणि अश्रूंची जागा त्या जुन्या अनभिज्ञ स्मिताने घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: London Calling Article by Sakhee Gokhale in Maitrin of Sakal Pune Today